मेनू बंद

बाळशास्त्री जांभेकर माहिती मराठी

आपण या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक बाळशास्त्री जांभेकर (१८१२-१८४६) यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Balshastri Jambhekar यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

बाळशास्त्री जांभेकर माहिती मराठी - Balshastri Jambhekar

बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी पत्रकारितेचे जनक म्हणूनही ओळखले जाते. भारतातील ब्रिटिश राजवटीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी ‘दर्पण’ नावाचे मराठी भाषेतील हे पहिले वृत्तपत्र काढले होते. बाळशास्त्री जांभेकर यांनी भारतातील ब्रिटीश राजवटीत येणाऱ्या काळात मुद्रित माध्यमांचे महत्त्व आणि शक्ती अचूकपणे समजून घेतली होती. इंग्रजांचा पाडाव करून स्वातंत्र्य मिळवायचे असेल, तर जनतेला जागृत करणे अत्यावश्यक आहे आणि त्यासाठी मुद्रित माध्यम हे सर्वात उपयुक्त साधन आहे, याची त्यांना खात्री होती.

बाळशास्त्री जांभेकर माहिती मराठी

मराठी वृत्तपत्रांचे जनक‘ बाळशास्त्री जांभेकरांचा जन्म ६ जानेवारी, १८१२ रोजी झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभुर्ले या गावी झाला. त्यांचे संपूर्ण नाव बाळ गंगाधरशास्त्री जांभेकर असे होते. ते एका व्युत्पन्न पुराणिकाचे पुत्र होते. त्यांची बुद्धी जात्याच अतिशय ते व संशोधक होती. त्यामुळे लहान वयातच त्यांनी संस्कृत, मराठी, इंग्रजी, गुजराती, बंगाली, फारसी या भाषा आत्मसात केल्या होत्या. त्याचप्रमाणे गणित, भूगोल इत्यादी विषयांमध्येही त्यांनी प्रावीण्य मिळविले होते.

बाळशास्त्री जांभेकरांना मिळालेल्या कुशाग्र बुद्धीच्या वरदानामुळे ते तरुणपणात महत्त्वाच्या पदांवर काम करू शकले. इ. १८३० मध्ये वयाच्या अठराव्या वर्षी जांभेकर यांची बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे उपसचिव म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर दोनच वर्षांनी त्यांची संघटनेच्या ‘नेटिव्ह सेक्रेटरी’पदी नियुक्ती झाली.

पुढे अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक म्हणून सरकारच्या वतीने बाळशास्त्रींची नेमणूक झाली. त्या काळात त्यांनी कानडी भाषा शिकून घेतली. त्यानंतर १८३४ मध्ये मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजात त्यांची असिस्टंट प्रोफेसर म्हणून नियुक्ती झाली. याच कॉलेजात पुढे त्यांनी गणिताचेही अध्यापन केले. एल्फिन्स्टन कॉलेजातील ते पहिले भारतीय असिस्टंट प्रोफेसर होत.

मुंबई परिसरातील प्राथमिक शाळांची तपासणी करण्यासाठी त्यांना सरकारने निरीक्षक म्हणून नियुक्त केले होते. मुंबई परिसरातील पहिल्या प्रशिक्षण महाविद्यालयाचे ते संचालकही होते. अर्थात वर म्हटल्याप्रमाणे जबाबदारीची पदे सांभाळत त्यांनी शिक्षणही सुरू ठेवले. त्यांना अनेक विषयांत रुचि होती आणि त्या विषयांत नवनवीन ज्ञान मिळवण्याची त्यांची इच्छा होती. बाळशास्त्री जांभेकर यांचे १७ मे १८४६ रोजी वयाच्या ३४ व्या वर्षी अकाली निधन झाले.

Balshastri Jambhekar Information in Marathi

Balshastri Jambhekar यांचे सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीचा पाया घातला. मराठी भाषेतील ‘ दर्पण ‘ हे पहिले वृत्तपत्र त्यांनी सन १८३२ मध्ये सुरू केले. ‘ दर्पण ‘ हे साप्ताहिक होते आणि ते इंग्रजी व मराठी अशा दोन भाषांत प्रसिद्ध होत असे. त्याचा पहिला अंक ६ जानेवारी , १८३२ रोजी प्रसिद्ध झाला. ६ जानेवारी हा बाळशास्त्रींचा जन्मदिन (आणि ‘ दर्पण’चा प्रकाशन दिनही ! ) ‘ पत्रकार दिन ‘ म्हणून यथार्थतेने साजरा केला जातो.

