मेनू बंद

जगातील सर्वात मोठा महासागर कोणता

महासागर म्हणजे महाद्वीपांमधील पाण्याचे एक मोठे क्षेत्र. महासागर खूप मोठे आहेत आणि ते लहान समुद्रांना एकत्र जोडतात. महासागरांनी पृथ्वीचा ७२% भाग व्यापला आहे. पण काय तुम्हाला जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे, माहिती आहे? जर नाही तर आम्ही इथे याबद्दल सविस्तर आणि मजेशीर संपूर्ण माहिती दिली आहे.

जगातील सर्वात मोठा महासागर कोणता

जगातील सर्वात मोठा महासागर कोणता

जगातील सर्वात मोठा महासागर प्रशांत महासागर (Pacific Ocean) आहे. प्रशांत महासागर हा पृथ्वीवरील सर्वात खोल देखील महासागर आहे. तसेच, सर्वात लहान महासागर आर्क्टिक महासागर (Arctic Ocean) आहे. प्रशांत महासागराच्या उत्तरेला आर्क्टिक महासागर, दक्षिणेला दक्षिणी महासागर, पश्चिमेला आशिया व ऑस्ट्रेलिया तर पूर्वेला अमेरिका खंड आहेत. प्रशांत महासागराचे एकुण १.६९२ कोटी वर्ग किमी इतके क्षेत्रफळ असलेल्या प्रशांत महासागराने पृथ्वीच्या पृष्ठभागाचा ३२ टक्के भाग व्यापला आहे व जगातील एकूण पाण्याच्या ४६ टक्के पाणी प्रशांत महासागरामध्ये आहे.

१०,९११ मीटर (३५,७९७ फूट) इतकी खोली असलेला मेरियाना गर्ता हा प्रशांत महासागरातील (पॅसिफिक महासागर – The Pacific Ocean) सर्वात खोल बिंदू आहे. न्यू गिनी हे प्रशांत महासागरामधील सर्वात मोठे बेट आहे.

जगातील सर्वात मोठा महासागर कोणता

पॅसिफिकला जोडून खंडांच्या किनाऱ्यांना अनुगामी असे अनेक अरुंद समुद्र आहेत. हे समुद्र बव्हंशी याच्या पश्चिम भागात आढळतात. महत्त्वाच्या समुद्रांत बेरिंग, अल्यूशन, ओखोट्स्क, सेलेबीझ, जपानी समुद्र, पीत समुद्र, पूर्व आणि दक्षिण चिनी समुद्र, बांदा समुद्र यांचा समावेश होतो.पीत समुद्र सोडल्यास इतर सर्व समुद्रांची खोली १,५०० फॅदमपेक्षा जास्त आहे. या महासागराच्या पूर्व भागातील समुद्रांत प्रामुख्याने कॅलिफोर्नियाचे आखात आणि ब्रिटिश कोलंबियाचा समुद्र याचा समावेश होतो.

प्रशांत महासागराचा शोध

पॅसिफिक महासागरांच्या समन्वेषणास खऱ्या अर्थाने Ferdinand Magellan याने सुरुवात केली. तत्पूर्वी भारतीय चिनी लोकांनी पॅसिफिक महासागरातील काही बेटांवर वस्ती केल्याचे अनेक उल्लेख ठिकठिकाणी आढळत असले, तरी त्यासंबंधीची सुसंगत माहिती मिळत नाही.

जगातील सर्वात मोठा महासागर कोणता
फर्डिनंड मॅगेलन

कोलंबसच्या पर्यटनाने प्रोत्साहित होऊन पोर्तुगीजांनी ब्राझीलमध्ये प्रवेश केला आणि स्पॅनिश लोकांनी दक्षिण अमेरिका खंड ओलांडून त्यांच्या पश्चिम किनाऱ्यावर जाण्याच्या प्रयत्न केला. १५१३ मध्ये बॅल्बोआ या स्पॅनिशाने पनामा संयोगभूमी ओलांडली. आणि थोड्याच वर्षांनंतर कोर्तेझ याने मेक्सिको पादाक्रांत करून कॅलिफोर्नियाच्या आखाताचा शोध लावला.

