मेनू बंद

दादोबा पांडुरंग तर्खडकर माहिती मराठी

आपण या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक दादोबा पांडुरंग तर्खडकर (१८१४-१८८२) यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Dadoba Pandurang Tarkhadkar यांच्या बद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

दादोबा पांडुरंग तर्खडकर माहिती मराठी - Dadoba Pandurang Information in Marathi

दादोबा पांडुरंग हे मुंबईतील समाजसुधारक आणि मराठी भाषा-तज्ञ होते. त्यांचा जन्म तर्खडकर झाला होता, पण नंतरच्या आयुष्यात त्यांनी आडनाव कधी वापरले नाही. विधवा-पुनर्विवाह आणि स्त्रियांच्या शिक्षणाचे समर्थन करताना त्यांनी धर्म आणि सामाजिक सुधारणांवर विधी आणि जातीचे विरोधक म्हणून विपुल लेखन केले. आत्माराम पांडुरंग यांचे ते भाऊ होते.

दादोबांचे वाङ्मयीन कार्यही मोलाचे आहे. ‘ मराठी भाषेचे व्याकरण ‘ लिहून त्यांनी मराठीच्या व्याकरणाचा पाया घालण्याचे कार्य केले; त्यामुळे ‘ मराठी भाषेचे पाणिनी ‘ असा त्यांचा उल्लेख केला जातो. खाजगी हायस्कूलमध्ये जाण्यापूर्वी पांडुरंगने चार वर्षे स्थानिक शाळेत शिक्षण घेतले आणि त्यानंतर बॉम्बे नेटिव्ह स्कूल आणि बुक सोसायटीमध्ये शिक्षण घेतले. ते वेस्ट स्कॉलरशिपचा प्राप्तकर्ता होते आणि त्यांनी एल्फिन्स्टन येथे अभ्यास केला आणि पोर्तुगीज, पर्शियन आणि संस्कृतसह अनेक भाषा ते शिकले.

दादोबा पांडुरंग तर्खडकर माहिती मराठी

दादोबा पांडुरंग यांचे पूर्ण नाव दादोबा पांडुरंग तर्खडकर होते. मात्र, त्यांना मराठी लोक दादोबा पांडुरंग या नावाने ओळखतात. त्यांचा जन्म ९ मे १८१४ रोजी मुंबईत एका वैश्य कुटुंबात झाला. त्यांचे कुटुंब मूळचे वसईजवळील तर्खड गावचे; त्यामुळे त्यांना तर्खडकर हे आडनाव पडले. त्यांचे आजोबा व्यवसायानिमित्त मुंबईत आले आणि नंतर तिथेच स्थायिक झाले.

दादोबाचे वडील धार्मिक होते. साहजिकच दादोबावर लहानपणी धार्मिक संस्कार झाले. वडिलांमुळेच ते मराठी कवितेच्या प्रेमात पडले. त्यांचे प्राथमिक शिक्षण विविध छोट्या शाळांमध्ये झाले. त्यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये इंग्रजीचे शिक्षण घेतले. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर दादोबा काही दिवस जावरा संस्थानच्या नवाबाकडे त्यांचे खाजगी शिक्षक म्हणून राहिले. त्यानंतर त्यांना एल्फिन्स्टन संस्थेत शिक्षकाची नोकरी मिळाली. नंतर सुरतमध्ये सुरू झालेल्या इंग्रजी शाळेत त्यांनी शिक्षक म्हणूनही काम केले.

इ. स. १८४६ मध्ये मुंबईतील ट्रेनिंग कॉलेजच्या संचालकपदी त्यांची नियुक्ती झाली. इ. स. १८५२ मध्ये दादोबांची डेप्युटी कलेक्टर म्हणून नेमणूक करण्यात आली. या पदावर असताना त्यांनी १८५७ च्या भिल्लांच्या बंडाचा बीमोड केला. त्यांच्या या कामगिरीबद्दल सरकारने त्यांना ‘रावबहादूर’ हा किताब दिला. नोकरीतून निवृत्त झाल्यानंतरही दादोबांनी काही काळ एज्युकेशनल ट्रान्सलेटर म्हणून काम केले . सरकारी नोकरीत असतानाच त्यांनी आपल्या सार्वजनिक जीवनास प्रारंभ केला होता. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा मृत्यू १७ ऑक्टोबर, १८८२ रोजी झाला.

