मेनू बंद

मुद्रा म्हणजे काय? व्याख्या, कार्ये व वैशिष्ट्ये

Definition, Functions and Features of Money: मुद्रा म्हणजे पैशाचे किंवा चलनाचे ते रूप, जे दैनंदिन जीवनात खरेदी-विक्रीसाठी वापरले जाते. सामान्यतः एखाद्या देशात वापरलेली मुद्रा त्या देशाच्या सरकारी यंत्रणेद्वारा बनवली जाते. जसे, भारतात रुपया व पैसा हे चलन आहेत. या आर्टिकल मध्ये आपण, मुद्रा म्हणजे काय आणि मुद्रेची व्याख्या, कार्ये व वैशिष्ट्ये काय आहेत, जाणून घेणार आहोत.

मुद्रा म्हणजे काय? व्याख्या, कार्ये व वैशिष्ट्ये

मुद्रा ही कोणी व केव्हा अस्तित्वात आणली हे सांगणे कठीण आहे. परंतु ती कशी अस्तित्वात आली हे सांगणे फारसे कठीण नाही. अर्थशास्त्रात याविषयी दोन सिध्दांत प्रचलित आहेत. पहिला म्हणजे मुद्रेचा आकस्मिक जन्म सिध्दांत, ज्यानुसार मुद्रा आकस्मिकपणे अस्तित्वात आली आहे. यासाठी मानवाने कोणतेही प्रयत्न केले नाही. तसेच ती मानवी गरजेतून अस्तित्वात आली नाही. परंतु प्रस्तुत सिध्दांत शास्त्रीय व संयुक्तिक वाटत नाही.

आणि दूसरा आहे, मुद्रेचा विकास सिध्दांत. या सिध्दांतानुसार मुद्रा आपोआप अस्तित्वात आली नसून वस्तू विनिमयातील अडचणी दूर करण्यासाठी मुद्रा अस्तित्वात आली आहे. एडम स्मिथ म्हणतात, “विशेषीकरणाचे फायदे मिळविण्यासाठी मुद्रेचा शोध लावण्यात आला आहे.” गरज ही शोधाची जननी आहे, हे मुद्रेच्या आविष्काराच्या बाबतही सत्य आहे.

मुद्रा म्हणजे काय

अर्थतज्ञ किन्स अनुसार, “जी वस्तू दिल्याने ऋणाचे करार व मूल्याचे करार यांचे शोधन केले जाते आणि जिच्या रूपात सामान्य क्रयशक्ती साठविली जाते, अशा वस्तूला मुद्रा म्हणतात.” (“Money is that by the delivery of which debt contracts and price contracts are discharged and in shape of which a store of general purchasing power is held.”)

मुद्रेची व्याख्या (Definition of Money)

1. हार्टले विदर्स – “मुद्रेची कार्ये करणारी वस्तू मुद्रा होय.” (“Money is what money does.”)

2. प्रा. व्हाईट – “विनिमयाचे माध्यम आणि मूल्यमापनाचे साधन म्हणून उपयोगी पडणारी कोणतीही वस्तू म्हणजे मुद्रा होय.”

3. प्रा. हाम – “मुद्रा शब्दाचा उपयोग विनिमय माध्यम आणि मूल्यमापन हे दोन्ही निर्देशित करण्यासाठी केला जातो.” (“The word money has been used to desingnate the medium of exchange as well as the standard of value.”)

4. प्रा. नॅप व हार्डी – “मुद्रा ही वस्तू आहे की, जी स्वीकार करण्याकरिता प्रत्येक व्यक्ती बाध्य असते अथवा जिला सरकार मुद्रा म्हणून घोषित करते.”

5. सेलिंगमॅन – “जिला सार्वत्रिक मान्यता मिळाली असेल अशी कोणतीही वस्तू मुद्रा होय.” (“Money is one thing that prossesses general acceptability.”)

6. मार्शल – निःसंदेह किंवा विशेष चौकशीशिवाय वस्तू व सेवा खरेदीसाठी किंवा सर्वसाधारण खर्चाकरिता परिचलनात असणाऱ्या वस्तूंचा समावेश मुद्रेमध्ये होतो. (“Money includes all those things which are generally in current without doubt or special enquiry as a means of purchasing commodities or services and of defraying expenses.”)

7. प्रा. एली – “विनिमय माध्यम म्हणून सर्वत्र स्वीकृत होणारी आणि कर्जफेडीसाठी घेतली जाणारी वस्तू म्हणजे मुद्रा होय.” (“Money is anything that passes freely from hand as a medium of exchange and is generally received in final discharge of debts.”)

8. कॅट – “मुद्रा अशी वस्तू आहे की, जी साधारणतः विनिमयाचे माध्यम अथवा मूल्याचे प्रमाण ह्या रूपात सर्वांकडून स्वीकारली जाते.” (“Money is anything which is commonly used and generally accepted as a med of exchange or as a standard of value.”)