इंग्रज आणि फ्रेंच लोकांनी उत्तर अमेरिकेत वसाहती स्थापन केल्या व डच लोकांप्रमाणेच वायव्येकडील आर्क्टिक महासागरातून चीनकडे जाणाऱ्या मार्गाचा शोध घेण्यास सुरुवात केली. फर्डिनंड मॅगेलनने पॅसिफिक महासागरांच्या मोहिमेवर असताना (१५१९–२१) फिलिपीन्स बेटांनजीक दिसलेल्या महासागरांच्या ‘प्रशांत’ स्वरूपावरून त्या ‘पॅसिफिक’ हे नाव दिले.

नंतर शास्त्रोक्त समन्वेषणास सुरुवात झाली. या दृष्टीने कॅप्टन कुकचे (१७६८–७८) समन्वेषणाचे कार्य अधिक मोलाचे ठरते. त्याच्या तीन पर्यटनांत त्याने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांची बरीच माहिती मिळवून अंटार्क्टिका खंडाभोवती एक पूर्ण फेरी घातली.

पॅसिफिक महासागर आणि त्यातील बेटांच्या समन्वेषणाचे श्रेय मुख्यतः खालील संशोधकांकडे जाते: फर्डिनंड मॅगेलन या पोर्तुगीज समन्वेषकाने १५१९–२० मध्ये मॅगेलन सामुद्रधुनीचे, तर १६०५-०६ या काळात स्पॅनिश दर्यावर्दी पेद्रो फरेनँदीश दे कैरॉज आणि लुई व्हाएथ दे टॉरेस यांनी ताहिती, न्यू हेब्रिडीझ व फिलिपीन्स बेटांचे समन्वेषण केले.

याच शतकात (सतरावे) आबेल टास्मान या डच समन्वेषकाने १६४२–४४ च्या दरम्यान टास्मानिया, न्यूझीलंड आणि फिजी बेटे यांचा शोध लावला. अठराव्या शतकातील इंग्लिश समन्वेषक जेम्स कुक, बेरिंग सामुद्रधुनी ओलांडणारा रशियन दर्यावर्दी व्हिटुस बेरिंग (१७२८–४१) यांचे कार्यही महत्त्वाचे आहे. एकोणिसाव्या शतकात ‘चॅलेंजर’(१८७२–७६) ‘तस्करॉर’ ‘पॅनेट’, ‘प्लॅनेट’ या जहाजांच्या सफरींस शास्त्रीय दृष्ट्या फार महत्त्व प्राप्त झाले.

भूखंड मंच

समुद्र किनाऱ्यालगतच्या १०० फॅदमपर्यंत खोली असलेल्या उथळ सागरतळाला भूखंड मंच म्हणतात. भूखंड मंचाचे या महासागरातील शेकडा प्रमाण ५·७ भरते. अटलांटिक महासागरात ते १३·३ टक्के आहे. या सागरतळाच्या उताराचे सरासरी प्रमाण सु. १° आहे पण ठिकठिकाणी ते कमी-अधिक प्रमाणात बदललेले दिसते.

भूखंड उतार

ऑस्ट्रेलिया आणि आशिया या दोन खंडांच्या पूर्व किनाऱ्यालगतचा भूखंड मंचाचा भाग बराच रुंद म्हणजे १६० ते १,६०० किमी. आहे. या मंचाचे जास्त उंचीचे प्रदेश सागर-पृष्ठावर येऊन तेथे कूरील, जपान, फिलिपीन्स, इंडोनेशिया,न्यूझीलंड इ. द्वीपसमूह तयार झाले आहेत. पॅसिफिक महासागराच्या पूर्व किनाऱ्यालगतचा भूखंड मंचाचा भाग बराच अरुंद (सरासरी रुंदी ८० किमी.) आहे.