Dadoba Pandurang Tarkhadkar Information in Marathi

दादोबा पांडुरंग यांचा महाराष्ट्रातील सुरुवातीच्या काळातील समाजसुधारकांमध्ये अंतर्भाव करण्यात येतो. या ठिकाणी इंग्रजी सत्तेची स्थापना झाल्यानंतर आधुनिक ज्ञान व विद्या यांचा प्रसार होऊ लागला आणि त्यातूनच नव्या विचारांना चालना मिळाली. इंग्रजी शिक्षणामुळे डोळस बनून स्वधर्मातील वैगुण्ये ध्यानी घेणारा तरुणांचा एक नवा वर्ग एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात महाराष्ट्रात निर्माण झाला.

दादोबा पांडुरंग हे अशा तरुणांपैकीच एक होते. इंग्र शिक्षणाच्या प्रभावामुळे त्यांना एक नवी दृष्टी प्राप्त झाली होती. आपल्या समाजातील उणिवा व दोष त्यांच्या ध्यानी येऊ लागले होते. हिंदू धर्मातील अनिष्ट चालीरीती, रूढी, दुष्ट प्रथा – परंपरा, अंधश्रद्धा, देवभोळेपणा इत्यादी गोष्टींमुळे स्वधर्माविषयी त्यांच्या मनात निराशेची भावना निर्माण झाली होती. वरील गोष्टीच हिंदू धर्माच्या अधःपतनास कारणीभूत झाल्या आहेत, अशी त्यांची पक्की खात्री पटली होती.

याच सुमारास ख्रिस्ती मिशनऱ्यांनी भारतात ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्याचे कार्य हाती घेतले होते. या धर्मातील मानवतावादी तत्त्वांविषयी येथील नवशिक्षित तरुणांना आकर्षण वाटले. हिंदू धर्मातील अनेक वैगुण्यांच्या पार्श्वभूमीवर ख्रिस्ती धर्माची मानवतावादी तत्त्वे त्यांना अतिशय उदात्त वाटली.

ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या सेवाभावी व मानवतावादी कार्याचा त्यांच्यावर खूपच प्रभाव पडला. तथापि, हिंदू धर्माची मुळे त्यांच्या जीवनात खोलवर रुजली होती; त्यामुळे आपल्या धर्माचा त्याग करण्याचा विचारही त्यांना मानवण्यासारखा नव्हता. अशा अवस्थेत स्वधर्मात राहूनच त्यात सुधारणा करण्याचा व त्यामध्ये नवे विचार आणण्याचा प्रयत्न करण्याचे त्यांनी ठरविले. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणजे दादोबा पांडुरंगांनी स्थापन केलेल्या ‘ मानवधर्म सभा ‘ व ‘ परमहंस सभा ‘ या संस्था होत.

मानवधर्म सभा

दादोबा पांडुरंगांनी २२ जून, १८४४ रोजी दुर्गाराम मंछाराम यांच्या सहकार्याने सुरत येथे ‘ मानवधर्म सभा ‘ या संस्थेची स्थापना केली. या सभेच्या सभासदांना मूर्तिपूजा मान्य नव्हती. हिंदू धर्मातील जातिसंस्थेलाही त्यांचा विरोध होता. निराकार प्रभूची प्रार्थना करण्याच्या ख्रिस्ती पद्धतीचे अनुकरण करण्याचे त्यांनी ठरविले. मानवा मानवांतील समानतेवर त्यांचा विश्वास होता. मानवधर्म सभेची प्रमुख तत्त्वे पुढीलप्रमाणे सांगता येतील

प्रमुख तत्वे

 1. ईश्वर एकच असून तो पूज्य व निराकार आहे.
 2. नीतिपूर्वक सप्रेम ईश्वरभक्ती हाच धर्म होय.
 3. मनुष्यमात्राचा पारमार्थिक धर्म एकच होय.
 4. प्रत्येक मनुष्यास विचार करण्याचे स्वातंत्र्य आहे.
 5. नित्यनैमित्तिक कर्मे विवेकास अनुसरून असावीत.
 6. मनुष्यमात्राची एक ज्ञाती होय.
 7. सर्वांस ज्ञानशिक्षा असावी.

मानवधर्म सभेची वरील तत्त्वे अतिशय उदात्त असली तरी तिला निष्ठावान कार्यकर्त्यांचे पाठबळ मात्र लाभले नाही ; त्यामुळे लवकरच ही संस्था संपुष्टात आली.

परमहंस सभा

दादोबा पांडुरंगांची ‘ मानवधर्म सभा ‘ फार काळ टिकाव धरू शकली नाही. तथापि, तेवढ्यावरून नाउमेद न होता दादोबांनी राम बाळकृष्ण जयकर, भिकोबा चव्हाण, सखाराम चव्हाण आदी सहकाऱ्यांच्या मदतीने ३० जुलै , १८४ ९ रोजी मुंबई येथे ‘ परमहंस सभा ‘ किंवा ‘ परमहंस मंडळी ‘ नावाची दुसरी संस्था स्थापन केली. परमहंस सभेची तत्त्वे सर्वसाधारणपणे मानवधर्म सभेच्या तत्त्वांसारखीच होती. ईश्वर एकच असून तो निराकार आहे, मूर्तिपूजा करू नये, विधवाविवाहास संमती असावी यांसारख्या तत्त्वांचा स्वीकार परमहंस सभेने केला होता.

