मेनू बंद

बाबा पद्मनजी – संपूर्ण माहिती आत्मचरित्र

आपण या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक बाबा पद्मनजी (१८३१-१९०६) यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Baba Padmanji यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

बाबा पद्मनजी - संपूर्ण माहिती आत्मचरित्र |  Baba Padmanji

एकोणिसावे शतक भारतीय इतिहासात अनेक अर्थांनी विचारमंथनाचा काळ ठरला होता. या काळात राजकीय स्थित्यंतरांबरोबर जे सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक बदल भारतीय समाजात होऊ लागले होते त्या सर्वांनी अशा विचारमंथनाला चालना दिली होती. या सुमारास धार्मिक क्षेत्रांतही उलटसुलट मते व्यक्त केली जात होती.

हिंदू धर्मातील अनिष्ट चालीरीती, रूढी यांविरुद्ध आवाज उठवून हिंदू धर्मातच सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न काही विचारवंतांनी चालविला होता. याउलट, काहींना ख्रिस्ती धर्मातील मानवतावादी तत्त्वांचे विशेष आकर्षण वाटले होते; त्यामुळे ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करण्याकडे त्यांनी आपला कल दर्शविला होता. या दुसऱ्या वर्गातील समाजसुधारकांपैकी बाबा पद्मनजी हे एक होते.

बाबा पद्मनजी परिचय

बाबा पद्मनजी यांचा जन्म मे, १८३१ मध्ये बेळगाव येथे झाला. त्यांचे मूळचे आडनाव मुळे असे होते व ते जातीने कासार होते. त्यांचे पूर्वज व्यापारानिमित्त सुरतेस राहिले होते; त्यामुळे त्यांना सुरतकर हे आडनाव मिळाले. बाबा पद्मनजींच्या पूर्वजांचा सुरत येथे जवाहिन्याचा व्यवसाय होता; पण त्यांचे वडील पद्मनजी माणिकजी यांनी सब असिस्टंट सर्व्हेअर म्हणून सरकारी नोकरीत प्रवेश केला. बाबा पद्मनजींच्या घरचे वातावरण अत्यंत धार्मिक स्वरूपाचे होते.

साहजिकच, लहानपणापासूनच त्यांच्यावर धार्मिक संस्कार झाले होते. बालवयात त्यांचा कल धर्माभ्यास व धर्माचरणाकडे होता. अनेक धर्मग्रंथांचे त्यांनी वाचन केले होते; तसेच निरनिराळी व्रतवैकल्येही केली होती. बाबा पद्मनजींच्या वडिलांना नोकरीनिमित्त बेळगावला वास्तव्य करावे लागले. बाबांचे प्राथमिक शिक्षण बेळगावातच झाले. सुरुवातीची काही वर्षे मराठी शाळेत शिक्षण घेतल्यावर १८४३ मध्ये त्यांचे नाव बेळगावातील ख्रिस्ती मिशन स्कूलच्या इंग्रजी शाळेत दाखल करण्यात आले. पण ख्रिस्ती मिशन स्कूलमध्ये शिकत असतानाही त्यांच्यावर हिंदू धर्माचाच प्रभाव होता.

पुढे बाबा पद्मनर्जीच्या वडिलांची बदली मुंबई येथे झाली. मुंबईत बाबांनी एल्फिन्स्टन स्कूलमध्ये प्रवेश घेतला. विद्यार्थिदशेतच त्यांनी इंग्रजी, मराठी, संस्कृत, प्राकृत, कानडी, गुजराती इत्यादी भाषांचा अभ्यास केला होता. इ. स. १८४९ मध्ये त्यांनी डॉ. विल्सन यांच्या फ्री चर्च स्कूलमध्ये प्रवेश घेतला. ही घटना त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली.