सागरी खंदक आणि गर्ता

पॅसिफिक महासागराच्या तळभागाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तेथे विशेषतः महासागराच्या पश्चिम भागात खंदक आणि त्यांतील गर्ता आढळतात. हे लांब पण चिंचोळे खंदक चापाकृती बेटांच्या पूर्वेस व त्यावरील पर्वतश्रेणींना समांतर पसरलेले असून, त्यांची खोली ६,००० मी. पेक्षा अधिक आहे. या खंदकांच्या अतिखोल भागास गर्ता म्हणतात.

हवामान

पॅसिफिक महासागरावरील हवामान-अभ्यास अद्याप अपूर्ण आहे, पण पृथ्वीच्या हवामानाचा विचार करता महत्त्वाचा आहे. विस्तीर्ण सपाट प्रदेश असल्याने ग्रहीय भाररचना व वारे या महासागरावरच लक्षणीय स्वरूपाचे आढळतात. विशेषत: दक्षिण  पॅसिफिकमध्ये लक्षणीय पूर्व व पश्चिम वारे आढळतात.  उ. गोलार्धात मात्र विस्तीर्ण किनारी भूखंडांचा प्रभाव वाऱ्यांवर पडलेला दिसतो.

पूर्व वारे साधारणतः ३०° अक्षवृत्तांच्या पट्ट्यात पूर्वेकडून वाहतात व त्यांचे तपमान सुरुवातीस कमी असते, जसजसे ते विषुववृत्तीय प्रदेशाजवळ येतात तसतसे ते उबदार व आर्द्र बनतात. ते सरासरी १३ नॉट वेगाने वाहतात. या वाऱ्यांबरोबर पाणीही ढकलले जाते. त्यामुळे पूर्व पॅसिफिक किनाऱ्यावर निम्नस्तरीय थंड पाणी वर येऊन अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर दाट धुकेसुद्धा निर्माण होते.

पश्चिमी वारे दक्षिण पॅसिफिक महासागरात विना-अडथळा भयानक वेगाने वाहतात. म्हणूनच त्यांस ‘गरजणारे चाळीस’ व ‘खवळलेले पन्नास’ अशी नावे दिलेली आहेत. दक्षिणेस व उत्तरेस ध्रुवीय पूर्व वारे या उबदार वाऱ्यांच्या प्रदेशात थंड हवा आणतात, त्यांतून आवर्त वादळे निर्माण होतात व ही वादळे पश्चिमेकडून पूर्वेस जातात.

टायफून

विषुववृत्तीय पश्चिम पॅसिफिक महासागरातील फिलिपीन व इंडोनेशियन समुद्रांत वेगवान विषुववृत्तीय चक्री वादळे निर्माण होतात, त्यांस ‘टायफून’ म्हणतात. ही वादळे पुढे आग्नेय आशियात व द. चीनमध्ये जातात. सागरपृष्ठीय पाण्याचे तपमान व त्याचे वितरण अनेक गोष्टींवर अवलंबून असते. त्यांत प्रामुख्याने महासागराचे स्थान आणि आकार, सौर प्रारणाचा कालावधी व तीव्रता, ऋतू व बाष्पीभवनाचे प्रमाण, ऊष्मातोल इ. गोष्टींचा समावेश होतो.

उत्तर पॅसिफिक प्रवाह

या महासागराचा उत्तर विषुववृत्तीय प्रवाह पूर्वेस मेक्सिकोच्या प. किनाऱ्याजवळून पश्चिमेकडे (फिलिपीन्सकडे) दिवसास सु. २४ किमी. या गतीने वाहत असून, त्याची वाहण्याची कमाल गती दर सेकंदास २० सेंमी. असते. या प्रवाहाची दक्षिण मर्यादा हिवाळ्यात ५° उ. आणि उन्हाळ्यात १०° उ. अक्षवृत्तापर्यंत असते. सु. १२,००० किमी. अंतर ओलांडल्यावर फिलिपीन्स बेटांच्या पूर्व किनाऱ्याजवळ त्यास दोन फाटे फुटतात. त्यांपैकी एक फाटा उत्तरेस व दुसरा दक्षिणेस वाहतो.

