मेनू बंद

अलंकार म्हणजे काय | अलंकारचे प्रकार | Alankar in Marathi Grammar

Alankar in Marathi Grammar: मराठी व्याकरणामध्ये ‘ अलंकार ‘ हा अतिशय महत्वाचा भाग आहे. त्यामुळे आपण या लेखात अलंकार म्हणजे काय आणि अलंकारचे किती प्रकार आहेत हे सविस्तरपणे समजून घेऊया.

अलंकार म्हणजे काय | अलंकारचे प्रकार | Alankar in Marathi Grammar

अलंकार म्हणजे काय

कोणतेहि गद्य वा काव्य श्रवणीय वा रसपूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा (काव्यात्मक) साचा म्हणजे अलंकार होय. मराठीत आलेले बहुतेक अलंकार संस्कृतमधून आलेले आहेत. त्यांची जी नावे संस्कृतमध्ये आहेत, तीच मराठीतही आहेत.

अलंकारांचे प्रकार

अलंकारांचे मुख्य दोन प्रकार आहेत

१. शब्दालंकार
२. अर्थालंकार.

शब्दालंकार

यमक, अनुप्रास हे शब्दालंकार आहेत. हे अलंकार शब्दामधील बनावटीवर अवलंबून असतात. यात शब्दाच्या अर्थाचा विचार नसतो. उपमा, उत्प्रेक्षा आदी अर्थालंकार आहेत.

1) अनुप्रास

एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते, तेव्हा अनुप्रास अलंकार होतो.

उदाहरण –

 • गडद निळे गडद निळे जलद भरुनि आले
  शीतलतनु चपलचरण अनिलगण निघाले(नि)
 • रजनीतल स्थिर पल जल पल सलील
  हिरव्या तटि नावांचा कृष्ण मेळ खेळे.(ल)
 • पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी
  गळ्यामधे गरिबाच्या गाजे संतांची वाणी (ग)

लाटानुप्रास

पुढे दिलेले समर्थ रामदासस्वामीकृत ‘नृसिंह पंचक स्तोत्र’ हे लाटानुप्रासाचे उत्तम उदाहरण आहे:

नरहरी नरपाळें भक्तपाळें भुपाळें।
प्रगट रुप विशाळें दाविलें लोकपाळें।
खवळत रिपुकाळें काळकाळें कळाळें।
तट तट तट स्तंभि व्यापिलें वन्हिजाळें।।

झळझळीत झळाळीं ज्वाळलोळें झळाळी।
लळलळीत लळाळीं लाळ लाळित लाळी।
हळहळीत हळाळीं गोळमाळा हळाळी।
कळकळीत कळाळीं व्योम पोळीत जाळीं।।

2) यमक

कवितेच्या चरणात ठरावीक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास यमक हा शब्दालंकार होतो.

उदाहरण –

 • जाणावा तो ज्ञानी
  पूर्ण समाधानी
  निःसंदेह मनी
  सर्वकाळ
 • पहिला पाऊस पडला
  सुगंध सर्वत्र दरवळला
 1. पुष्ययमक

सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो
कलंक मतिचा झडो, विषय सर्वथा नावडो.

 1. दामयमक
 • आला वसंत कवि कोकिल हाही आला
  आलापितो सुचवितो अरुणोदयाला
 • पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी
  देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी
 • तल्लिले मधि तल्लीन न हो कल्लोलिनी! कवी कवण तरी?
  जय संजीवनी जननी पयोदे श्रीगोदे! भवताप हरी.

3) श्लेष

एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्याने जेव्हा शब्दचमत्कृती साधते तेव्हा श्लेष अलंकार होतो.

उदाहरण –

सूर्य उगवला झाडीत
झाडूवाली रस्ता झाडीत
शिपाई गोळ्या झाडीत
अन् वाघहि तंगड्या झाडीत.

राम गणेश गडकरीकृत हे एक “झाडीत” या शब्दावरील श्लेषाचे उदाहरण.

