मेनू बंद

क्रियापद म्हणजे काय | क्रियापदाचे प्रकार किती | Kriyapad in Marathi

Kriyapad in Marathi Grammar: मराठी व्याकरणामध्ये ‘ क्रियापद ‘ हा अतिशय महत्वाचा भाग आहे. त्यामुळे आपण या लेखात क्रियापद म्हणजे काय आणि क्रियापदाचे किती प्रकार आहेत हे सविस्तरपणे समजून घेऊया.

क्रियापद म्हणजे काय | क्रियापदाचे प्रकार किती | Kriyapad in Marathi

क्रियापद विचार 8 पुढील वाक्ये वाचा :

(१) म्हैस दूध देते. (२) सुरेश देवाची प्रार्थना करतो. (३) लहान मुलांनी खरे बोलावे. (४) भारताने क्रिकेट मॅच जिंकली.

वरील वाक्यांत ठळक अक्षरांत छापलेले शब्द पाहा. ‘ देते, करतो, बोलावे, जिंकली ‘ हे शब्द त्या त्या क्रिया दाखवितात. ‘ देते ‘ या शब्दात देण्याची क्रिया आहे. इतर वाक्यांमध्ये ‘ करण्याची, बोलण्याची, जिंकण्याची क्रिया आहे. शिवाय हे शब्द त्या – त्या वाक्यांचे अर्थ पूर्ण करतात. अशा शब्दांना ‘ क्रियापदे ‘ असे म्हणतात.

क्रियापद म्हणजे काय

क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द होय. क्रियापद या शब्दातील ‘ पद ‘ या शब्दाचा अर्थ ‘ शब्द ‘ असा आहे. मग क्रियापद या शब्दाचा अर्थ ‘ क्रिया दाखविणारा शब्द ‘ असा होईल. तर क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला धातू म्हणतात. जसे – जाणे मध्ये जा, येणे मध्ये ये, असणे मध्ये अस इत्यादि.

धातुसाधिते किंवा कृदन्ते

धातूला प्रत्यय लागून क्रियापदाची विविध रूपे बनतात. जसे- बस – तो , बस ला , बस – तात , वगैरे. धातूपासून बनलेली ही रूपे वाक्याचा अर्थ पूर्ण करतात. ‘ गा- ) णे , गा – ऊन , गा – ताना ‘ हीदेखील धातूपासून तयार झालेली रूपे आहेत. ती वाक्याचा अर्थ पूर्ण करीत नाहीत. धातूला विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखविणाऱ्या शब्दांना धातुसाधिते किंवा कृदन्ते असे म्हणतात.

पुढील वाक्ये पाहा.

(१) ह्या मुली पूर्वी फार चांगल्या गात.
(२) त्या आता गात नाहीत.

वरील वाक्यात ‘ गा ‘ या धातूला ‘ त ‘ हा प्रत्यय लागून ‘ गात ‘ अशी क्रियावाचक रूपे आली आहेत. पहिल्या वाक्यात ‘ गात ‘ हे वाक्याचा अर्थ पूर्ण करते. म्हणून ते क्रियापद आहे. दुसऱ्या वाक्यात ‘ गात ‘ हे केवळ धातुसाधित आहे.

क्रियापदांचे प्रकार

क्रियापदांचे मुख्य प्रकार दोन आहेत :

  1. सकर्मक क्रियापद
  2. अकर्मक क्रियापद

(१) सकर्मक क्रियापद

पुढील वाक्ये पाहा :

  1. शांती पाणी काढते.
  2. नितीन निबंध लिहितो.
  3. आरोही लाडू खाते.

वरील वाक्यांना पूर्ण अर्थ आहे. जर ‘ शांती काढते ‘ , ‘ नितीन लिहितो ‘ , ‘ आरोही खाते ‘ एवढीच वाक्ये दिली तर त्यांचे अर्थ पूर्ण होत नाहीत. म्हणजेच ‘ काढते ‘ या क्रियापदाला ‘ पाणी ‘ या कर्माची जरुरी आहे. म्हणून ‘ काढते ‘ हे क्रियापद सकर्मक आहे. तसेच ‘ लिहितो ‘ , ‘ खातो ‘ , या क्रियापदांचे बाबतीतही आहे. यावरून असे दिसते की, ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी असते. त्यास ‘ सकर्मक क्रियापद ‘ असे म्हणतात.

(२) अकर्मक क्रियापद

पुढील वाक्ये पाहा :

  1. मी रस्त्यात पडलो.
  2. आज भाऊबीज आहे.
  3. सुनील उद्या पुण्याला जाईल.

वरील वाक्यातील ‘ मी रस्त्यात पडलो ‘ या वाक्यात पडण्याची क्रिया कर्त्यावरच घडते. ती क्रिया कर्त्यापासून पुढे जात नाही. ‘ मी पडलो ‘ यात पुरा अर्थ आहे. ‘ पड़ला ‘ या क्रियापदाला कर्माची जरुरी नाही ; म्हणून ‘ पडलो ‘ हे क्रियापद अकर्मक आहे. उरलेल्या वाक्यांचे बाबतीत तसेच म्हणता येईल. यावरून असे दिसते की, कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशीच थांबत असेल किंवा कर्त्याच्या ठिकाणी लय पावत असेल, तर त्या क्रियापदाला अकर्मक क्रियापद असे म्हणतात.

हे सुद्धा वाचा

Related Posts