उत्तरेस वाहणारा ‘कुरोसिवो’ या नावाने ओळखला जातो. तैवानच्या आखातातून ३५° उ. अक्षवृत्ताच्या पलीकडे हा प्रवाह वाहत जातो. तेथून त्याचा एक फाटा पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावाखाली येऊन पूर्वेकडे वाहू लागतो. कुरोसिवो प्रवाहची खोली ७०० मी. व कमाल गती दर सेकंदास ८९ सेंमी. पर्यंत आढळून येते. या प्रवाहातील पाण्याचे तपमान ८°से. असते.

दक्षिण पॅसिफिक प्रवाह

उत्तर पॅसिफिक महासागराप्रमाणे दक्षिण पॅसिफिक महासागरामध्येही प्रवाहांचे स्वतंत्र चक्र चालू असते. दक्षिण विषुववृत्तीय प्रवाहामुळे उष्ण कटिबंधातील पाणी प्रथम विषुववृत्ताजवळून पश्चिमेकडे वाहत जाते. फिलिपीन्स बेटांजवळ आल्यावर हा प्रवाह दक्षिणेस न्यू गिनी बेटाकडे व नंतर ऑस्ट्रेलिया खंडाच्या पूर्व किनाऱ्याने दक्षिणेस वाहू लागतो. त्या ठिकाणी तो ‘पूर्व ऑस्ट्रेलियन प्रवाह’ म्हणून ओळखला जातो. हा प्रवाह ३०° द. अक्षवृत्ताच्या पलीकडे गेल्यावर पूर्वेकडे वाहू लागतो.

एल् निनो

पुढे दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्याजवळ पोहोचल्यावर ‘पेरू प्रवाह’ या नावाने उत्तरेकडे वाहू लागतो. या ठिकाणी अंटार्क्टिका खंडाकडून येणारा शीत प्रवाह या उष्ण प्रवाहास मिळाल्याने या भागात वादळे आणि भोवरे निर्माण होतात. उत्तर गोलार्धातील उन्हाळ्यात पेरू प्रवाहाची उत्तर मर्यादा विषुववृत्ताच्या उत्तरेकडे गेलेली दिसते. हिवाळ्यात पेरू प्रवाह विषुववृत्ताच्या दक्षिणेसच असतो व अशा वेळी एक्वादोरच्या किनाऱ्याने उत्तरेकडून उबदार हलके पाणी दक्षिणेकडे वाहते. या प्रवाहास ‘एल् निनो’ म्हणतात.

भरती-अहोटी

पॅसिफिक महासागरातील टाँकिनचे आखात, टॉरस सामुद्रधुनी व कॅनडाच्या किनाऱ्यावरील व्हँकूव्हर बेटाजवळ दिवसातून एकच भरती व एकच ओहोटी येते. तर ताहिती बेटाजवळ भरती-अहोटी चंद्राबरोबर न येता सूर्याबरोबर येत असलेली आढळते. इतरत्र भरती–अहोटी सामान्यतः मिश्र स्वरूपाची व कमी उंचीची आढळते. ताहिती येथे तर अर्धा मीटर इतकीच भरती-ओहोटी दिसते. टोकिओजवळ केवळ १·७ मी. व तेवढीच केप हॉर्नजवळ आढळते. कॅलिफोर्निया व कोरिया यांच्या आखातांत मात्र भरतीची उंची १२ मी. पेक्षाही जास्त आढळते.

आता आपणास कळलंच असेल जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आणि त्याचा काय इतिहास आहे. अपेक्षा आहे की दिलेली माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल. जर ही माहिती शेअर करायची इच्छा असेल तर खाली दिलेल्या शेअर बटनाद्वारे शेअर करू शकता.

हे सुद्धा वाचा –

Related Posts