‘ फ्री चर्च स्कूल ‘ मध्ये विद्यार्थ्यांना इतर शिक्षणाबरोबरच ख्रिस्ती धर्माचेही शिक्षण दिले जात असे. बाबा पद्मनजींनाही तेथे ख्रिस्ती धर्माचे शिक्षण मिळाले. त्यांनी ख्रिस्ती धर्मग्रंथांचा अभ्यास केला . त्यातूनच त्यांच्या ख्रिस्ती धर्माविषयी आकर्षण निर्माण झाले. अखेरीस १३ ऑगस्ट, १८५४ रोजी त्यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला.

ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यावर बाबा पद्मनजी वास्तव्यासाठी पुणे येथे आले. तेथील फ्री चर्च मिशनच्या शाळेत त्यांनी सुमारे सोळा वर्षे शिक्षक म्हणून काम केले. इ. स. १८६७ मध्ये त्यांना फ्री चर्च मिशनचे ‘ पालक ‘ म्हणून दीक्षा देण्यात आली ; पण पाच – सहा वर्षांतच त्या पदाचा त्यांनी राजीनामा दिला. १८७७ मध्ये बायबल आणि ट्रस्ट सोसायटीच्या संपादकाचे काम त्यांच्यावर सोपविण्यात आले. ही जबाबदारी त्यांनी जवळजवळ २५ वर्षे सांभाळली.

बाबा पद्मनजी याचे सामाजिक सुधारणेचे कार्य

बाबा पद्मनजींचा भारतीय समाजातील अनिष्ट चालीरीती, रूढी, परंपरा यांना विरोध होता आणि त्या बंद व्हाव्यात यासाठी जनतेत जागृती घडवून आणण्याचे प्रयत्न त्यांनी केले होते. त्यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करण्यापूर्वीच हिंदू धर्मात सुधारणा घडवून आणण्याची आवश्यकता प्रतिपादन केली होती. ते काही काळ दादोबा पांडुरंग यांनी स्थापन केलेल्या परमहंस सभेचे सभासद होते; त्यामुळे त्यांचा मूर्तिपूजा व जातिभेद या गोष्टींना विरोध होता. परमहंस सभेच्या सर्व सभासदांप्रमाणे त्यांनीही व्यक्तिगत जीवनात जातिभेदाचे पालन कधी केले नाही.

विधवा पुनर्विवाहाला त्यांनी पाठिंबा दर्शविला होता. याशिवाय हिंदू धर्मातील इतर अनिष्ट प्रथांना विरोध करण्यातही त्यांनी पुढाकार घेतला होता. आपल्या लिखाणाद्वारे हिंदू धर्मातील स्त्रियांच्या दुःस्थितीकडे लोकांचे लक्ष वेधण्याचे मौलिक कार्य त्यांनी केले होते. आपल्या ‘ यमुना पर्यटन ‘ या कादंबरीतून विधवा स्त्रियांच्या दुःखाचे दर्शन त्यांनी समाजाला घडविले होते.

बाबा पद्मनजींनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार विचारपूर्वक केला होता. हिंदू धर्मातील जातीयता, उच्च – नीच भेदभाव, स्त्रिया व अस्पृश्य यांना मिळत असलेली वाईट वागणूक या पार्श्वभूमीवर ख्रिस्ती धर्मातील उच्च नैतिक व मानवतावादी तत्त्वांचे त्यांना विशेष आकर्षण वाटले. त्यामुळे ख्रिस्ती धर्माचा त्यांनी स्वीकार केला. पुढे ख्रिस्ती धर्मातील मानवता, समता, सेवाभाव इत्यादी तत्त्वे कशी श्रेष्ठ आहेत, हे येथील लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न त्यांनी चालविला.