परमहंस सभेत जातिभेदविरोधात आचरण होत असे. तिचे सर्व सभासद प्रार्थनेसाठी एकत्र जमत असत. त्यांमध्ये सर्व जाति – धर्मांच्या लोकांचा समावेश असे. प्रार्थनेनंतर सर्व सभासद सहभोजन करीत असत. सभेच्या कामकाजाचा आरंभ करण्यापूर्वी, तसेच सभेच्या अखेरीस ज्या मराठी प्रार्थना म्हणण्यात येत असत, त्या दादोबा पांडुरंग यांनी रचल्या होत्या, परमहंस सभेची तत्त्वे विशद करण्यासाठी दादोबांनी ‘ पारमहंसिक ब्राह्मधर्म ‘ या नावाचा एक काव्यग्रंथ लिहिला होता.

त्यामध्ये त्यांनी जातिभेद सोडावा, सर्वांशी बंधुभावाने वागावे, निराकार ईश्वराची पूजा करावी, अशा प्रकारचा उपदेश केला आहे. भगवद्गीता, बायबल, कुराण यांसारखे सर्व धर्मग्रंथ एकाच प्रकारची शिकवण देतात. म्हणून धर्माच्या आधारे मानवा – मानवांत भेद करणे उचित नाही, असेही त्यांनी सांगितले आहे. परमहंस सभेचे एक वैशिष्ट्य म्हणजे तिचे कामकाज गुप्तपणे चालत असे. याचे कारण असे, की या सभेच्या सभासदांना सामाजिक व धार्मिक सुधारणेसंबंधी तळमळ वाटत होती; परंतु त्यासंबंधीच्या कृतीतून सनातनी व कर्मठ मंडळींचा जो रोष ओढविला असता त्याला तोंड देण्याइतपत धैर्य त्यांच्या अंगी नव्हते. म्हणून सभासदांनी या सभेच्या कामकाजाची जाहीर वाच्यता करू नये, असा संकेतच ठरविण्यात आला होता.

संघटनेच्या वरील पद्धतीच्या स्वरूपामुळे तिच्या वाढीवर बऱ्याच मर्यादा पडाव्यात यात आश्चर्य मानण्यासारखे काहीच नव्हते. तशातच १८६० मध्ये कोणीतरी या सभेच्या सभासदांची यादी चोरून ती प्रसिद्ध केली. त्याबरोबर सभासदांत व समाजातही मोठीच खळबळ माजली. लोकक्षोभास तोंड देण्याचा प्रसंग सभासदांवर ओढवला. त्यामुळे परमहंस सभेच्या धुरिणांनी ही संघटना बरखास्त करण्याचा निर्णय घेतला.

ज्ञानप्रसारक सभा

मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजातील विद्यार्थ्यांनी १ सप्टेंबर, १८४८ रोजी ‘ ज्ञानप्रसारक सभा ‘ नावाची संस्था स्थापन केली. आपल्या देशबांधवांत ज्ञानाचा प्रसार व प्रचार करणे आणि सामाजिक जागृती घडवून आणणे, ही तिची प्रमुख उद्दिष्टे होती . या संस्थेच्या मराठी विभागाचे पहिले अध्यक्ष दादोबा पांडुरंग हे होते.

इतर कार्य

दादोबा पांडुरंग यांनी आपल्या समाजात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून प्रयत्न केले होते. आपल्या लोकांनी आधुनिक ज्ञान व विद्या यांचा अंगीकार केल्याशिवाय येथील समाजाची प्रगती होणार नाही, असे त्यांचे मत होते. त्या दृष्टीने त्यांनी शिक्षणप्रसाराचा आग्रह धरला होता. ट्रेनिंग कॉलेजचे संचालक म्हणून काम करताना त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना आधुनिक विचारांचा परिचय करून देण्यावर भर दिला होता.

दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचे ग्रंथ

 • मराठी भाषेचे व्याकरण
 • यशोदा पांडुरंगी
 • लघुव्याकरण
 • महाराष्ट्र भाषेच्या व्याकरणाची पूरणिका
 • शिशुबोध
 • धर्मविवेचन
 • पारमहंसिक ब्राह्मधर्म
 • विधवाश्रुमार्जन
 • आत्मचरित्र

हे सुद्धा वाचा –

Related Posts