मेनू बंद

डॉ. शिवाजीराव पटवर्धन – संपूर्ण माहिती मराठी

आपण या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक डॉ. शिवाजीराव पटवर्धन (१८९२-१९८६) यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Dr. Shivajirao Patwardhan यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

डॉ. शिवाजीराव पटवर्धन -  Dr. Shivajirao Patwardhan

डॉ . शिवाजीराव पटवर्धन यांची त्यांनी कुष्ठरोग्यांसाठी केलेल्या सेवाभावी कार्याबद्दल विशेष प्रसिद्धी आहे. त्यांचा जन्म २२ डिसेंबर, १८९२ रोजी कर्नाटकातील आसंगी या गावी झाला. शिवाजीरावांच्या बालपणीच त्यांच्यावरील आई – वडिलांचे कृपाछत्र हरपले; त्यामुळे त्यांचे पालनपोषण त्यांची बहीण बहिणाबाई जोशी यांनी केले. शिवाजीरावांचे बालपण अतिशय दारिद्र्यात गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण जमखंडी येथे झाले.

त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांना पुण्याला जावे लागले . तेथून ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. विद्यार्थिदशेतच त्यांच्यावर लो. टिळक यांच्या राष्ट्रीय विचारांचा प्रभाव पडला होता. मॅट्रिकनंतर शिवाजीराव उच्च शिक्षणासाठी कोलकात्यास गेले. तेथे त्यांनी होमिओपथीची बी.एच.एम.एस. ही पदवी संपादन केली.

डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांचे कार्य

शिक्षणक्रम पूर्ण झाल्यानंतर शिवाजीरावांनी डॉक्टरीचा व्यवसाय करण्याचे ठरविले. काही काळ ते अलाहाबाद, जबलपूर इत्यादी शहरांत राहिले; पण अखेरीस ते अमरावतीला आले आणि त्या ठिकाणी आपला व्यवसाय सुरू केला. शिवाजीराव प्रथमपासूनच आपल्या व्यवसायाकडे मानवजातीची सेवा करण्याचे साधन म्हणून पाहत होते. समाजातील सर्व जाति – धर्मांच्या रोग्यांची मानवतावादी दृष्टिकोनातून सेवा करण्यातच त्यांना धन्यता वाटत होती. साहजिकच, आपल्या व्यवसायातून आर्थिक लाभ मिळविण्याचा विचार त्यांनी कधीही केला नाही.

डॉ. पटवर्धन व्यवसायाने डॉक्टर असले तरी त्यांचे राष्ट्रप्रेमही तितकेच जाज्वल्य होते ; त्यामुळे भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातही त्यांनी भाग घेतला होता. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यात ते सहभागी झाले होते. इ. स. म्हणूनही त्यांनी काम केले होते. १९२८ मध्ये त्यांनी अमरावती येथे विदर्भ युवक परिषद भरविली होती. विदर्भ प्रांतिक काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी म्हणूनही कार्य केले.

सविनय कायदेभंग चळवळीत सहभाग

सन १९३० मध्ये महात्मा गांधींनी सुरू केलेल्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत शिवाजीराव पटवर्धनांनी भाग घेतला होता . त्या वेळी दहीहंडा येथील मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व त्यांनी केले होते. त्याबद्दल त्यांना दीड वर्ष सक्तमजुरीची शिक्षा झाली होती. ते तुरुंगात असताना त्यांची मुलगी गंभीर आजारी पडली. ‘आपण स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेणार नाही’ असे लिहून देण्याच्या अटीवर त्यांची मुक्तता करण्याची तयारी या वेळी सरकारने दर्शविली; पण शिवाजीरावांनी असे लिहून देण्यास स्पष्ट नकार दिला आणि ‘ मला माझ्या देशापेक्षा काहीही प्रिय नाही ‘ असे बाणेदार उत्तर दिले.

सन १९४२ च्या ‘ चले जाव ‘ चळवळीच्या काळातही त्यांना अटक झाली होती. महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे, नेताजी सुभाषचंद्र बोस, राजेंद्रप्रसाद यांसारख्या थोर राष्ट्रीय नेत्यांच्या संपर्कात ते आले होते. राजकीय जागृती आणि समाजसेवा यासाठी तरुणांचे संघटन आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन शिवाजीरावांनी अमरावती येथे एक व्यायामशाळाही सुरू केली होती.

