मेनू बंद

अग्नी विमा म्हणजे काय? मूलभूत सिद्धांत आणि हा विमा उतरविण्याची पद्धत

अग्नी विमा म्हणजेच Fire Insurance आयुर्विम्यापेक्षा वेगळ्या प्रकारचा करार असून हा क्षतिपूर्तीचा प्रसंविदा असतो. या कराराप्रमाणे विमेदार आगीत नुकसान झालेल्या मालाची किंमत किंवा विमा राशी यापैकी जी राशी लहान असेल ती वसूल करण्यास पात्र ठरतो. या आर्टिकल मध्ये आपण, अग्नी विमा म्हणजे काय व याचे मूलभूत सिद्धांत आणि हा विमा उतरविण्याची पद्धत काय आहे, जाणून घेणार आहोत.

अग्नी विमा म्हणजे काय? मूलभूत सिद्धांत आणि हा विमा उतरविण्याची पद्धत

अग्नी विमा म्हणजे काय

“अग्नी विमा हा एक असा करार आहे, ज्यात एक पक्ष मोबदलाप्राप्तीबद्दल दुसऱ्या पक्षास ठरलेल्या राशीच्या मर्यादेपर्यंत भरपाई करून देण्यास जबाबदार असतो.” (“Fire insurance is a contract in which one party is liable to indemnify the other party up to a fixed sum for the indemnity.”) अग्नीमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई मागण्याचा अधिकार पुढील दोन अटीवर अवलंबून असतो.

  1. वस्तूचे नुकसान आगीमुळेच झालेले असावे आणि
  2. ही आग आकस्मिकपणे लागलेली असावी.

जाणूनबुजून आग लावल्यास नुकसान भरपाईची मागणी करता येत नाही. आगीमुळे झालेले नुकसान धोकेबाजी अथवा गैरव्यवहार यापासून मुक्त नसल्यास, केवळ मालक अथवा नोकराच्या निष्काळजीपणामुळे आग लागली असल्यास देखील क्षतिपूर्तीचा अधिकार विमेदारास प्राप्त होतो.

अग्नी विमा चा मूलभूत सिद्धांत (Basic Principles of Fire Insurance)

अग्नी विमा हा क्षतिपूर्तीचा करार असून या करारासदेखील विम्याचे मूलभूत सिद्धांत लागू होतात.

1. आत्यंतिक विश्वासाचे तत्व (Principle of extreme faith)

अग्नी विमा करारात हे तत्व अत्यंत महत्वाचे ठरते. विमेदाराने वस्तूची व वस्तू ठेवण्याच्या जागेची संपूर्ण माहिती, हानीभय इत्यादींबाबत सत्य परिस्थितीचे वर्णन करणे महत्वाचे असते. आयुर्विम्याप्रमाणे या करारात विमेदाराच्या माहितीतील सत्यांश शोधून काढणे शक्य नसल्यामुळे विमा कंपनी संपूर्णत: विमेदाराने दिलेल्या माहितीवरच अवलंबून असते.

2. विमायोग्य हित (Insurable interest)

अग्नी विमा उतरवितांना वस्तू अथवा संपत्तीत आर्थिक हित गुंतलेले असणे आवश्यक असते. विमायोग्य हित साधारणतः मालकीवर अवलंबून असते. याशिवाय पुढील घटनांमध्ये देखील विमायोग्य हित असल्याचे आढळते.

(अ) संपत्तीच्या काही भागावर मालकी असल्यास अथवा संयुक्त मालकी असल्यास.
(ब) वस्तू अथवा संपत्ती तारण म्हणून स्वीकारली असल्यास दिलेल्या कर्जाएवढे हित गुंतलेले असते.
(क) संपत्तीच्या देखरेखीसाठी नियुक्त केलेले संचालक अथवा विश्वस्त यांचे विस्तृत हित गुंतलेले असते.
(ड) निक्षेपग्राही (Bailee) – दुसऱ्याची वस्तू कायदेशीरपणे आपल्याजवळ ठेवण्याचा यास अधिकार असतो. उदा. शिंपी शिवण्यासाठी कापड ठेवू शकतो. घड्याळ दुरुस्तीसाठी दिल्यास घड्याळवाला अथवा रेडियो दुरुस्तीवाला इत्यादींचे त्या संबंधीत वस्तूत हित असते.
(इ) अभिकर्ता आपल्या मालकाच्या वस्तू ठेवण्याचा व प्राप्त करण्याचा त्यास अधिकार असल्यामुळे त्याचे विमायोग्य हित मान्य करण्यात येते.
(फ) पतीच्या संपत्तीवर पत्नीचे आणि पत्नीच्या संपत्तीवर पतीचे विमायोग्य हित मान्य केले गेले आहे..

