मेनू बंद

भारतीय औद्योगिक विकास बँक (IDBI)

भारतीय औद्योगिक विकास बँक (Industrial Development Bank of India) ची स्थापना 1 जुलै, 1964 रोजी करण्यात आली. स्थापनेच्या वेळी ही बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आधिपत्याखाली कार्य करीत असे. पण सन 1975 मध्ये तिची मालकी मध्यवर्ती सरकारकडे सुपूर्त करण्यात आली व ही बँक आता स्वतंत्रपणे कार्य करीत आहे.

भारतीय औद्योगिक विकास बँक (IDBI)

भारतीय औद्योगिक विकास बँकेचे प्रमुख कार्य म्हणजे उद्योगांच्या स्थापनेला व विकासाला हातभार लावण्याव्यतिरिक्त विविध सार्वजनिक क्षेत्रातील वित्तीय संस्था करीत असलेल्या कार्यात सुसूत्रता आणणे हे आहे. ही बँक हे कार्य भारताच्या पंचवार्षिक योजनेतील धोरणे व त्यातील क्रमवारी इत्यादी लक्षात घेऊन करते.

भारतीय औद्योगिक विकास बँक ची कार्ये (Functions of Industrial Development Bank of India)

भारतीय औद्योगिक विकास बँक पुढील कार्ये करते –

1. भारताचे औद्योगिक धोरण लक्षात घेऊन औद्योगिक उत्पादनसंस्थांची स्थापना करण्यास व त्यांचा विकास घडवून आणण्यास मदत करणे.

2. उद्योगांच्या विकासासाठी व्यवस्थापकीय व तांत्रिक मदत उपलब्ध करून देणे.

3. उद्योगांचा विकास साधण्याच्या उद्दिष्टांसाठी आर्थिक व तांत्रिक क्षेत्रात कार्य करणे व विक्रीसंबंधात सर्वेक्षण व संशोधन करणे.

त्याचबरोबर या बँकेचे आणखी एक महत्त्वाचे कार्य म्हणजे विविध सार्वजनिक क्षेत्रातील वित्तीय संस्था लघुउद्योग व ग्रामोद्योगांना जी वित्तीय मदत देतात त्यात सुसूत्रता आणणे व त्यांना मार्गदर्शन करणे.

औद्योगिक वित्तपुरवठा (Industrial Financing)

भारतीय औद्योगिक विकास बैंक सर्व तऱ्हेच्या मोठ्या उद्योगांना वित्तीय मदत देऊ शकते. उदा., कारखानदारी प्रक्रिया करणारे उद्योग, विविध वस्तूंवर प्रक्रिया करणारे उद्योग व साठवणूक करणारे उद्योग, जहाज व वाहतूक उद्योग, खाणकाम, बीजनिर्मिती व तिचे वितरण, मच्छीमारी वाहने, हॉटेल व औद्योगिक वसाहतींची स्थापना. त्याचप्रमाणे ही बँक संशोधन विकास कार्यात गुंतलेल्या औद्योगिक संस्थांना वित्तीय मदत देऊ शकते. अभियांत्रिकी उद्योगांच्या निर्यातीसाठीही बँक वित्तीय मदत देऊ शकते.

भारतीय औद्योगिक विकास बँकेचे व्यवस्थापन व भांडवल (Management and Capital of IDBI)

व्यवस्थापन या बँकेचे व्यवस्थापन संचालक मंडळाकडे सोपविण्यात आले आहे. या संचालक मंडळावर 22 संचालक असतात. या मंडळातील एक संचालक पूर्ण वेळ काम करणारा चेअरमन व कार्यकारी संचालक असतो व त्याची नेमणूक मध्यवर्ती सरकारकडून केली जाते.

इतर संचालकांपैकी एक रिझर्व्ह बँकेचा प्रतिनिधी, दोन वित्तीय संस्थांचे अधिकारी, एक अखिल भारतीय वित्तीय संस्थांचा प्रतिनिधी, तीन सार्वजनिक क्षेत्रातील बँकाचे व राज्य वित्तीय मंडळाचे प्रतिनिधी आणि पाच औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञ, वित्तीय संस्थांमध्ये नोकरी करणान्यांच्या दोन प्रतिनिधींची नेमणूक या संचालक मंडळावर करण्याची कायद्यात तरतूद आहे.

