मेनू बंद

इरावती कर्वे – संपूर्ण माहिती मराठी

आपण या आर्टिकल मध्ये भारतातील व विशेषतः महाराष्ट्रातील मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ व साहित्यिक इरावती कर्वे (१९०५-१९७०) यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Iravati Karve यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

इरावती कर्वे (Iravati Karve) - मराठी माहिती

इरावती कर्वे मराठी माहिती

इरावती कर्वे या मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ व साहित्यिक अशा विविध नात्यांनी महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यांचे वडील अभियंता म्हणून ब्रह्मदेशात नोकरीस होते. तेथेच म्पिंजान या ठिकाणी १५ डिसेंबर, १९०५ रोजी इरावतीबाईंचा जन्म झाला. त्या महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या स्नुषा व दिनकर धोंडो कर्वे यांच्या पत्नी होत. अर्थात, या नातेसंबंधांपेक्षाही स्वतःच्या कर्तृत्वानेच त्यांनी नाव कमविले होते.

इरावती कर्वे यांचे बी. ए. पर्यंतचे शिक्षण पुणे येथे झाले. त्यानंतर ख्यातनाम समाजशास्त्रज्ञ डॉ. जी. एस. घुर्ये यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ‘ चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण ‘ हा प्रबंध लिहून सन १९२८ मध्ये एम. ए. ची पदवी संपादन केली. पुढे ‘ माणसाच्या डोक्याच्या कवटीची नेहमीची असमप्रमाणता ‘ या विषयावर प्रबंध लिहून जर्मनीतील बर्लिन विद्यापीठाची पीएच. डी. ही पदवी संपादन केली.

Iravati Karve यांचे कार्य

इरावती कर्वे यांनी समाजशास्त्र, मानसशास्त्र व मानववंशशास्त्र या विषयांत अतिशय मौलिक संशोधन केले आहे. मानववंशशास्त्रासारख्या विषयात त्यांनी केलेले संशोधनकार्य अत्यंत उपयुक्त ठरले आहे. या विषयात प्रावीण्य संपादन केलेल्या मोजक्याच शास्त्रज्ञांमध्ये त्यांचा समावेश केला जातो. या विषयाच्या अभ्यासासाठी भारतातील निरनिराळ्या प्रदेशांत केलेल्या उत्खननकार्यात त्यांनी प्रत्यक्ष भाग घेतला होता.

मराठीतील ललित लेखिका, म्हणूनही त्या प्रसिद्ध आहेत. एक पुरोगामी विचारवंत म्हणून त्या ओळखल्या जात. स्त्री शिक्षण व स्त्री स्वातंत्र्य या विषयांवरील त्यांची मते अतिशय प्रागतिक होती. त्यांच्या अनेक ग्रंथांतून त्यांच्या प्रागतिक विचारांचा आपणास प्रत्यय येतो. आपल्या युगान्त या ग्रंथात त्यांनी महाभारतकालीन समाजस्थिती, स्त्री – जीवन, आचार – विचार इत्यादी गोष्टींची एका स्वतंत्र दृष्टिकोनातून चिकित्सा केली आहे, त्यांच्या या ग्रंथाला महाराष्ट्र शासनाचा आणि साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला होता.

इरावती कर्वे यांनी काही काळ एस.एन.डी.टी. विद्यापीठाच्या कुलसचिवपदाची जबाबदारी सांभाळली होती. पुढे पुण्याच्या डेक्कन कॉलेजात समाजशास्त्र व मानववंशशास्त्र या विषयांच्या प्राध्यापिका म्हणून त्यांनी काम केले होते. लंडन विद्यापीठात व्याख्यात्या म्हणूनही त्यांची नियुक्ती झाली होती. १९४७ मध्ये दिल्ली येथे भरलेल्या सायन्स काँग्रेसमध्ये मानववंशशास्त्र विभागाच्या अध्यक्षा म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. इरावती कर्वे यांचा मृत्यू ११ ऑगस्ट, १९७० ला झाला.

इरावती कर्वे यांची पुस्तके

इरावतीबाईंनी विविध विषयांवर लिहिलेल्या ग्रंथांपैकी काही महत्त्वाचे ग्रंथ पुढीलप्रमाणे होत – हिंदू सोसायटी अॅन इंटरप्रिटेशन, महाराष्ट्र- लँड अँड इट्स पीपल, किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया, परिपूर्ती, भोवरा, मराठी लोकांची संस्कृती, युगान्त इत्यादी.

हे सुद्धा वाचा –

Related Posts