आपण या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Balkavi Trimbak Bapuji Thombre यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

बालकवी ठोंबरे कोण होते
बालकवी ठोंबरे यांचे संपूर्ण नाव त्र्यंबक बापूजी ठोंबरे असे होते. त्यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे १३ ऑगस्ट, १८९० रोजी झाला . बालकवींचे वडील पोलीस खात्यात नोकरीस होते. त्यांना आपल्या नोकरीनिमित्त निरनिराळ्या गावी फिरावे लागले होते; त्यामुळे बालकवींच्या शिक्षणाची काहीशी आबाळच झाली. एरंडोल, यावल, जामनेर, धुळे, जळगाव अशा गावी त्यांचे शिक्षण झाले.
सन १९०७ मध्ये जळगाव येथे कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या कविसंमेलनात बालकवींनी वयाच्या सतराव्या वर्षी आपली कविता सादर केली. बालवयातच त्यांनी प्रकट केलेल्या काव्यगुणांचे उपस्थितांनी कौतुक केले या संमेलनातच कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी त्यांचा ‘ बालकवी ‘ ही पदवी देऊन गौरव केला. पुढे याच नावाने ते प्रसिद्धीस आले.
Balkavi Thombre Information in Marathi
Balkavi Thombre यांच्या फुलराणी, संध्यारजनी, तारकांचे गाणे, अरुण, आनंदी – आनंद, निर्झरास, श्रावणमास यांसारख्या कवितांनी मराठी काव्यरसिकांना संमोहित केले होते. आपल्या सभोवतालच्या सृष्टीचे त्यांनी अतिशय अचूक शब्दांत व लडिवाळ भाषेत वर्णन केले आहे. फुलराणीचे वर्णन करताना ते म्हणतात –
” हिरवे हिरवे गार गालिचे
हरित तृणांच्या मखमालीचे
त्या सुंदर मखमालीवरती
फुलराणी ही खेळत होती “
अर्थात, बालकवींचे सृष्टीचे वर्णन म्हणजे सृष्टीचे केवळ बाह्य चित्र नाही, तर त्यांच्या संस्कारक्षम मनावर तिचे उमटलेले प्रतिबिंब आहे; निसर्गाशी तादात्म्य पावलेल्या कविमनाचे ते सहजोद्गार आहेत. बालकवींच्या कवितेमध्ये निसर्गवर्णनावर विशेष भर आहे. निसर्गामध्ये त्यांना मानवी चैतन्याचा प्रत्यय येतो व त्याचा आविष्कार ते आपल्या काव्यामधून घडविताना दिसून येतात.
त्यांच्या उत्कट, हळव्या व निर्व्याज वृत्तीचा प्रत्ययही त्यांच्या काव्यामधून आपणास येतो. नादमाधुर्य हे त्यांच्या कवितेचे आणखी एक वैशिष्ट्य सांगितले जाते. बालकवींना निसर्गाविषयी वाटणारे प्रेम आणि त्या प्रेमाचा त्यांनी आपल्या काव्यातून घडविलेला अपूर्व आविष्कार यामुळेच त्यांना ‘ निसर्गकवी ‘ असे म्हटले जाते. ५ मे, १९१८ रोजी त्यांचा अपघाती व अकाली मृत्यू झाला. ‘ समग्र बालकवी ‘ हा त्यांच्या कवितांचा संग्रह प्रसिद्ध आहे.
हे सुद्धा वाचा –