आपण या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक बेहरामजी मलबारी (१८५३-१९१२) यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Behramji Malabari यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

बेहरामजी मलबारी
बालविवाहविरोधी विचारांचे व चळवळीचे जनक आणि प्रेरक म्हणून बेहरामजी मलबारी भारताच्या विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासात प्रसिद्ध आहेत. ते विधवा – पुनर्विवाह पद्धतीचे कट्टर समर्थक होते. समाजातील दुर्बल घटकांचे कैवारी म्हणूनही त्यांचा निर्देश केला जातो. त्यांचा जन्म इ स. १८५३ मध्ये गुजरातेतील बडोदा (वडोदरा) येथील एका पारशी कुटुंबात झाला.
इंग्रजी मिशनऱ्यांच्या शाळेत शिकलेल्या बेहरामजींवर रेव्हरंड डॉ . विल्सन यांच्या विचारांचा व व्यक्तिमत्त्वाचा मोठाच प्रभाव पडला होता. ‘ इंडियन म्यूज इन इंग्लिश गार्ब ‘ या पुस्तकामुळे इंग्लंडमधील विचारवंतांना त्यांचा परिचय झाला. त्यांचा हा ग्रंथ इंग्लंडमध्ये नावाजला गेला.
विधवा पुनर्विवाहाचे समर्थन
ऑगस्ट, १८८४ मध्ये त्यांनी लिहिलेली ‘ बालविवाह व महिलांवर सक्तीने लादण्यात आलेले वैधव्य – काही टिपणे ‘ ही बालविवाहाच्या प्रथेवर व या प्रथेमुळे महिलांवर जणू सक्तीनेच लादण्यात येणाऱ्या वैधव्यावर प्रकाश टाकणारी पुस्तिका प्रकाशित झाली. परंपरावादी धर्मनिष्ठ, इंग्रजी शिक्षणाने शहाणा झालेला नवशिक्षित वर्ग, नव्याने उदयास येत असलेला विचारवंतांचा वर्ग आणि पुरोगामी समाजसुधारक अशा सर्वच संवेदनशील वर्गांमध्ये या पुस्तिकेने एक प्रचंड वैचारिक वादळ निर्माण केले.
समाजातील विधवांच्या प्रश्नास व स्त्रियांना अकाली प्राप्त होणाऱ्या वैधव्यास बालविवाह पद्धतीच मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे, हा विचार त्यांनी या पुस्तिकेतून व नंतरही समर्थपणे मांडला. बेहरामजी हे विधवा पुनर्विवाहाचे कट्टर समर्थक होते. विधवांच्या दुःस्थितीबद्दल त्यांना अतिशय वाईट वाटत असे . त्यामुळेच , विधवा पुनर्विवाहाचे समर्थन करतानाच त्यांनी समाजातील वैधव्याला मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरणाऱ्या बालविवाह पद्धतीवर कठोर प्रहार केले.
बालविवाह प्रथेचे निर्मूलन करण्यासाठी विवाहित विद्यार्थ्यांना विद्यापीठांच्या परीक्षांना बसू देऊ नये, सरकारी खात्यात नोकरी देताना अविवाहित उमेदवारांना प्राधान्य द्यावे, बालविवाहाचे दुष्परिणाम स्पष्ट करणाऱ्या पाठांचा शालेय शिक्षणक्रमात अंतर्भाव करावा, विधवांना पुनर्विवाहाचा हक्क असावा व या हक्काची त्यांना जाणीव करून द्यावी, विधवा – विवाहात पौरोहित्य करणान्यास वाळीत टाकण्यास कायद्याने बंदी करावी यांसारख्या सूचना बेहरामजींनी शासनास केल्या होत्या.
त्यातून बालविवाह प्रथा व विधवा पुनर्विवाहाचा प्रश्न या दोहोंचा त्यांनी किती मूलगामी स्वरूपाचा अभ्यास केला होता, हे स्पष्ट होते. सन १८८४ – ९१ या सात वर्षांच्या काळात त्यांनी चालविलेल्या व्यापक आंदोलनाची आणि त्यांनी केलेल्या वैचारिक जागृतीचीच परिणती संमतिवय विधेयक पारित होण्यात झाली, असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही.
समाजसुधारणेच्या कार्यास आयुष्यभर स्वतःस वाहून घेणारे बेहरामजी एक खंदे पत्रकार म्हणूनच त्यांच्या समकालिनांमध्ये अधिक प्रसिद्ध होते . खरे तर, आपली पत्रकारिताच त्यानी समाजसुधारणेच्या अधिक व्यापक कार्यासाठी पणास लावली होती. एका अर्थी, ते ‘ समाजसुधारक – पत्रकार होते, असेच म्हणणे अधिक सयुक्तिक ठरेल . त्यांनी सन १८८० मध्ये ‘ इंडियन स्पेक्टॅटर ‘ हे साप्ताहिक सुरू केले.
इंडियन स्पेक्टॅटरबरोबरच दादाभाई नौरोजी चालवित असलेल्या ‘ व्हाईस ऑफ इंडिया ‘ (१८८८) या नियतकालिकामध्येही त्यांनी लेखन केले. ‘ इंडियन स्पेक्टॅटर ‘ हे साप्ताहिक वीस वर्षे समर्थपणे चालविणाऱ्या बेहरामजींनी ‘ व्हाईस ऑफ इंडिया’च्या संपादन कार्यातही दादाभाईंना भरीव सहयोग दिला. ‘ ईस्ट अँड वेस्ट ‘ (१९०१) या नियतकालिकाचेही ते संपादक होते.
सेवासदन ची स्थापना
सन १ ९ ०८ मध्ये बेहरामजींनी दयाराम गिडुमल यांच्या सहकार्याने मुंबई येथे ‘ सेवासदन ‘ ही संस्था स्थापन केली. मुंबईप्रमाणेच अहमदाबाद व सुरत येथेही ‘ सेवासदन ‘ या संस्थेच्या शाखा स्थापन झाल्या होत्या. २ ऑक्टोबर, १९०९ रोजी पुणे येथे ‘ सेवासदन ‘ ही संस्था स्थापन करताना रमाबाई रानडे यांनी बेहरामजींकडूनच प्रेरणा घेतली होती, असेही म्हणण्यास प्रत्यवाय नसावा.
बेहरामजी मलबारी यांची ग्रंथसंपदा
इंडियन म्यूज इन इंग्लिश गार्ब, बालविवाह व महिलांवर सक्तीने लादण्यात आलेले वैधव्य – काही टिपणे, गुजरात अँड गुजरातीज हे इंग्रजी पुस्तक. गुजराती भाषेत लिहिलेल्या ‘ नीती विनोद ‘ या त्यांच्या भावगीत संग्रहात त्यांनी बालविवाहाचे राक्षसी परिणाम व बालविवाहाच्या प्रथेतून महिलांवर लादले गेलेले वैधव्य यांबाबतच्या आपल्या भावना व कल्पना शब्दबद्ध केल्या आहेत.
हे सुद्धा वाचा –