आपण या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक गंगाधर बाळकृष्ण सरदार (१९०८-१९८८) यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Gangadhar Balkrishna Sardar यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

गंगाधर बाळकृष्ण सरदार – परिचय
महाराष्ट्रातील परिवर्तनवादी चळवळीचे अग्रणी, नामवंत साहित्यिक व थोर पुरोगामी विचारवंत म्हणून प्रा. गं. बा. सरदार महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यांचे संपूर्ण नाव गंगाधर बाळकृष्ण सरदार असे होते. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर, १९०८ रोजी पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण जव्हार येथे, तर माध्यमिक शिक्षण मुंबईत झाले. पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते पुणे येथे आले.
सन १९३० मध्ये महात्मा गांधींनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली. त्या वेळी सरदार बी. ए. च्या वर्गात शिकत होते. बी. ए. ची परीक्षा दुसऱ्याच दिवशी असताना त्यांनी परीक्षेकडे पाठ फिरवून चळवळीत उडी घेतली. त्याबद्दल त्यांनी तुरुंगवासही भोगला. पुढील काळात एस. एन. डी. टी. विद्यापीठात अध्यापनाचे कार्य त्यांनी केले.
गंगाधर बाळकृष्ण सरदार यांची विचारशैली
प्रा. सरदार यांच्यावर प्रारंभी गांधीवादाचा प्रभाव होता. या प्रभावातूनच ते स्वातंत्र्य आंदोलनात उतरले होते; परंतु १९४३ पासून ते मार्क्सवादाकडे वळले. कार्ल मार्क्सची इतिहासाची भौतिकवादी मीमांसा अधिक मूलगामी आणि शास्त्रशुद्ध आहे, असे त्यांचे मत होते. तथापि, मार्क्सवादाचा स्वीकार त्यांनी केला असला तरी ते पोथीनिष्ठ मार्क्सवादी मात्र कधीच बनले नाहीत.
प्रा. सरदार यांच्यावर संतवाङ्मयाचेही संस्कार झाले होते. संतवाङ्मयाच्या अभ्यासाकडे ते लहानपणापासूनच वळले होते. त्यातील भूतदयावाद व अध्यात्मनिष्ठ मानवतावाद त्यांना विशेष स्फूर्तिदायक वाटला; पण पुढे संतांच्या काळातील परिस्थितीच्या संदर्भात त्यांच्या तत्त्वविचारांचा व कार्याचा अन्वयार्थ लावण्याचे कार्य त्यांनी केले.
मराठीतील विचारप्रधान व समीक्षणात्मक साहित्यात प्रा. सरदारांनी महत्त्वपूर्ण भर घातली आहे. तथापि, त्यांनी आपले बहुतांशी लेखन समाजप्रबोधनाचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवूनच केले आहे. ज्ञान हे सामाजिक धन आहे; त्याचा सर्वांना उपयोग करून घेता आला पाहिजे. म्हणून विद्येची मक्तेदारी ही प्रचलित युगधर्माशी विसंगत आहे, अशी त्यांची भूमिका होती. समाजात परिवर्तन आणण्यासाठी ज्ञानाचा समाजाच्या सर्व स्तरांत प्रसार होणे गरजेचे आहे, असे त्यांना प्रकर्षाने वाटत होते आणि त्यांच्या सर्व लेखनामागील तीच महत्त्वाची प्रेरणा होती.
प्रा. सरदारांनी साहित्य व समाजजीवन यांच्याशी निगडित असलेल्या अनेकविध विषयांची सखे ल मीमांसा आपल्या लेखनातून केली आहे. समाजातील विविध समस्यांचा शोध घेऊन सामाजिक हितासाठी त्या समस्यांचे निराकरण कसे करता येईल याचा शोध घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.
सरदारांचा सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीशी निकटचा संबंध होता. समाजातील विचारवंतांनी आपल्या विचाराद्वारे परिवर्तनवादी शक्तींना सामर्थ्य देण्याचे कार्य केले पाहिजे. तसेच लेखकाने सामाजिक जाणीव ठेवून आपले लेखन केले पाहिजे. वाङ्मयात सामाजिक जाणीव कमी झाली तर वाङ्मयाचा कसही कमी ठरतो, असे त्यांचे मत होते.
तथापि, सामाजिक चळवळीस वैचारिक बैठक पुरविताना सरदारांनी कोठेही टोकाची भूमिका घेतली नाही. त्यांनी आपले विचार स्पष्टपणे मांडले असले तरी त्यामध्ये कटुता येऊ दिली नाही; पण विचारांच्या क्षेत्रात त्यांनी कधी तडजोडही केली नाही. संयमी संघर्ष आणि विधायक कार्य यांवर त्यांचा भर होता.
प्रा. सरदार यांच्या साहित्यिक कामगिरीचा गौरव म्हणून १९८० च्या बार्शी येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली होती. सन १९८१ मध्ये प्रवरानगर येथे भरलेल्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तसेच १९८२ मध्ये पिंपरी येथे भरलेल्या भटक्या व विमुक्त जाती संघटनेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांची निवड झाली होती. गंगाधर बाळकृष्ण सरदार यांचे १ डिसेंबर, १९८८ रोजी पुणे येथे निधन झाले.
ग्रंथसंपदा
प्रा. सरदार यांनी लिहिलेल्या ग्रंथांपैकी काही महत्त्वाचे ग्रंथ पुढीलप्रमाणे- अर्वाचीन मराठी साहित्याची पूर्वपीठिका, महाराष्ट्राचे उपेक्षित मानकरी, जोतीराव फुले, संतवाङ्मयाची सामाजिक फलश्रुती, संतसाहित्याची सामाजिक व राष्ट्रीय कामगिरी, ज्ञानेश्वरांची जीवननिष्ठा, रानडेप्रणीत सामाजिक सुधारणेची तत्त्वमीमांसा, आगरकरांचा सामाजिक तत्त्वविचार, प्रबोधनातील पाऊलखुणा, तुकारामदर्शन, रामदासदर्शन, महाराष्ट्रजीवन, संक्रमणकाळाचे आव्हान इत्यादी.
हे सुद्धा वाचा –