संचालक मंडळाकडून कार्यकारी मंडळाची नेमणूक केली जाते. संचालक मंडळ सर्वसाधारण बँकेचे धोरण ठरविते व त्याची दैनंदिन कार्यवाही कार्यकारी मंडळाकडून केली जाते.

भारतीय औद्योगिक विकास बँकेचे मुख्य ऑफिस मुंबईत असून, त्याची पाच क्षेत्रीय कार्यालये अहमदाबाद (दक्षिण) क्षेत्र), कोलकता (पूर्व क्षेत्र), गोहत्ती ( पूर्वोत्तर क्षेत्र), चेन्नई (दक्षिण क्षेत्र) आणि दिल्ली (उत्तर क्षेत्र) येथे आहेत. बँकेने क्षेत्रीय समित्यांची स्थापना केली असून त्या निरनिराळ्या क्षेत्रीय कार्यालयांना मार्गदर्शन करतात. याचबरोबर भारतीय औद्योगिक बँकेच्या अकरा शाखा बेंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगढ, कोचीन, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, पाटणा आणि सिमला या ठिकाणी स्थापण्यात आल्या आहेत.

भांडवल या बँकेचे स्थापनेच्या वेळी ₹ 100 कोटीचे भागभांडवल होते, ते 31 मार्च, 2012 पर्यंत आणखी वाढविण्यात आले होते. सर्व भागभांडवल मध्यवर्ती सरकारकडून पुरविले गेले आहे. भागभांडवलाशिवाय ही बँक मध्यवर्ती सरकारकडून व रिझर्व्ह बँकेकडून कर्ज काढून व त्याचप्रमाणे बाजारात रोखे विकून आपली वित्तीय सामग्री वाढवू शकते.

भारतीय औद्योगिक विकास बँक देत असलेल्या मदतीचे स्वरुप (Nature of assistance provided by IDBI)

IDBI बैंक औद्योगिक क्षेत्रातील उत्पादनसंस्थांना पुढील प्रकारची मदत देते. भागभांडवल विकत घेणे, भागभांडवल विकण्यासंबंधी हमी देणे, नव्या उत्पादनसंस्था स्थापण्यास वित्तीय साहाय्य, अस्तित्वातील उत्पादनसंस्थांच्या आधुनिकीकरणासाठी वित्तीय साहाय्य, सार्वजनिक, खासगी, संयुक्त व सहकारी क्षेत्रातील मोठ्या व मध्यम आकाराच्या मर्यादित उत्पादनसंस्थांना वित्तीय साहाय्य, तंत्रज्ञांनी स्थापलेल्या व मोठ्या भांडवलाची आवश्यकता असलेल्या व प्रगत तंत्र वापरणाऱ्या उत्पादनसंस्थांना विशेष साहाय्य, नवीन तंत्र शोधणाऱ्या उत्पादनसंस्थांना साहाय्य व मागासलेल्या विभागातील औद्योगिक प्रकल्पांना विशेष वित्तीय साहाय्य भारतीय औद्योगिक विकास बँक परकीय चलनात उत्पादनसंस्थांना कर्जपुरवठा करते.

कापड, ताग, सिमेंट, साखर व अभियांत्रिकी उद्योगांना कमी व्याजदराने कर्जे देते, याचा उद्देश वरील उद्योगांना त्यांच्या आधुनिकीकरणास मदत करणे हा आहे. आधुनिक तंत्रज्ञान आयात करण्यासाठी औद्योगिक उत्पादनसंस्थांना ही बँक मदत देते.

व्यापारी बँका, सहकारी बँका, राज्य वित्तीय महामंडळे, प्रादेशिक बँका, राज्य औद्योगिक विकास महामंडळे इत्यादींनी दिलेल्या कर्जाच्या संबंधात भारतीय औद्योगिक विकास बैंक पुनर्वित्त पुरविण्याची (Refinance Facility) सोय करते. योग्य त्या औद्योगिक क्षेत्रातील हुंड्या वटविणे, बीज भांडवल पुरविणे, निर्यातीसाठी वित्तपुरवठा व मार्गदर्शन करणे, इतर वित्तीय संस्थांना मदत करणे व नवीन उद्योग स्थापण्याच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देणे, लघुउद्योग, ग्रामोद्योग व छोटया उद्योगांना वित्तीय मदत देणे इत्यादी कामे भारतीय औद्योगिक विकास बैंक करते.

हे सुद्धा वाचा-

Related Posts