मेनू बंद

लिंग म्हणजे काय | लिंगाचे प्रकार कोणते | Ling in Marathi Grammar

Ling in Marathi Grammar: मराठी व्याकरणामध्ये ‘लिंग विचार’ हा अतिशय महत्वाचा भाग आहे. त्यामुळे आपण या लेखात लिंग म्हणजे काय आणि लिंगाचे प्रकार कोणते? हे सविस्तरपणे समजून घेऊया.

लिंग म्हणजे काय | लिंगाचे प्रकार कोणते | Ling in Marathi Grammar

पुढील वाक्ये वाचा –

(१) मुलगा शाळेत जातो. (२) मुलगे मस्ती करतात. (३) मुलगी रंगोली घालते. (४) मुलांना क्रिकेट आवडते.

वरील वाक्यांत ‘ मुलगा ‘ या शब्दाची ‘ मुलगी, मुलगे, मुलांना ‘ अशी रूपे झालेली आहेत. नामांच्या रूपात हा जो बदल होतो किंवा विकार होतो त्यास ‘ विकरण ’ असे म्हणतात . हा बदल केव्हा व कसा होतो ते आपण पाहू. ‘ मुलगा ’ याचे ‘ मुलगी ‘ असे जे रूप बदलले ते त्याचे ‘ लिंग ‘ बदलल्यामुळे, ‘ मुलगे ‘ असे जे रूप झाले ते वचन बदलल्यामुळे, व ‘ मुलांना ‘ असे जे रूप झाले ते विभक्ती बदलल्यामुळे.

लिंग, वचन व विभक्ती यांमुळे नामाच्या रूपात बदल होतो. त्यांना ‘ नामांचे विकरण ‘ असे म्हणतात. यांचा आपण क्रमाने विचार करू.

नाम म्हणजे प्रत्यक्ष किंवा काल्पनिक अशा कोणत्याही वस्तूला दिलेले नाव होय. वस्तूंमध्ये आपण (१) सजीव व (२) निर्जीव असे दोन भाग करतो. सजीवांमध्ये (१) मनुष्यप्राणी व (२) मनुष्येतर (पशू, पक्षी, कृमी, कीटक वगैरे असे भाग पडतात. मनुष्यप्राण्यांत काही पुरुष असतात तर काही स्त्रिया असतात. इतर प्राण्यांमध्ये आपण हा फरक आपण ‘ नर ‘ व ‘ मादी ‘ अशा शब्दांनी करतो. प्राणिमात्रांत पुरुष – स्त्री , नर – मादी असा भेद आपण करतो तो त्यांच्या लिंगांवरून.

लिंग म्हणजे काय

नामाच्या रूपावरून एखादी वस्तू वास्तविक अगर काल्पनिक पुरुषजातीची आहे, की स्त्री जातीची आहे, की दोन्हीपैकी कोणत्याच जातीची नाही असे ज्यावरून कळते त्याला त्या शब्दाचे लिंग असे म्हणतात. मराठीत लिंगे तीन मानतात: (१) पुल्लिंग, (२) स्त्रीलिंग व (३) नपुंसकलिंग. लिंग याचा अर्थ ‘ खूण ‘ किंवा ‘ चिन्ह ‘ असा आहे.

लिंगाचे प्रकार कोणते

१. पुल्लिंग

प्राणिवाचक नामांतील पुरुष किंवा नरजातीचा बोध करून देणाऱ्या शब्दाला पुरुषलिंगी, पुंलिंगी किंवा पुल्लिंगी असे म्हणतात. जसे – चुलता, शिक्षक, घोडा, चिमणा, मुंगळा इ.

२. स्त्रीलिंग

स्त्री किंवा मादी जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दांना स्त्रीलिंगी असे म्हणतात. जसे – चुलती, शिक्षिका, घोडी, चिमणी, मुंगी इ.

३. नपुंसकलिंग शब्द

निर्जीव वस्तुवाचक शब्दांवरून पुरुष किंवा स्त्री यांपैकी कोणत्याच जातीचा बोध होत नाही. जसे पुस्तक, दगड, शहर, शाई, कागद वगैरे. अशा शब्दांना खरे तर नपुंसकलिंगी असे म्हणावयास पाहिजे.

पण मराठी भाषेच्या व्यवहारात प्रत्यक्ष तसे होत नाही. यांतील ‘ दगड , कागद ‘ हे पुल्लिंगी, ‘ दौत , शाई ‘ हे शब्द आपण स्त्रीलिंगी मानतो. प्राणिमात्रांचे लिंग हे वास्तविक असे असते तर निर्जीव वस्तूंचे लिंग हे ‘ काल्पनिक ‘ असते.

काही निर्जीव वस्तू सजीव आहेत अशी कल्पना करून आपण केव्हा – केव्हा बोलतो.

जसे –

  1. सूर्य ढगाआड लपला.
  2. सागर एकदम खवळला.
  3. वनश्री हसू लागली.
  4. झरे नृत्य करीत होते.

अशा वाक्यांत निर्जीव वस्तूंवरही आपण काल्पनिक पुरुषत्व किंवा स्त्रीत्व लादून आपण बोलत असतो. केव्हा केव्हा आकार, शक्ती, कठोरपणा, राकटपणा, यांसारखे पुरुष प्राण्यांचे सर्वसामान्य गुणधर्म ज्या वस्तूंत आपणास आढळतात. त्यांना आपण पुल्लिंगी मानतो. लहान आकार, कोमलपणा, देखणेपणा, सौम्यपणा, चांचल्य यांसारखे स्त्रीप्राण्यांत आढळून येणारे सामान्य गुण ज्या वस्तूंत आढळतात त्यांना स्त्रीलिंगी असे आपण मानतो. उदाहरणार्थ, लोटा पुल्लिंगी तर लोटी स्त्रीलिंगी, वारा पुल्लिंगी तर झुळूक स्त्रीलिंगी, वृक्ष पुल्लिंगी तर वेल स्त्रीलिंगी.

सूर्य, सागर, मृत्यू ही पुल्लिंगी तर वनश्री, वीज हे शब्द आपण स्त्रीलिंगी मानतो. पण हा नियम संपूर्णपणे पाळला जात नाही. डोर हा दोरीपेक्षा आकाराने लहान असूनही तो पुल्लिंगी तर डोरी स्त्रीलिंगी. ओढा हा नदीपेक्षा लहान असूनही तो पुल्लिंगी व नदी स्त्रीलिंगी. मराठीतील लिंग व्यवस्था ही अत्यंत धरसोडीची व अनियमित आहे.

हे सुद्धा वाचा –

Related Posts