मेनू बंद

अनुताई वाघ – सम्पूर्ण माहिती मराठी

आपण या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक अनुताई वाघ (१९१०-१९९२) यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Anutai Wagh यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

अनुताई वाघ - Anutai Wagh

अनुताई वाघ माहिती मराठी

अनुताई वाघ या आदिवासी समाजाच्या उद्धारासाठी कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म १७ मार्च, १९१० रोजी पुणे येथे झाला. सन १९२७ मध्ये त्या व्हर्नाक्युलर फायनल परीक्षेत नाशिक जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या व १९२९ मध्ये प्राथमिक शिक्षण प्रमाणपत्र परीक्षेत त्या पुणे विभागात सर्वप्रथम आल्या.

सन १९२९ ते १९४४ या काळात त्यांनी चांदवड – पिंपळगाव येथील प्राथमिक शिक्षण मंडळात आणि पुण्याच्या हुजूरपागेत प्राथमिक शिक्षिका म्हणून काम केले. नोकरी करीत असतानाच १९३७ मध्ये त्या रात्रशाळेतून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. पुढे १९६१ मध्ये त्या एसएनडीटी विद्यापीठाची बी. ए. ची परीक्षाही उत्तीर्ण झाल्या.

सन १९४५ मध्ये ग्रामसेविका प्रशिक्षण विद्यालये चालविण्यासाठी कार्यकर्ते तयार करण्याच्या उद्देशाने बोरिवली येथे अखिल भारतीय स्वरूपाचे एक शिबिर घेण्यात आले होते. या शिबिरात भाग घेण्यासाठी अनुताई बोरिवलीला गेल्या . त्या ठिकाणी त्यांची ताराबाई मोडक यांच्याशी भेट झाली. या भेटीने अनुताईंच्या जीवनाला वेगळे वळण लागले.

ताराबाई मोडक यांनी पालघर जिल्ह्यातील बोर्डी येथे ‘ ग्राम बाल शिक्षा केंद्र ‘ चालविले होते. या केंद्राद्वारे ग्रामीण बालशिक्षण, आदिवासी शिक्षण, प्रौढ शिक्षण यांसारखे उपक्रम त्यांनी हाती घेतले होते. या कार्यासाठी मदतनीस म्हणून ताराबाईंनी अनुताई वाघ यांची निवड केली. सन १९४५ ते १९५६ या काळात अनुताईंनी ताराबाई मोडक यांच्यासमवेत बोर्डी येथे ग्राम बाल शिक्षा केंद्राचे कार्य केले.

Anutai Wagh Information in Marathi

पुढे १९५६ पासून Anutai Wagh यांनी सध्याच्या पालघर जिल्ह्यातील कोसबाड ठिकाणी आपल्या शैक्षणिक कार्याला प्रारंभ केला. कोसबाडला त्यांनी विकासवाडीचा प्रयोग सुरू केला. सन १९७३ मध्ये त्या ग्राम बाल शिक्षा केंद्राच्या संचालिका बनल्या. या संस्थेच्या वतीने आज पाळणाघरे, बालवाड्या, पूर्वप्राथमिक शाळा, कुरणशाळा, प्रौढशिक्षण केंद्रे, कार्यानुभव प्रकल्प, बालसेविका वर्ग, अंगणवाडी प्रशिक्षण वर्ग, सकस आहार प्रशिक्षण वर्ग यांसारखे विविध शैक्षणिक प्रकल्प चालविले जात आहेत.

अनुताई वाघांनी चाळीस वर्षांहून अधिक काळ आदिवासींमध्ये समाजकार्य केले. आदिवासी मुले व स्त्रिया यांच्या विकासासाठी त्यांनी बरेच परिश्रम घेतले. आदिवासी मुलांच्या शिक्षणाबाबत वेगवेगळे प्रयोग करून त्यांच्यात शिक्षणाची गोडी निर्माण करण्याकडे अनुताईंनी खास लक्ष पुरविले होते. कोसबाडची विकासवाडी म्हणजे एकात्मिक बालविकास केंद्रच होय.

या विकासवाडीत बालकांपासून ते तेरा – चौदा वर्षे वयाच्या मुलांपर्यंत सर्व मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने प्रयोग चालू असतात. पाळणागृहे, विकासवाडी अध्यापन मंदिर, ग्राम बालसेविका विद्यालय यांसारख्या संस्थांमधून आदिवासी मुलांचा विकास साधण्याचे आणि त्यांना निरनिराळ्या प्रकारचे शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी चालविले होते. विकासवाडीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी अनुताईंनी समर्थपणे सांभाळली होती. आदिवासी स्त्रियांच्या कल्याणासाठीही त्यांनी बरेच प्रयत्न केले होते. ठाणे जिल्हा स्त्री – जागृती समितीच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी काम केले होते.

Anutai Wagh यांनी ‘ शिक्षणपत्रिका ‘ व ‘ सावित्री ‘ या मासिकांच्या संपादिका म्हणून काम केले होते. बालवाडी कशी चालवावी, कुरणशाळा, विकासाच्या मार्गावर, सहजशिक्षण ही पुस्तके तसेच लहान मुलांसाठीही अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे ‘ कोसबाडच्या टेकडीवरून ‘ हे आत्मवृत्तपर पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे.

पुरस्कार व सन्मान

अनुताई वाघांनी आदिवासी मुलांच्या कल्याणासाठी आणि आदिवासी भागात शिक्षणाच्या प्रसारासाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांना अनेक मानसन्मान लाभले आहेत. महाराष्ट्र शासनाने ‘ आदर्श शिक्षिका ‘ हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. महाराष्ट्र शासनाची ‘ दलितमित्र ‘ ही पदवी त्यांना मिळाली आहे. इचलकरंजीचे फाय फाऊंडेशन, मराठी विज्ञान परिषद या संस्थांनी त्यांचा पारितोषिक देऊन सन्मान केला आहे.

आंतरराष्ट्रीय बालकवर्षाचा बालकल्याणाचा पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा सावित्रीबाई फुले पुरस्कार, पुण्याच्या मातोश्री पारखे स्मृतिन्यासाचा आदर्श महिला हा किताब इत्यादी अनेक सन्मान त्यांना मिळाले आहेत. भारत सरकारने ‘ पद्मश्री ‘ हा सन्मान प्रदान करून त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा यथोचित गौरव केला आहे. सन १९८५ च्या जानकीदेवी बजाज पुरस्काराच्याही त्या मानकरी होत. अनुताई वाघ यांचा मृत्यू २७ सप्टेंबर, १९९२ ला झाला.

हे सुद्धा वाचा –

Related Posts