या पत्रातील इंग्रजी भाग बाळशास्त्री जांभेकर लिहीत व त्याचे मराठी भाषांतर भाऊ महाजन करीत असत. ‘ दर्पण ‘ च्या पहिल्याच अंकात त्याचे प्रयोजन स्पष्ट करताना जांभेकरांनी असे म्हटले होते की, “ स्वदेशीय लोकांमध्ये विलायतेतील विद्यांचा अभ्यास अधिक व्हावा आणि या देशाची समृद्धी व येथील लोकांचे कल्याण यांविषयी स्वतंत्रतेने व उघड रीतीने विचार करावयास स्थळ व्हावे या इच्छेने हे वृत्तपत्र सुरू केले आहे. ‘ अभ्यास अधिक व्हावा आणि या देशाची समृद्धी व येथील लोकांचे कल्याण यांविषयी स्वतंत्रतेने व उघड रीतीने विचार करावयास स्थळ व्हावे या इच्छेने हे वृत्तपत्र सुरू केले आहे.”

वृत्तपत्रांच्या सामर्थ्याविषयी बाळशास्त्रींना यथार्थ जाणीव होती. त्यासंबंधी आपल्या ‘ दर्पण ‘ च्या दुसऱ्याच अंकात त्यांनी असे लिहिले होते की, ‘ ही शक्ती आपल्या देशात पूर्वी असल्याचा इतिहासात दाखला नाही. सर्व जगामध्ये पाश्चात्त्य राष्ट्रांची जी प्रगती झाल्याचे आपणास दिसते, त्याचे प्रमुख कारण म्हणजे वृत्तपत्रे. ज्ञानप्रसाराचे आणि लोकजागृतीचे हे अद्भुत साधन आहे. ज्ञान आणि विज्ञान यांचा पुरस्कार करणे, सार्वजनिक नीतिमत्ता सुधारणे, जनतेला तिची कर्तव्ये सांगणे, राज्यकर्त्यांच्या हकूमशाहीला लगाम घालणे हे सामर्थ्य वृत्तपत्रांच्या अंगी आहे .

ज्या देशांत वृत्तपत्रांना लोकांच्या मनावर परिणाम करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य मिळाले आहे ते देश खचितच धन्य होत ! ” दर्पण हे वृत्तपत्र सुमारे आठ वर्षांहून अधिक काळ लोकजागृतीचे आपले कार्य नेटाने पार पाडीत राहिले. २६ जून, १८४० रोजी दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला. ते बंद होण्याच्या सुमारास म्हणजे १८४० मध्ये बाळशास्त्री जांभेकर व भाऊ महाजन यांनी ‘ दिग्दर्शन ‘ या नावाचे मासिक सुरू केले. त्यामध्ये मुख्यत्वे करून शास्त्रीय नीतिविषयक लेख प्रसिद्ध होत असत.

बाळशास्त्रींनी असे म्हटले होते की, ” बंगाल प्रांतासारख्या मागासलेल्या प्रांताची तेथे ब्रिटिश सत्तेच्या झालेल्या स्थापनेनंतर झपाट्याने सुधारणा झाली. यास इंग्रजी शिक्षणाची सुरुवात व वर्तमानपत्रांचा प्रसार या दोन्ही गोष्टी प्रामुख्याने कारणीभूत झाल्या होत्या. तेव्हा बंगालच्या मार्गाने गेल्यास महाराष्ट्रीय समाजात सुधारणा होण्यासही फार विलंब लागणार नाही. ”

बाळशास्त्री जांभेकर यांचे समाजसुधारणेचे कार्य

दर्पण ‘ व ‘ दिग्दर्शन ‘ यांमधील जांभेकरांच्या लेखांवरून त्यांचा समाजसुधारणेविषयीचा दृष्टिकोन स्पष्ट होतो. आपल्या समाजाचे मागासलेपण दूर व्हावे आणि त्याची प्रगतीच्या दिशेने वाटचाल व्हावी, अशी त्यांची तळमळ होती. भारतात इंग्रजी सत्तेची झालेली स्थापना आणि त्यानंतर भारतीय समाजात होऊ घातलेले परिवर्तन या घडामोडींचे त्यांनी बारकाईने अवलोकन केले होते. त्यावरून त्यांची अशी खात्री पटली होती की, आपल्या समाजाची प्रगती होण्यासाठी आपण पाश्चात्त्य विद्या आत्मसात केली पाहिजे.