हे सुद्धा वाचा-

मुद्रेची वैशिष्ट्ये (Characteristics of Money)

1. पैशाच्या ठिकाणी क्रयशक्ती (purchasing power) असते. म्हणजे, पैशाद्वारे कोणतीही वस्तू व सेवा खरेदी करता येते. ह्या वैशिष्ट्यामुळे दुहेरी संयोगाची आवश्यकता राहत नाही व वस्तू विनिमयातील दुहेरी संयोगाचा अभाव ही अडचण पैशामुळे नाहीशी होते.

2. सर्वमान्यता हे दुसरे वैशिष्ट्य होय. पैशाला सर्वांतर्फे मान्यता प्राप्त होते व तो सर्वांतर्फे स्वीकार्य असतो. पैशाच्या साह्याने भविष्यकाळातील बचत करता येते.

3. पैशामुळे वस्तू व सेवा ह्याचे मूल्य निश्चित करता येते. पैसा हा मूल्यमापक असल्यामुळे वस्तू विनिमयातील मूल्यमापनाची अडचण दूर झाली.

4. विनिमेयता हे पैशाचे वैशिष्ट्य होय. पैशाद्वारे वस्तूंच्या खरेदीचे व विक्रीचे व्यवहार करता येतात.

5. मूल्यसंग्रहण हे पैशाचे आणखी एक वैशिष्ट्य होय. पैशाच्या रूपाने भविष्यकाळाकरिता संपत्तीचा संग्रह करणे शक्य झाले आहे.

6. पैशाच्या ठिकाणी वहनीयता हा गुणधर्म आहे. म्हणजेच पैसा हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे नेता येतो.

7. पैशाचे मूल्य हे तुलनेने स्थिर असल्यामुळे उधारीचे व्यवहार शक्य होतात.

8. पैसा हा सहजपणे ओळखता येतो. म्हणजे पैशाच्या ठिकाणी सूज्ञेयता असते.

9. पैशाचे लहान-लहान भाग करता येतात. ह्यालाच पैशाची सुविभाज्यता म्हणतात.

हे सुद्धा वाचा-

मुद्रेची कार्ये (Functions of Money)

1. विनिमय माध्यम (Medium of Exchange)

विनिमय माध्यम ह्या कार्यासाठीच मुद्रा सुरुवातीला अस्तित्वाला – आली आहे. विनिमय माध्यम म्हणजे दोन वस्तूंच्या विनिमयाचे माध्यम म्हणून कार्य करणे, वस्तूंचा विनिमय प्रत्यक्षपणे न होता मुद्रेच्या मध्यस्थीने होतो. मुद्रेच्या मध्यस्थीने जेव्हा वस्तूंचा विनिमय होतो, तेव्हा विनिमयाचे दोन भाग पडतात. पहिला भाग म्हणजे आपल्याजवळील वस्तूंची पैशाच्या माध्यमाने विक्री करणे आणि दुसरा भाग म्हणजे आवश्यक असलेल्या वस्तूंची पैसा देऊन खरेदी करणे.

उदा. शेतकरी आपल्याजवळील गहू मुद्रेच्या मोबदल्यात गरजू इसमाला विकतो. आपल्याला आवश्यक असलेले कापड मुद्रेच्या मोबदल्यात विणकऱ्याकडून खरेदी करतो. मुद्रेच्या मध्यस्थीने अशारितीने विनिमयाचे दोन भाग पडत असल्यामुळे वस्तू व इच्छा ह्यांचा दुहेरी संयोग घडून येण्याची शक्यता नसते. परिणामतः विनिमयाचे कार्य सुकर होते. मुद्रेकडून हे कार्य उत्तम रितीने होण्यासाठी मुद्रेमध्ये सामान्य स्वीकृती असली पाहिजे. म्हणजेच शेतकरी व विणकर या दोघांनीही वस्तू देऊन मुद्रा स्वीकारली पाहिजे.

2. मूल्यमापन (Evaluation)

वस्तूमध्ये मूल्य असणे हा वस्तूंचा महत्त्वाचा गुणधर्म आहे. परंतु सर्व वस्तूंमध्ये सारखेच मूल्य नसते. विभिन्न वस्तूंचे मूल्य वेगवेगळे असते. यास्तव प्रत्येक वस्तूचे मूल्य निश्चितपणे मोजणे आवश्यक असते. कोणत्या वस्तूचे मूल्य किती? हे ठरविता आले पाहिजे. एका किलोग्रॅम गव्हाचे किंवा एका मीटर कापडाचे मूल्य किती हे निश्चितपणे मोजता आले पाहिजे. यालाच मूल्यमापन असे म्हणतात. या मूल्यमापनासाठी सर्वमान्य असे माप उपलब्ध असले पाहिजे. हे माप म्हणजे मुद्रा होय.

