मेनू बंद

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे जीवन व कार्य- संपूर्ण माहिती मराठी

आपण या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे (१८७३-१९४४) यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Maharshi Vitthal Ramji Shinde यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

 महर्षी विठ्ठल रामजी शिंदे -  Maharshi Vitthal Ramji Shinde

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे माहिती मराठी

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म २३ एप्रिल, १८७३ रोजी कर्नाटकातील जमखिंडी येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव यमुनाबाई असे होते. रामजी व यमुनाबाई या दांपत्याला वीस मुले झाली ; पण त्यांपैकी फक्त पाचच जगली. विठ्ठल हा त्यांतील सर्वांत मोठा मुलगा होता. त्याचे पाळण्यातील नाव तुकाराम असे होते. पण रामजी शिंदे हे पंढरपूरच्या विठ्ठलाचे भक्त असल्याने त्यांनी आपल्या या मुलाचे नाव विठ्ठल असेही ठेवले व पुढे तेच नाव रूढ झाले.

विठ्ठल रामजी शिंदे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण त्यांच्या जमखिंडी या गावीच झाले. शाळेत ते एक हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जात होते. सन १८९१ मध्ये ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर काही काळ त्यांनी शिक्षकाची नोकरी केली. पुढे १८९३ मध्ये ते उच्च शिक्षणासाठी पुण्यास आले आणि तेथील फर्गसन महाविद्यालयात त्यांनी आपले नाव दाखल केले. वास्तविक पाहता त्यांचे घराणे जहागीरदाराचे होते; पण त्यांच्या वडिलांच्या काळात आर्थिक स्थिती बरीच खालावली; त्यामुळे महर्षीींना आपले शिक्षण घेताना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागले.

तथापि, पुण्याच्या ‘ डेक्कन मराठी एज्युकेशन असोसिएशन’ने त्यांना थोडीफार मदत केली. बडोदानरेश सयाजीराव गायकवाड यांनीही त्यांना शिष्यवृत्ती सुरू केली; त्यामुळे आपले शिक्षण ते पूर्ण करू शकले. सन १८९८ मध्ये त्यांनी बी. ए. ची पदवी संपादन केली. पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर महर्षी शिंदे मुंबईला गेले व त्या ठिकाणी त्यांनी वकिलीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. दरम्यानच्या काळात त्यांचा प्रार्थना समाजाशी संबंध आला होता . प्रार्थना समाजाची तत्त्वे व त्याचा समाजसुधारणेविषयीचा दृष्टिकोन यांचा त्यांच्या मनावर मोठाच प्रभाव पडला.

पुढे सन १९०१ मध्ये प्रार्थना समाजाच्या साहाय्याने त्यांना पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला जाण्याची संधी मिळाली. इंग्लंडमधील दोन वर्षांच्या वास्तव्यात महर्षी शिंद्यांनी त्या देशाच्या , तसेच युरोपातील अन्य काही देशांच्या सामाजिक स्थितीचा व सांस्कृतिक जीवनाचा अभ्यास केला. ऑक्टोबर, १९०३ मध्ये ते मायदेशी परतले. इंग्लंडहून मायदेशी परतताना त्यांनी अॅमस्टरडॅम येथे भरलेल्या उदार धर्म परिषदेत भाग घेतला त्या ठिकाणी त्यांनी ‘ हिंदुस्थानातील उदार धर्म ‘ या विषयावरील प्रबंध वाचला.

भारतात परतल्यावर महर्षी शिंद्यांनी सर्व प्रकारचे मानमरातब आणि उच्च अधिकाराच्या जागा नाकारून प्रार्थना समाजाचे कार्य करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर अस्पृश्योद्धाराचे कार्यही त्यांनी हाती घेतले. शेतकऱ्यांच्या स्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातदेखील त्यांचा सहभाग होता. भारतीय समाजातील पददलित व उपेक्षित वर्गाची सेवा करण्यासाठी महर्षी शिंदे यांनी आयुष्यभर कष्ट उपसले. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा मृत्यू २ जानेवारी, १९४४ रोजी पुणे येथे झाला.