ज्ञान व विज्ञान यांच्या प्रसारावर भर दिला पाहिजे, त्याचप्रमाणे आपल्या धर्मातील अनिष्ट प्रथांचा त्याग करण्याची तयारी आपण होऊन दर्शविली पाहिजे. त्यांच्या या विचारांतूनच त्यांनी समाजसुधारणेचा पक्ष घेतला होता. भारतीय समाजातील व हिंदू धर्मातील अनिष्ट प्रथा बंद पडाव्यात, किमान त्यांना आळा बसावा, अशी त्यांची मनोभूमिका होती. त्यामुळे विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षण यांचा त्यांनी पुरस्कार केला.

आपल्या लोकांच्या मनावरील परंपरागत विचारांचा पगडा दूर व्हावा, यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. विधवाविवाहाला शास्त्रीय आधार शोधून काढण्याची कामगिरी त्यांनी केली. त्याकरिता गंगाधरशास्त्री फडके यांच्याकडून त्यांनी त्याविषयीचा एक ग्रंथ लिहवून घेतला. अर्थात, समाजसुधारणेच्या बाबतीत जांभेकरांनी पुनरुज्जीवनवादी सुधारणावाद किंवा परंपरानिष्ठ परिवर्तनवाद यांवरच भर दिला होता. तत्कालीन समाजाचा कर्मठपणा विचारात घेता ते योग्यही होते.

बाळशास्त्री जांभेकरांच्या जीवनातील ‘श्रीपती शेषाद्री प्रकरण’ हे त्यांनी सुधारणेच्या संदर्भात घेतलेल्या पुरोगामी भूमिकेमुळे त्यांना किती त्रास सहन करावा लागला आणि सनातनी हिंदुत्ववाद्यांकडून त्यांचा कसा छळ झाला, याचा पुरावा आहे. जांभेकर हे सुधारणावादी असले तरी त्यांना हिंदू धर्माचा अभिमान होता. त्यामुळे हिंदू धर्मातून इतर धर्मात आलेल्यांना पुन्हा हिंदू धर्मात आणण्याचा त्यांचा आग्रह होता आणि तोच त्यांचा प्रयत्न होता. तिथून प्रकरण समोर आले.

शेषाद्री नावाच्या ब्राह्मणाची नारायण व श्रीपती ही दोन मुले मुंबईत ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या शाळेत शिकत होती. त्यांतील नारायण याने ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. त्याचा धाकटा भाऊ श्रीपती याने नारायणप्रमाणे धर्मांतर करू नये म्हणून जांभेकरांनी पुढाकार घेण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी श्रीपतीच्या वडिलांना हाताशी धरून कोर्टामार्फत श्रीपतीचा ताबा मिळविला . खरे तर श्रीपतीने धर्मांतर केलेच नव्हते. पण तो काही काळ मिशनऱ्यांनी चालविलेल्या शाळेत राहिला होता . एवढ्या कारणावरून त्याला हिंदू मानण्यास परंपरानिष्ठ व सनातनी ब्राह्मणांचा विरोध होता.

त्यावर बाळशास्त्री जांभेकरांनी श्रीपतीला शास्त्रोक्त प्रायश्चित्त देऊन आणि शुद्ध करून हिंदू धर्मात परत घेता येईल, असे प्रतिपादन केले. इतकेच नव्हे तर त्यांनी या शुद्धीकरणाला काही धर्मपंडितांची व शंकराचार्यांची अनुमती मिळवून श्रीपतीला हिंदू धर्मात परत घेतले. तथापि, सनातनी ब्राह्मणांना हे शुद्धीकरण रुचले नाही. त्यांनी जांभेकरांवर बहिष्कार टाकला आणि त्यांची निंदानालस्ती आरंभिली. जांभेकरांच्या मृत्यूनंतरही त्यांची बदनामी करण्याचे उद्योग सनातन्यांनी थांबविले नाहीत.

