मेनू बंद

आत्मचरित्र म्हणजे काय

जागतिक आत्मचरित्रपर वाङ्‍मयात ज्यांना निर्विवादपणे उच्च स्थान आहे, असे भारतीय साहित्य म्हणजे महात्मा गांधींचे ‘सत्याचे प्रयोग’ (१९२७-१९२९) आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचे ‘आत्मकथन’ (१९३६) हे होय. जर तुम्हाला आत्मचरित्र म्हणजे काय याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर इथे आम्ही याबद्दल सोप्या शब्दात विस्ताराने माहिती दिली आहे.

आत्मचरित्र म्हणजे काय

आत्मचरित्र म्हणजे काय

आपल्या जीवनविषयक अनुभवांचे व तदनुषंगाने आपल्या व्यक्तिमत्त्वाचे स्वतः लेखकाने लेखनरूपाने घडविलेले दर्शन म्हणजे आत्मचरित्र होय. आत्मचरित्राप्रमाणे इतरही अनेक लेखनप्रकारांनी असे दर्शन घडविता येते. त्यांत खाजगी पत्रव्यवहार, मुलाखती, दैनंदिनी, रोजनामे (जर्नल्स), ख्रिस्ती धर्मकल्पनेनुसार केलेली पापनिवेदने, स्मृतिचित्रे व संस्मरणिका यांसारखे आत्मचरित्रपर लेखनप्रकार अंतर्भूत होतात.

आत्माविष्काराची मानवी प्रवृत्ती नैसर्गिक व सार्वत्रिक असल्याने आत्मचरित्रपर लेखन सर्वच भाषांत आढळून येते. एक साहित्यप्रकार म्हणून ज्यास आत्मचरित्र म्हटले जाते, ते आणि उपर्युक्त आत्मचरित्रपर लेखनप्रकार यांत फरक आहे. आत्मचरित्रामागे आत्माविष्काराची प्रेरणा, आत्मजीवनाच्या अर्थपूर्णतेची अभिज्ञता, स्वानुभवांतील निवडीची दृष्टी आणि लेखनशैलीविषयक भान अशा गोष्टी प्रेरक असतात.

ऐतिहासिक साहित्यकृतीप्रमाणे विशिष्टतेकडून सामान्यत्वाकडे जाण्याची क्षमता आत्मचरित्रात असते. म्हणूनच आत्मचरित्र एक ललित गद्यप्रकार मानला जातो. खाजगी पत्रादी आत्मचरित्रपर लेखनप्रकार पुष्कळदा विशिष्ट व्यक्तींसाठी व विशिष्ट व्यक्तिगत संदर्भात हाताळले जातात. या लेखनप्रकारांना तात्कालिक व प्रासंगिक पार्श्वभूमी असल्याने त्यांचा आशय आणि अर्थवत्ता ही मर्यादित असतात. संस्मरणिका आणि स्मृतिचित्रे यांत बरेचसे साम्य असले, तरी संस्मरणिकेत लेखक जे व्यापक अनुसंधान ठेवतो, तसे ते काहीशा त्रोटक आणि स्वायत्त स्मृतिचित्रांत नेहमीच आढळेल, असे नाही.

खरं तर हे दोनही लेखनप्रकार पुष्कळदा परस्परपर्यायी ठरू शकतात. आत्मचरित्र आणि संस्मरणिका यांतही फरक आहे. अनेकदा त्यांचा निर्देश समानार्थी होतो हे खरे परंतु सूक्ष्मपणे पाहिल्यास, संस्मरणिकेत लेखकाचा भर बहुधा इतर व्यक्तींवर व त्यांच्या अनुभवांवर असतो, असे दिसून येईल. याउलट आत्मचरित्राचे केंद्र लेखक स्वतःच असतो. म्हणजे असे, की आत्मचरित्र एककेंद्री असते आणि संस्मरणिका एककेंद्री नसते.

आत्मचरित्रास पत्रव्यवहारादी आत्मचरित्रपर लेखनप्रकारांचा एक प्रकारची कच्ची सामग्री म्हणून उपयोग होऊ शकतो आणि आत्मचरित्रकार तशा लेखनप्रकारांचा स्वेच्छेने उपयोग करू शकतो. सारांश, आत्मचरित्रपर लेखनाचे जे अनेक प्रकार संभवतात, ते एकमेकांस पूरक असले तरी एकमेकांचे पर्यायी ठरू शकत नाहीत.  

प्राचीन मराठीतील त्रोटक, प्रासंगिक व नोंदीवजा आत्मकथन नामदेव-तुकारामादी संतांच्या काव्यात व अन्य काव्यग्रंथांच्या उपोद्‍घात-उपसंहारांत आढळते. तुकारामाचे अभंग म्हणजे एक प्रकारचे त्याचे आध्यात्मिक आत्मचरित्र होय. बहिणाबाई, कचेश्वर व निरंजन रघुनाथ यांसारख्यांच्या स्वतंत्र, प्रांजळ व भावोत्कट आत्मकथा काहीशा विस्तृत आहेत. वाङ्‍मयीन व ऐतिहासिक महत्त्व असलेली गद्य आत्मचरित्रे नाना फडणीस, गंगाधरशास्त्री पटवर्धन व बापू कान्हो खांडेकर यांनी उत्तर पेशवाईत लिहिली.

अव्वल इंग्रजी कालखंडात नोंदीवजा आत्मकथन विष्णुबुवा ब्रह्मचाऱ्यांच्या वेदोक्त धर्मप्रकाश (१८५९ – २५ वे प्रकरण) यामध्ये आढळते. वासुदेव बळवंतांच्या कैफियत (१८७९) यामध्ये त्यांची संक्षिप्त जीवनकहाणी आहे. दादोबा पांडुरंगांचे आत्मचरित्र (१८८२) व बाबा पदमनजींचे अरुणोदय (१८८८) ही या कालखंडातील दोन उल्लेखनीय आत्मचरित्रे होत. यांपैकी दादोबांचे आत्मचरित्र सामाजिक दर्शनाच्या दृष्टीने व बाबा पदमनजींचे आत्मचरित्र धर्मांतरविषयक मानसचित्रणाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. संपूर्ण चरित्रदर्शनाच्या दृष्टीने उपर्युक्त सर्व आत्मचरित्रांत न्यूनता जाणवते. 

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला वि. दा. सावरकरांनी जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचे भाषांतर केले (१९०७). राजकीय जागृती करण्याचा हेतू त्यामागे होता. माझी जन्मठेप (१९२७) वशत्रूच्या शिबिरात (१९६५) हे सावरकरांचे लेखन संस्मरणिकेवजा आहे. त्यांच्या आत्मचरित्राचा पहिला खंड १९४९ त प्रसिद्ध झाला. प्रेरकता हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य होय.

हे सुद्धा वाचा –

Related Posts