3. क्षतिपूर्तीचे तत्व (Principle of compensation)

अग्नी विमा हा क्षतिपूर्तीचा प्रसंविदा असल्यामुळे केवळ क्षतिपूर्तीचीच मागणी केली जावू शकते. या करारान्वये लाभप्राप्ती करता येत नाही.

अग्नी विमा उतरविण्याची पद्धत (Method of applying for fire insurance)

1) प्रस्ताव (Proposal)

प्रत्येक विमा कंपनीचा प्रस्ताव अर्ज सर्वसाधारणपणे सारख्याच स्वरूपाचा असतो. विमेदारास हा अर्ज भरून द्यावा लागतो. या अर्जातील विविध प्रश्नाद्वारे विमा कंपनी संपत्तीची संपूर्ण माहिती प्राप्त करते. विमा कंपनीस किती जोखीम स्वीकारावी लागणार आहे याची पूर्वकल्पना करता यावी या दृष्टीकोनातून विस्तृत माहिती अपेक्षित असते.

अग्नी विमा हा संपूर्णपणे विश्वासावर अवलंबून असलेला करार असल्यामुळे विमेदाराने संपूर्ण माहिती स्पष्टपणे मांडली पाहिजे. याच अर्जात विमा राशी भरून द्यावी लागते. विमा राशी ठरवितांना विमेदाराने योग्य काळजी घेणे आवश्यक असते.

विमा राशी कितीही लिहिली असली तरी विमा कंपनी केवळ क्षतीचे मूल्य देते अथवा संपूर्ण संपत्तीचे नुकसान झाल्यास त्या संपत्तीचे विपणी मूल्य अथवा विमा राशी यापैकी कमी असलेली राशी देण्यात येत असते. विमा राशी योग्यप्रकारे विचारपूर्वक लिहिली असल्यास विमेदारास स्वतःचे संपूर्णपणे संरक्षण करता येऊ शकते.

2) प्रतिष्ठेचे प्रमाणपत्र (Certificate of Respectability)

विमेदारावरील विश्वासावर अग्नी विमा अवलंबून असल्यामुळे विमेदार प्रामाणिक व विश्वासार्ह असल्याची खात्री करून घेण्याकरिता विमा कंपनी या प्रमाणपत्राची मागणी करते. हे प्रमाणपत्र लिहून देणारी व्यक्ती विश्वासार्ह असल्यामुळे अथवा ओळखीची असल्यामुळे विमा कंपनी या प्रमाणपत्रावर विसंबून प्रस्ताव स्वीकारण्याच्या दृष्टीने विचार करते.

3) संपत्तीचे निरीक्षण (Surve of Property)

आपली जोखीम किती आहे हे पाहण्याकरिता विमा कंपनी आपल्या निरीक्षकांना पाठविते. विमा राशी अल्पं असल्यास विमा कंपनी याची अधिक काळजी करीत नाही, परंतु विमा राशी अधिक असल्यास मात्र निरीक्षण ही आवश्यक बाब ठरते. निरीक्षकाच्या अहवाल प्राप्तीनंतरच प्रस्तावाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येतो.

4) प्रस्तावाचा अधिकार (Acceptance of Proposal)

प्रस्ताव अर्ज, प्रतिष्ठेचे प्रमाणपत्र, निरीक्षकाचा अहवाल या सर्व बाबींचा विचार करून प्रस्तावाचा स्वीकार अथवा नकार कळविला जातो. प्रस्ताव स्वीकारला असल्यास प्रव्याजीचे दर कळविण्यात येतात. व्याजी दिल्यानंतर करार पूर्ण झाला आहे असे समजण्यात येऊन ताबडतोब स्वीकृती पत्र (Cover-note) देण्यात येते. विमा पत्र प्राप्त होईपर्यंत हे स्वीकृती पत्र सर्व कायदेशीर बाबींना उपयुक्त ठरते.

5) विमा पत्र (Policy)

विमा स्वीकारला आहे याचा कायदेशीर लिखित पुरावा म्हणजेच विमा पत्र होय. या विमा पत्रात संपत्तीचे वर्णन, विमा राशी, विमा मुदत, विम्याची प्रव्याजी आणि इतर विमा अटींचा उल्लेख करण्यात आलेला असतो. विमा पत्रातील मुदत संपल्यानंतर अग्नी विम्याचे पुन्हा नूतनीकरण घेता येते. साधारणपणे अग्नी विम्याची मुदत एक वर्षापेक्षा अधिक असत नाही.

हे सुद्धा वाचा-

Related Posts