 1. अर्थश्लेष

वाक्यात दोन अर्थ असणाऱ्या शब्दाबद्दल दुसऱ्या अर्थाचा शब्द ठेवल्यास श्लेष कायम राहिला तर त्यास अर्थश्लेष म्हणतात अन्यथा त्यास शब्दश्लेष म्हणतात.

उदाहरण –

तू मलिन, कुटिल, नीरस जडहि पुनर्भवपणेहि कच साच.

 1. सभंग श्लेष

उदाहरण –

 • श्रीकृष्ण नवरा मी नवरी
  शिशुपाल नवरा मी न-वरी
 • कुस्करू नका ही सुमने
  जरी वास नसे तिळ यांस, तरी तुम्हांस अर्पिली सु-मने
 • ते शीतलोपचारे जागी झाली हळूच मग बोले
  औषध नलगे मजला,औषध नल-गे मजला, परिसुनि माता ‘बरे’ म्हणूनी डोले.

अर्थालंकार

1) उपमा

उपमा हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. या अलंकारात दोन भिन्न गोष्टीत साम्य पाहिले जाते. ‘एक वस्तू दुसऱ्या वस्तूसारखी आहे’ असे वर्णन असते. दोन वस्तूंतील साम्य चमत्कृतिपूर्ण रीतीने जेथे वर्णन केलेले असते तेथे उपमा हा अलंकार होतो. पहिल्या वस्तूला उपमेय आणि दुसऱ्या वस्तूला उपमान म्हणतात.

उदाहरण –

 • सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी, येथे सावळा रंग हे उपमेय आणि पावसाळी नभ हे उपमान.
 • आभाळागत माया तुझी आम्हांवरी राहू दे.

परी, गत, सारखा किंवा तत्सम शब्द वापरून वस्तूंमधील सारखेपणा दाखविला जातो.

2) उत्प्रेक्षा

उत्प्रेक्षा हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. उपमेय हे जणू उपमान आहे असे वर्णन असते तेथे उत्प्रेक्षा अलंकार होतो.
उत्प्रेक्षा अलंकारासाठी जणू, गमे, वाटे, भासे, की असलाच एखादा शब्द वापरून दोन वस्तूंमधील सारखेपणा दाखविण्याचा प्रयत्‍न असतो.

उदाहरण –

 • ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमच जणू.
  सोने-चांदी-रत्नमाणकांचे दुकानच हे जणू.
 • अत्रीच्या आश्रमी
  नेले मज वाटे
  माहेरची वाटे
  खरेखुरे
 • बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते। उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते ॥

3) रूपक

रूपक हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. उपमेय आणि उपमान यांत एकरूपता आहे असे वर्णन असते तेथे रूपक अलंकार होतो.

उदाहरण –

बाई काय सांगो
स्वामीची ती दृष्टी
अमृताची वृष्टी
मज होय
ऊठ पुरुषोत्तमा
वाट पाहे रमा
दावि मुखचंद्रमा
सकळीकांसी
नयनकमल हे उघडित हलके जागी हो जानकी
सांजफुले सोन्याहुनि पिवळे हे पडले ऊन
अपन्हुती
(अपन्हुती म्हणजे लपविणे किंवा झाकणे)

अपन्हुती हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असे जेव्हा ठासून सांगितले जाते तेव्हा ‘अपन्हुती’ हा अलंकार होतो.

उदाहरण –

 • न हे नयन, पाकळ्या उमलल्या सरोजातिल ।
 • न हे वदन, चंद्रमा शरदिचा गमे केवळ ।।

स्पष्टीकरण- प्रस्तुत उदाहरणात ‘कमळातल्या पाकळ्या’ आणि ‘शरदिचा चंद्रमा’ या उपमानांनी अनुक्रमे ‘नयन’ आणि ‘वदन’ या उपमेयांना नाकारल्यामुळे इथे ‘अपन्हुती’ अलंकार झालेला आहे.

4) अपन्हुती

अपन्हुती हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असे जेव्हा ठासून सांगितले जाते तेव्हा ‘अपन्हुती’ हा अलंकार होतो. अपन्हुती म्हणजे लपविणे किंवा झाकणे होय.