बाळशास्त्री जांभेकर यांचे शिक्षणक्षेत्रातील कार्य

जांभेकरांनी शिक्षणक्षेत्रातही महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती. शिक्षणक्षेत्राशी त्यांचा निकटचा संबंध होता. त्या क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केले होते. महाराष्ट्रात शिक्षणप्रसाराच्या सुरुवातीच्या काळात निरनिराळ्या विषयांवरील अभ्यासासाठी पाठ्यपुस्तके तयार करण्याचे अतिशय कठीण असे कार्य बाळशास्त्रींनी केले होते . इतिहास, भूगोल, गणित, व्याकरण, छंदशास्त्र, नीतिशास्त्र इत्यादी विविध विषयांवरील मराठी भाषेतील पहिली पाठ्यपुस्तके त्यांनीच रचली होती.

बाळशास्त्री जांभेकर यांचे ग्रंथ साहित्य

बाळशास्त्रींना अनेक विषयांत गती होती. वाङ्मय व विज्ञान या दोन्ही शाखांमध्ये ते निष्णात होते. गणित व ज्योतिषशास्त्र या विषयांतही त्यांचा अधिकार फार मोठा होता. ‘ शून्यलब्धि ‘ वर मराठी भाषेतील पहिले पुस्तक त्यांनी लिहिले. जांभेकर इतिहाससंशोधक म्हणूनही ज्ञात आहेत. त्यांनी प्राचीन भारतीय शिलालेख व ताम्रपट यांसंबंधी संशोधन केले आणि त्यावर काही लेख लिहिले.

यासंबंधीचे त्यांचे शोधनिबंध रॉयल एशियाटिक सोसायटीच्या नियतकालिकांत प्रसिद्ध झाले होते. नीतिकथा, इंग्लंड देशाची बखर – १ व २ , बालव्याकरण, हिंदुस्थानचा इतिहास, भूगोलविद्या, इंग्रजी – मराठी धातुकोश यांसारख्या ग्रंथांचे कर्तृत्व बाळशास्त्रींकडे जाते ; या व्यतिरिक्त ज्ञानेश्वरीचे संपादनही त्यांनी केले आहे.

बाळशास्त्री जांभेकरांची विद्वत्ता अष्टपैलू होती. ‘राष्ट्रजागृतीचे अग्रदूत’, ‘मराठी वृत्तपत्रांचे जनक’, ‘आद्य इतिहाससंशोधक’, ‘आधुनिक महाराष्ट्राचा आद्य ऋषी’, ‘सुधारणावादाचे आद्य प्रवर्तक’, ‘व्यासंगी पंडित’, ‘आद्य समाजसुधारक’ अशा बिरुदावलींनी त्यांचा यथार्थ गौरव केला जातो; खरे तर, त्यांनी आपल्या विद्वत्तेचा वापर केवळ स्वतःच्या फायद्यासाठी न करता ती समाजाच्या हितासाठी उपयोगात आणली; यातच बाळशास्त्रीजींचे मोठेपण सामावले आहे.

जांभेकरांनी आपल्या उभ्या आयुष्यात सतत समाजजागृतीच्या कार्याची चिंता वाहिली. महाराष्ट्रातील इंग्रजी अमदानीच्या सुरुवातीच्या कालखंडात येथील समाज अंधकारात चाचपडत होता. परकीय राजवटीने आरंभिलेल्या व्यापक परिवर्तनाच्या संदर्भात आपण कोणती भूमिका घ्यावी, हेच समाजातील बहुसंख्य लोकांना समजेनासे झाले होते.

बाळशास्त्री जांभेकर हे समाजाच्या उन्नतीसाठी काम करणाऱ्या काही मोजक्या लोकांपैकी त्या काळी आघाडीवर होते. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात महाराष्ट्राच्या बुद्धीला आधुनिक स्थान मिळालेले मानले जाते. त्याला त्याच्या वळणाचा पहिला मान मिळाला. म्हणूनच महाराष्ट्रातील सुरुवातीच्या समाजसुधारकांमध्ये त्यांचे स्थान श्रेष्ठ मानले जाते.

पहिले मराठी वृत्तपत्र आणि पहिले मराठी मासिक अशा या योगदानाबद्दल त्यांना मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखले जाते. त्यांचा जन्मदिवस आणि योगायोगाने दर्पणच्या पहिल्या अंकाच्या प्रकाशनाचा दिवस ६ जानेवारी असून त्यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.

हे सुद्धा वाचा –

Related Posts