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे जीवन व कार्य

महर्षी शिंदे यांनी इंग्लंडहून भारतात परत आल्यावर दरमहा फक्त शंभर रुपये मानधनावर प्रार्थना समाजाचे कार्य करण्याचे मान्य केले. भारतीय समाजात प्रचलित असलेल्या अनिष्ट चालीरीती, रूढी यांना आळा बसावा व हिंदू धर्मात सुधारणा घडवून आणाव्यात, या उद्देशाने एकोणिसाव्या शतकात येथील काही समाजसुधारकांनी ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, आर्य समाज यांसारख्या संघटना स्थापन केल्या होत्या. ब्राह्मो समाज व प्रार्थना समाज यांच्या उदात्त तत्त्वांचे व उद्दिष्टांचे आकर्षण महर्षी शिंदे यांना वाटले.

आपला समाज रूढी व परंपरांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी, तसेच आपल्या लोकांतील धार्मिक अंधश्रद्धा, भोळ्या समजुती व कर्मकांड यांपासून त्यांची कायमची सुटका करण्यासाठी वरील दोन्ही संघटनांच्या तत्त्वांचा लोकांमध्ये प्रसार झाला पाहिजे, या निष्कर्षाप्रत ते येऊन पोहोचले. याच दृष्टीने त्यांनी प्रार्थना समाजाचे कार्य हाती घेतले. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी त्यांनी देशभर दौरे काढले.

देशातील अनेक शहरांत त्यांनी एकेश्वरी धर्मपरिषदा घेतल्या आणि ठिकठिकाणच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले व प्रार्थना समाजाचे प्रचारक या नात्याने महर्षी शिंदे यांनी सातारा जिल्ह्यात बरीच वर्षे कार्य केले. सन १९९० नंतर प्रार्थना समाजाच्या प्रचारकार्याशी असलेला संबंध त्यांनी तोडून टाकला; पण ब्राह्मो समाजाचे कार्य त्यापुढेही चालू ठेवले. ब्राह्मो समाजाचे मंगळूर येथील आचार्य म्हणून काही काळ त्यांनी काम केले. या समाजाच्या बंगालमधील अनेक नेत्यांशी व कार्यकर्त्यांशी त्यांचा निकटचा संबंध होता.

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे कार्य

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्य जातींच्या उद्धारासाठी केलेले कार्य अत्यंत मोलाचे आहे. भारतीय समाजातील अस्पृश्यांची स्थिती पाहून त्यांच्या मनास अतिशय यातना झाल्या. सन १९०५ मध्ये महर्षी शिंदे अहमदनगरजवळ असलेल्या भिंगार या गावी अस्पृश्य बांधवांच्या सभेला निमंत्रित म्हणून गेले होते. त्या सभेत, अस्पृश्यांनी आपणास भोगाव्या लागत असलेल्या हालअपेष्टांच्या आणि आपल्यावर होत असलेल्या जुलूम जबरदस्तीच्या हकिकती निवेदन केल्या.

अर्थात, अस्पृश्य बांधवांच्या वाट्याला आलेल्या दुर्दैवी जीवनाचे प्रत्यक्ष दर्शन त्यांना सुरुवातीपासूनच झाले होते. त्या दर्शनाने त्यांचे अंतःकरण पिळवटून गेले. आपल्या समाजातील या दुर्दैवी घटकांसाठी काहीतरी कृती करणे हे आपले कर्तव्य ठरते, असे त्यांच्या संवेदनक्षम मनाला वाटले. या जाणिवेतून ते अस्पृश्योद्धाराच्या कार्याकडे वळले.

डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया

अस्पृश्य बांधवांच्या उद्धाराचे कार्य करण्यासाठी महर्षी शिंद्यांनी १८ ऑक्टोबर, १९०६ रोजी ‘ डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया ‘ या संस्थेची मुंबई येथे स्थापना केली.