अर्थात, ख्रिस्ती धर्मात गेल्यावरही हिंदू धर्मात सुधारणा घडून याव्यात यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचे प्रयत्न त्यांनी चालू ठेवले होते. त्या दृष्टीने त्यांनी बरेच लिखाणही केले होते; परंतु त्यांच्या धर्मांतरामुळे त्यांनी चालविलेल्या या प्रयत्नांवर मर्यादा पडणे स्वाभाविक होते. त्यांच्या यासंबंधीच्या लेखनाच्या हेतूविषयी सर्वसामान्य लोकांना संशय वाटला तर ते त्या वेळच्या एकंदर परिस्थितीला धरूनच होते.

म्हणून धर्मसुधारणेच्या संदर्भात त्या वेळच्या इतर समाजसुधारकांनी मांडलेल्या विचारांचा लोकांच्या मनावर जेवढा प्रभाव पडला, तेवढा प्रभाव बाबा पद्मनजींना आपल्या लेखनाद्वारे पाडता आला नाही. बाबा पद्मनजींच्या कार्याला असलेल्या मर्यादा मान्य केल्या तरी सामाजिक व धार्मिक सुधारणांसंबंधीची त्यांची तळमळ व त्यामागचा त्यांचा प्रामाणिक हेतू याविषयी शंका घेता येणार नाही.

त्यांनी केलेल्या धर्मांतरामुळे समाजसुधारणेच्या क्षेत्रात प्रत्यक्ष कृती त्यांना फारशी करता आलीच नाही; कारण अशा प्रकारचा प्रयत्न हा अन्य धर्मांत हस्तक्षेप ठरला असता आणि लोकांनी तो मान्यही केला नसता. त्यामुळे त्यांनी सर्व भर त्यासंबंधीच्या लेखनावरच दिला होता. पण त्या वेळच्या परिस्थितीचा विचार करता त्यांचे मर्यादित स्वरूपातील कार्यही निश्चितच उपयुक्त होते असेच म्हणावे लागते.

वाङ्मयीन कार्य

बाबा पद्मनर्जीनी वाङ्मयीन क्षेत्रातही महत्त्वाची कामगिरी बजावली आहे . त्यांनी सन १८५७ मध्ये ‘ यमुना पर्यटन ‘ या नावाची कादंबरी लिहिली . मराठी भाषेतील ती पहिलीच सामाजिक कादंबरी होय . वर उल्लेख केल्याप्रमाणे विधवा स्त्रियांच्या दुःखाचे वर्णन तीत आहे ; पण कथानक , रचनासौंदर्य यांसारख्या गोष्टींचा मात्र त्यामध्ये अभाव दिसतो . १८८४ मध्ये त्यांनी ‘ अरुणोदय ‘ हे आत्मचरित्र लिहिले. याशिवाय इंग्रजी – मराठी व संस्कृत – मराठी शब्दकोशही त्यांनी तयार केले. काही काळ त्यांनी ‘ सत्यदिपिका ‘ हे नियतकालिकही चालविले.

डॉ. य. दि. फडके बाबा पद्मनजींचा निर्देश फुल्यांचे कर्तबगार सहकारी म्हणूनच करतात. महात्मा फुल्यांचे प्रारंभीचे बरेचसे लिखाण बाबा पद्मनजींच्या सत्यदिपिकेत प्रकाशित झाले आहे. ‘ विद्याखात्यातील ब्राह्मण पंतोजी ‘ हा फुल्यांचा पवाडा सत्यदिपिकेत छापण्यात आला होता. ‘ ब्राह्मणांचे कसब ‘ या फुल्यांच्या ग्रंथास बाबा पद्मनजींची प्रस्तावना आहे. बाबा पद्मनजींना ब्रिटिश सत्तेविषयी आपुलकी वाटत होती.

या देशात ज्या काही सुधारणा झाल्या आहेत त्या येथे ब्रिटिश सत्तेची स्थापना झाल्यामुळेच होऊ शकल्या, असे त्यांचे मत होते. बाबा पद्मनजी यांचा मृत्यू २९ ऑगस्ट, १९०६ ला झाला.

हे सुद्धा वाचा –

Related Posts