उदाहरण –

न हे नयन, पाकळ्या उमलल्या सरोजातिल ।
न हे वदन, चंद्रमा शरदिचा गमे केवळ ।।

स्पष्टीकरण- प्रस्तुत उदाहरणात ‘कमळातल्या पाकळ्या’ आणि ‘शरदिचा चंद्रमा’ या उपमानांनी अनुक्रमे ‘नयन’ आणि ‘वदन’ या उपमेयांना नाकारल्यामुळे इथे ‘अपन्हुती’ अलंकार झालेला आहे.

5) अन्योक्ती

अन्योक्ती हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. दुसऱ्यास उद्देशून केलेली उक्ती. ज्याच्याबद्दल बोलायचे त्याच्याबद्दल काहीच न बोलता दुसऱ्याबद्दल बोलून आपले मनोगत व्यक्त करण्याची जी पद्धत तिलाच अन्योक्ती असे म्हणतात.

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक
हे मूर्ख यांस किमपीहि नसे विवेक
कोकील वर्ण बघुनि म्हणतील काक

देखोनी उदया तुझ्या द्विजकुळे गाती अती हर्षुनी।
शार्दूलादिक दुष्ट सर्व दडती गिर्यंतरी जाउनी।|
देशी ताप परि जसा वरिवरि येशी नभी भास्करा|
अत्युच्ची पदि थोरही बिघडतो हा बोल आहे खरा।

6) पर्यायोक्ती

एखादी गोष्ट आडवळणाने सांगणे.
त्याचे वडील ‘सरकारी पाहुणचार’ घेत आहेत. (तुरुंगात आहेत)

7) विरोधाभास

एखाद्या विधानात वरवर विरोध दिसतो पण वास्तवात तसा नसतो.

जरी आंधळी मी तुला पाहते
सर्वच बोलू लागले की कोणी ऐकत नाही
मऊ मेणहूनी आम्ही विष्णुदास कठिण वज्रास भेदू ऐसे.

8) व्यतिरेक

व्यतिरेक हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. “जेव्हा कोणत्याही काव्यात वा वाक्यात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखविले जाते तेव्हा ‘व्यतिरेक’ अलंकार होतो.”

उदाहरण –

अमृताहुनि गोड नाम तुझे देवा
स्पष्टीकरण- प्रस्तुत उदाहरणात परमेश्वराचे नाव हे उपमेय गोडीच्या बाबतीत अमृत या उपमानापेक्षाही वरचढ आहे (श्रेष्ठ आहे) असे वर्णन केलेले असल्यामुळे इथे ‘व्यतिरेक’ अलंकार झालेला आहे.

9) अतिशयोक्ती

अतिशयोक्ती हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. अलंकारात प्रत्यक्षात असणारी कल्पना ही फारच फुगवून सांगितलेली असते तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो. उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, व्यतिरेक ह्या अलंकारात अतिशयोक्ती असतेच, पण कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते तेव्हा हा अलंकार होतो.

उदाहरण –

जो अंबरी उफळता खुर लागलाहे
तो चंद्रमा निज तनूवरि डाग लाहे
काव्य अगोदर झाले नंतर जग झाले सुंदर

10) अनन्वय

अनन्वय हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते.

उदाहरण –

आहे ताजमहाल एक जगती तो तोच त्याच्यापरी.
या दानासी या दानाहुन अन्य नसे उपमान.

11) भ्रान्तिमान

उपमानाच्या जागी उपमेयच आहे असा भ्रम निर्माण होणे.

भृंगे विराजित नवी अरविंदपत्रे
पाहूनि मानूनी तिचीच विशाल नेत्रे
घालीन अंजन अशा मतिने तटाकी
कांते वृथा उतरलो, भिजलो विलोकी

भुंग्यांनी सुशोभित झालेली कमलपत्रे हे दमयंतीचे नेत्रच आहेत असे समजून तिच्या डोळ्यात अंजन घालावयास निघालेला नलराजा पुढे सरसावला आणि पाण्यामुळे भिजला.