तिचे प्रमुख उद्देश पुढीलप्रमाणे होते –

  1. अस्पृश्य समाजात शिक्षणाचा प्रसार घडवून आणणे.
  2. अस्पृश्य बांधवांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे.
  3. अस्पृश्य बांधवांच्या अडीअडचणींचे निवारण करणे.
  4. अस्पृश्य बांधवांना खऱ्या धर्माची शिकवण देणे आणि त्यायोगे त्यांचे शीलसंवर्धन घडवून आणणे, इत्यादी.

डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या वतीने महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अनेक उपक्रम हाती घेतले. त्यांमध्ये अस्पृश्यांच्या मुलांसाठी शाळा सुरू करणे, त्यांच्यासाठी वसतिगृहे उघडणे, अस्पृश्यांच्या वस्तीत शिवणकामांचे वर्ग चालविणे, त्यांच्या प्रबोधनासाठी व्याख्याने, कीर्तने आयोजित करणे, आजारी माणसांची शुश्रुषा करणे इत्यादी गोष्टींचा समावेश होता. डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या शाखा मुंबई, पुणे, हुबळी, सातारा, ठाणे, दापोली, मालवण, आल्या होत्या. मंगळूर, मद्रास (आताचे चेन्नई), अकोला, अमरावती, इंदूर, भावनगर, कोल्हापूर इत्यादी ठिकाणी उघडण्यात

अस्पृश्यतेच्या प्रश्नावर विशेष भर

अस्पृश्यतेच्या प्रश्नाची सोडवणूक व्हावी म्हणून महर्षी शिंद्यांनी देशभर दौरे आयोजित केले आणि या प्रश्नावर जनजागृती घडवून आणण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी ठिकठिकाणी अस्पृश्यता निवारण परिषदा भरविल्या. सन १ ९ १७ मध्ये कोलकाता येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात अस्पृश्यता निवारणासंबंधीचा ठराव संमत व्हावा म्हणून त्यांनी पुढाकार घेतला. अस्पृश्यता निवारणाच्या कार्याची दिशा ठरविण्यासाठी महर्षी शिंदे यांनी २३ व २४ मार्च, १९१८ रोजी बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद आयोजित केली होती.

महर्षी शिंदे यांनी अस्पृश्योद्धारासाठी केलेल्या कार्याचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी या कार्याला आपल्या जीवनाचे उद्दिष्ट बनविले होते. अस्पृश्यांविषयी त्यांच्या मनात करुणा ओतप्रोत भरली होती. अस्पृश्यांसाठी जिव्हाळ्याच्या भावनेतून कार्य करणारे आणि त्यासाठी सर्व प्रकारच्या संकटांना तोंड देण्याची तयारी ठेवणारे महात्मा फुले यांच्यानंतरचे महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक महर्षी शिंदे हेच होत. अस्पृश्यता निवारणाचे कार्य करण्यासाठी ते आपल्या कुटुंबीयांसह अस्पृश्यांच्या वस्तीत राहावयास गेले.

अस्पृश्य बांधवांच्या सुखदुःखांशी ते खऱ्या अ एकरूप झाले . त्याबद्दल त्यांनी आपल्या ज्ञातिबांधवांचा रोषही पत्करला. त्यांच्या जातीच्या लोकांनी त्यांची ‘ महार शिंदे ‘ म्हणून हेटाळणी केली. द्वारकापीठाच्या शंकराचार्यांनी त्यांचा ‘ आधुनिक काळातील महान कलिपुरुष ‘ असा निषेध केला होता; परंतु अशा प्रकारच्या संकटांनी डगमगून न जाता किंवा समाजाकडून होत असलेल्या विरोधाला न जुमानता त्यांनी आपले कार्य चालूच ठेवले. सन १९३३ मध्ये ‘ भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न ‘ हे पुस्तक लिहून या प्रश्नाकडे लोकांचे लक्ष वेधण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

महर्षी शिंद्यांनी अस्पृश्यता निवारणासाठी केलेल्या कार्यात त्यांच्या भगिनी जनाक्का यांचाही महत्त्वपूर्ण सहभाग होता. त्यांनी अस्पृश्यांच्या वस्तीत राहून दलित बांधवांची सेवाशुश्रूषा केली. त्यांच्या मुलाबाळांची सर्व प्रकारे काळजी घेतली आणि त्या त्यांच्यापैकीच एक बनून राहिल्या.