कुष्ठरोग्यांची सेवा

स्वातंत्र्योत्तर काळात डॉ. पटवर्धनांनी कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी व कल्याणासाठी स्वतःला वाहून घेतले. सन १९४६ मध्ये त्यांनी अमरावतीला कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी ‘ तपोवन- जगदंबा कुष्ठधामा’ची स्थापना केली. समाजाने घृणास्पद मानलेल्या या रोगापासून कुष्ठरोग्यांची मुक्तता व्हावी म्हणून त्यांच्यावर वैद्यकीय इलाज कर आणि रोगमुक्त झालेल्या कुष्ठरोग्यांचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे, अशा दुहेरी पातळीवरून त्यांनी कुष्ठरोग्यांसाठी कार्य केले.

कुष्ठरोगाने पीडित दुर्दैवी जिवांबद्दल शिवाजीरावांना करुणा वाटत होती. ‘ कुष्ठरोग्यांची सेवा हीच खरी ईश्वराची सेवा ‘ या श्रद्धेने ते कामाला लागले. समाजाने वाळीत टाकलेल्या कुष्ठरोगी व्यक्तींच्या मनात जीवन जगण्याची जिद्द निर्माण करावयाची आणि त्याच वेळी कुष्ठरोग्यांकडे पाहण्याच्या समाजाच्या दृष्टिकोनात बदल घडवून आणावयाचा, या दृष्टीने त्यांनी प्रयत्न चालू ठेवले.

कुष्ठरोग्यांविषयीच्या समाजाच्या दृष्टिकोनात बदल घडवून आणणे, हे त्यांच्यापुढील मोठेच आव्हान होते. या रोगासंबंधी लोकांमध्ये फार गैरसमज होते. हे गैरसमज दूर करण्यासाठी शिवाजीरावांनी लोकांना हे पटवून देण्याची मोहीम उघडली की, कुष्ठरोगी हादेखील एक मानव आहे . तोही समाजाचाच एक घटक आहे. समाजातील इतरांप्रमाणे जगण्याचा त्यालाही पूर्ण अधिकार आहे.

त्यांनी आपल्या भाषणांतून लोकांना असे सांगितले की , कुष्ठरोग्यांना दूर लोटू नका. कुष्ठरोग म्हणजे मागील जन्माचे पाप नाही. कुष्ठरोग्यांना प्रेम द्या. स्वाभिमानाने जीवन जगण्याचे सामर्थ्य त्यांच्यात निर्माण करा. ते निर्माण करणे हा मानवतेचा धर्म आहे. कुष्ठरोग्याला औषधोपचारांशिवाय मरू देऊ नका. औषधाने हा रोग बरा होतो हे लक्षात ठेवा.

तपोवन – जगदंबा कुष्ठधाम

डॉ. शिवाजीराव पटवर्धनांनी तपोवन- जगदंबा कुष्ठधामाच्या स्थापनेनंतर आपले उर्वरित जीवन कुष्ठरोग्यांच्या सेवेतच घालविले. तपोवनाच्या रूपाने त्यांनी उजाड माळरानावर आदर्श ग्राम निर्माण केले. कुष्ठरोग्यांच्या श्रमातून बहरलेली शेते आणि कुटीरोद्योगाच्या माध्यमातून त्यांनी बनविलेल्या विविध वस्तू यांचे दर्शन आपणास त्या ठिकाणी घडते. रोगमुक्त झालेल्या स्त्री – पुरुषांचे विवाह घडवून आणले जातात. त्यामुळे त्यांचे संसारही आता तेथे फुलू लागले आहेत. सहकाराच्या आदर्श तत्त्वावर या वसाहतीचे कार्य सुरू आहे.

कुष्ठरोग्यांच्या दृष्टीने अन्यायकारक असलेला १८९८ चा कायदा रद्द करवून घेण्यासाठी डॉ. पटवर्धनांनी प्रयत्न केले आणि त्यात यशही मिळविले. कुष्ठरोग्यांच्या संस्थेमार्फत तयार झालेला माल सरकारने घ्यावा आणि त्या मालाला बाजारपेठ मिळवून द्यावी, असा त्यांचा आग्रह होता. या मागणीसाठी त्यांना आपल्या आयुष्याच्या अखेरच्या काळात सरकारशी संघर्षही करावा लागला होता.

भारत सरकारने त्यांना ‘ पद्मश्री ‘ हा किताब देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. तथापि, शिवाजीरावांना कसल्या मानसन्मानाचा हव्यास नव्हता, अमरावती विद्यापीठाने त्यांना ‘ डी. लिट. ‘ ही सन्मानदर्शक पदवी देण्याचे ठरविले; पण शिवाजीरावांनी ती स्वीकारण्यास नकार दिला. इतर अनेक सन्मान व पुरस्कार स्वीकारण्याचेही त्यांनी नाकारले होते, डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांचा मृत्यू ७ मे, १९८६ ला झाला.

हे सुद्धा वाचा –

Related Posts