12) ससंदेह

उपमेय कोणते आणि उपमान कोणते असा संदेह निर्माण होणे.भ्रान्तिमानात हा भ्रम निश्चित असतो.

कोणता मानू चंद्रमा? भूवरीचा की नभीचा?
चंद्र कोणता? वदन कोणते?
शशांक मुख की मुख शशांक ते?
निवडतील निवडोत जाणते
मानी परी मन सुखद संभ्रमा- मानू चंद्रमा कोणता?

13) दृष्टान्त

एखादा विषय पटवून सांगताना दाखला (उदाहरण) देणे.

उदाहरणार्थ –

लहानपण दे गा देवा, मुंगी साखरेचा रवा।

14) अर्थान्तरन्यास

अर्थान्तरन्यास हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. एखाद्या विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरणे देणे आणि सिद्धान्त मांडणे. अर्थान्तर- दुसरा अर्थ, न्यास- शेजारी ठेवणे.

उदाहरण –

तदितर खग भेणे वेगळाले पळाले
उपवन-जल-केली जे कराया मिळाले
स्वजन गवसला जो त्याजपाशी नसे तो
कठिण समय येता कोण कामास येतो?

15) स्वभावोक्ती

एखाद्या व्यक्त्तीचे, प्राण्याचे, वस्तूचे, स्वाभाविक स्थितीचे, हालचालीचे यथार्थ पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन.

उदाहरण –

गणपतवाणी विडी पिताना चावायाचा नुसतीच काडी
म्हणायचा अन मनाशीच की या जागेवर बांधीन माडी
मिचकावुनी मग उजवा डोळा आणि उडवुनी डावी भिवई
भिरकावुनि ती तशिच द्यायचा लकेर जैसा गवई

16) चेतनगुणोक्ती

चेतनगुणोक्ती हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. जेव्हा एखादी अचेतन (निर्जीव) वस्तू सचेतन (सजीव) आहे असे मानून ती सजीव प्राण्याप्रमाणे, माणसाप्रमाणे वागते असे वर्णन केलेले असते तेव्हा ‘चेतनगुणोक्ती’ हा अलंकार होतो. चेतनगुणोक्ती म्हणजे चेतनाचे गुण सांगणारी उक्ती.

उदाहरण –

डोकी अलगद घरे उचलती । काळोखाच्या उशीवरूनी ।।
स्पष्टीकरण- काळोखाच्या उसवरून (निर्जीव) घरे आपली डोकी उचलतात म्हणजे झोपेतून जागी होतात. येथे घर हा निर्जीव घटक माणसाप्रमाणे वर्तन करतो असे वर्णन आल्यामुळे इथे चेतनगुणोक्ती अलंकार होतो.

17) असंगती

कारण एका ठिकाणी आणि त्याचे कार्य दुसऱ्याच ठिकाणी असे वर्णन असते.

कुणी कोडे माझे उकलिल का? कुणी शास्त्री रहस्य कळविल का?
हृदयी तुझ्या सखि, दीप पाजळे, प्रभा मुखावरी माझ्या उजळे
गुलाब माझ्या हृदयी फुलला, रंग तुझ्या गालावर खुलला

18) सार

एखाद्या वाक्यातील कल्पना चढत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधणे.

काव्यात नाटके रम्य, नाटकांत शकुंतला
त्यामध्ये चवथा अंक, त्यातही चार श्लोक ते

19) व्याजस्तुती

बाह्यतः स्तुती आणि आतून निंदा अथवा ह्याच्या उलट असे वर्णन.

होती वदनचंद्राच्या दर्शनाचीच आस ती
अर्धचंद्र तू द्यावा, कृपा याहून कोणती

20) व्याजोक्ती

एखाद्या गोष्टीचे खरे कारण लपवून खोटे दुसरेच कारण देणे. व्याजोक्ती म्हणजे व्याज + उक्ती=खोटे बोलणे.

येता क्षण वियोगाचे पाणी नेत्रांमध्ये दिसे
‘डोळ्यात काय गेले हे?’ म्हणूनी नयना पुसे

हे सुद्धा वाचा

Related Posts