कोणत्याही वस्तूचे मूल्य मुद्रेत मोजतात. ज्याप्रमाणे किलोग्रॅम हे वजन मोजण्याचे माप आहे, मीटर हे लांबी मोजण्याचे माप आहे. लोटर हे द्रव्य मोजण्याचे माप आहे तसेच मुद्रा हे हे मूल्य मोजण्याचे माप आहे. मुद्रेत मूल्य असल्यामुळे व मुद्रा सर्वमान्य असल्यामुळे तिचा मूल्यमापनासाठी उपयोग होतो. वस्तू विनिमयातील मूल्यमापनाची अडचण मुद्रेच्या उपयोगाने दूर आली आहे.

3. उधारीचे देणे फेडण्याचे साधन (Delayed or Deferred Payment)

समाजाचा जसजसा आर्थिक विकास होतो, तसतसे उधारीच्या व्यवहारांना महत्त्वाचे स्थान ‘प्राप्त होते. उधारीचे व्यवहार म्हणजे ज्या व्यवहाराचे देणे भविष्यकाळात देणे असते असे व्यवहार होत. हे विलंबित देणे फेडण्यासाठी मुद्रेचा उपयोग होतो. कारण मुद्रेचे मूल्य इतर वस्तूंच्या मूल्यापेक्षा स्थिर असते. तसेच मुद्रा ही इतर वस्तूंपेक्षा टिकाऊ असते.

मूल्यमापन व विलंबित देयमान (Delayed or Deferred Payment) यात विशेष फरक नाही. मूल्यमापनात मुद्रेला वस्तूंचे वर्तमानकाळातील मूल्य मोजावयाचे असते आणि विलंबित देयमानात मुद्रेला वस्तूंचे भविष्यकालीन मूल्य मोजावयाचे असते. आधुनिक काळात उधारीच्या व्यवहारांना महत्त्वाचे स्थान प्राप्त झाल्यामुळे आस्थगित देयमानाचे कार्य महत्त्वाचे मानल्या गेले आहे.

4. मूल्यसंग्रहण (Valuation)

मूल्यसंग्रहण करणे म्हणजे धनाची बचत करणे होय. मनुष्याच्या वर्तमानकालीन गरजा तृप्त झाल्यानंतर भविष्यकालीन गरजा तृप्त करण्यासाठी मनुष्य आपल्याजवळील अतिरिक्त धनाची बचत करतो. धनाची बचत करण्यासाठी वस्तूंपेक्षा मुद्रेचा अधिक योग्यरितीने उपयोग होतो. कारण एक तर मुद्रा वस्तूपेक्षा अधिक टिकाऊ असते. दुसरे मुद्रेचे मूल्य स्थिर असते. तिसरे मुद्रेमध्ये केलेली बचत अर्थोत्पादनासाठी उपयोगात येते. परिणामतः आर्थिक विकास वृध्दींगत होतो.

5. मूल्यांचे हस्तांतरण (Transfer of Values)

मूल्य हस्तांतरण म्हणजे एका व्यक्तीच्या हातातून दुसऱ्या व्यक्तीच्या हातात वस्तू जाणे होय. विनिमयाच्या व्यवहारातून असे मूल्य हस्तांतरण पडून येते. मुद्रा मूल्य हस्तांतरणासाठी वापरण्यात येते. कारण विनिमयाच्या व्यवहारातून निर्माण झालेली रकमेची देणी-घेणी फेडण्यासाठी मुद्रेचा माध्यम म्हणून वापर होते. तसेच कर्जाची देणी-घेणी फेडण्यासाठी मुद्रा वापरली जाते. मुद्रेकडून मूल्य हस्तांतरणाचे कार्य उत्तमरित्या होते. कारण एकतर मुद्रा विनिमय माध्यम म्हणून कार्य करते. दुसरे मुद्रा सर्वांना स्वीकार्य असते. तिसरे मुद्रेत सामान्य क्रयशक्ती आहे.

6. मूल्यांचे स्थलांतर (Shift of Value)

व्यक्ती-व्यक्तीतील विनिमयाच्या व्यवहारांमुळे मूल्याचे हस्तांतरणाचे कार्य निष्पन्न होते आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी झालेल्या विनिमयाच्या व्यवहारामुळे मूल्य स्थलांतर करावे लागते. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी रकमेचे स्थलांतर करावे लागते. हे स्थलांतराचे कार्य मुद्रा करीत असते.

उदा. अकोल्याच्या ‘अ’ व्यापाराने मुंबईच्या ‘व’ व्यापाराकडून १०,००० रु. चा माल मागविला असेल तर त्याचे देणे फेडण्यासाठी अकोल्यातील ‘अ’ व्यापारी मुंबईतील ‘ब’ व्यापाराकडे १०,००० रु. पाठवितो. या ठिकाणी मुद्रा मूल्य हस्तांतर व स्थलांतर हे दोन्हीं कार्य करते.

हे सुद्धा वाचा-

Related Posts