देवदासी, मुरळी यांसारख्या प्रथांना विरोध

महर्षी शिंद्यांनी आपल्या समाजातील संकुचित धर्मसंकल्पना व अनिष्ट चालीरीती, रूढी नष्ट व्हाव्यात, गोरगरीब लोकांनी मद्यपानासारख्या व्यसनापासून दूर राहावे, स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा यांकरिता देखील प्रयत्न केले. देवदासी, मुरळी यांसारख्या प्रथांना त्यांनी विरोध केला. शिमग्याच्या सणातील बीभत्स प्रकारांना आळा बसावा म्हणून जनजागृतीची मोहीम चालविली. सविनय कायदेभंगाच्या चळवळीतही ते सहभागी झाले होते. ब्राह्मणेतर व दलितांतही राष्ट्रीय वृत्ती निर्माण व्हावी म्हणून २६ ऑक्टोबर, १९१७ रोजी त्यांनी ‘ राष्ट्रीय मराठा संघा’ची व पुढे २३ मार्च, १९१८ रोजी ‘ अस्पृश्यताविरोधी समिती’ची स्थापना केली.

शेतकरी परिषदांचे आयोजन

महर्षी शिंद्यांनी शेतकऱ्यांची स्थिती सुधारावी म्हणूनही प्रयत्न केले होते. इंग्रजी राज्यात भारतातील शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत हलाखीची बनली होती. येथील शेतकरी वर्ग अज्ञान, अंधश्रद्धा यांत गुरफटून गेला होता. तो कमालीच्या दारिद्र्यात आपले जीवन जगत होता. सावकार व सरकारी नोकर यांसारखे घटक शेतकऱ्यांच्या वरील अवस्थेचा गैरफायदा घेत होते. सरकारला देखील त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास फुरसत नव्हती. थोडक्यात, सर्वसामान्य शेतकऱ्यांना चहुबाजूंनी लुबाडले जात होते. त्यांना कोणीही वाली उरला नव्हता.

शेतकऱ्यांच्या या स्थितीत सुधारणा व्हावी म्हणून त्यांना संघटित करण्याचे व त्यांच्यात जागृती घडवून आणण्याचे कार्य महर्षी शिंदे यांनी केले . त्यासाठी त्यांनी ठिकठिकाणी ‘ शेतकरी परिषदा ‘ आयोजित केल्या. सन १९२८ मध्ये पुणे येथे शेतकरी परिषदेचे आयोजन करून त्यांनी येथील शेतकऱ्यांच्या समस्या सरकारपुढे मांडल्या आणि त्यांचे निवारण करण्यासंबंधी सरकारकडे आग्रह धरला. अशाच प्रकारच्या परिषदा मुंबई, तेरदाळ, चांदवड, बोरगाव इत्यादी ठिकाणी आयोजित केल्या.

महर्षी शिंदे यांनी आपले संपूर्ण जीवनच समाजसेवेसाठी वाहिले होते. समाजातील दीनदुबळ्या व उपेक्षित वर्गांसाठी त्यांनी इतके महान कार्य केले असतानाही समाजाकडून त्यांची उपेक्षाच झाली. इतकेच नव्हे तर त्यांना सतत अवहेलना सहन करावी लागली. तथापि, कसल्याही फळाची अपेक्षा न बाळगता आपले अंगीकृत कार्य जीवनाच्या अखेरपर्यंत चालू ठेवणारे महर्षी शिंदे खऱ्या अर्थाने ‘ निष्काम कर्मयोगी ‘ होते.

अर्थात, समाजसुधारणेच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेतल्याखेरीज महाराष्ट्रातील समाजसुधारणेचा इतिहास लिहिला जाऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती मात्र कोणालाही नाकारता येणार नाही.

हे सुद्धा वाचा –

Related Posts