मेनू बंद

मराठी म्हणी व वाक्प्रचार – भाग 6

मराठी व्याकरणा मध्ये ‘ मराठी म्हणी संग्रह व अर्थ ‘चे स्थान अतिशय महत्वाचे आहे. प्राथमिक शाळेपासून तर अगदी नोकरीसाठी द्यायच्या परीक्षेपर्यंत ‘ मराठी म्हणी व वाक्प्रचार ‘ हे प्रकरण येतेच. सामान्य जीवनातही आपण अनेक तऱ्हेच्या ‘ मराठी म्हणी व त्याचे अर्थ ‘ यांचा वापर करतो. आम्ही येथे संपूर्ण Marathi Mhani List उपलब्ध केलेली आहे; ज्यामध्ये 8 भाग आहेत त्यापैकी हा भाग 6 आहे.

मराठी म्हणी व वाक्प्रचार | मराठी म्हणी संग्रह व अर्थ - Marathi Mhani List भाग 6

मराठी म्हणी संग्रह व अर्थ – भाग 6

 • गळ्यात पडले झोंड हसून केले गोड – गळ्यात पडल्यावर वाईट गोष्टसुद्धा गोड मानून घ्यावी लागते.
 • ग ची बाधा झाली – गर्व चढणे.
 • गरजेल तो पडेल काय – केवळ बडबडणाऱ्या माणसाकडून काही घडत नाही.
 • गरजवंताला अक्कल नसते – गरजेमुळे अडणाऱ्याला दुसऱ्याचे हवे तसे बोलणे व वागणे निमूटपणे सहन करावे लागते .
 • गर्वाचे घर खाली – गर्विष्ठ माणसाची शेवटी फजितीच होते.
 • बळी तो कान पिळी – बलवान मनुष्यच इतरांवर सत्ता गाजवितो.
 • बकरीचे शेपूट माशाही वारीना व लाजही राखीना – निरुपयोगी गोष्ट.
 • तू दळ माझे आणि मी दळीन गावच्या पाटलाचे – आपले काम दुसऱ्याने करावे, आपण मात्र लष्काराच्या भाकरी भाजाव्यात.
 • तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे आले – मूर्खपणामुळे एकही गोष्ट साध्य न होणे.
 • तेरड्याचा रंग तीन दिवस – कोणत्याही गोष्टीचा ताजेपणा किंवा नवलाई अगदी कमी वेळ टिकते.
 • तोंड दाबून बुक्क्यांचा मार – एखाद्याला विनाकारण शिक्षा करणे आणि त्याला त्याबद्दल तक्रार करण्याचा मार्ग मोकळा न ठेवणे .
 • तोबऱ्याला पुढे, लगामाला पाठीमागे – खायला पुढे , कामाला मागे.
 • बाप से बेटा सवाई – वडिलांपेक्षा मुलगा अधिक कर्तबगार.
 • चालत्या गाडीला खीळ – व्यवस्थित चालणाऱ्या कार्यात अडचण निर्माण होणे.
 • मुलाचे पाय पाळण्यात दिसतात – लहान वयातच व्यक्तीच्या गुण – दोषांचे दर्शन होते.
 • दिव्याखाली अंधार – मोठ्या माणसातदेखील दोष असतो.
 • दिल्ली तो बहुत दूर है – झालेल्या कामाच्या मानाने खूप साध्य करावयाचे बाकी असणे.
 • दिवस बुडाला मजूर उडाला – रोजाने वा मोलाने काम करणारा थोडेच स्वतःचं समजून काम करणार ? त्याची कामाची वेळ संपते ना संपते तोच तो निघून जाणार.
 • रोज मरे त्याला कोण रडे ? – तीच ती गोष्ट वारंवार होऊ लागली म्हणजे तिच्यातील स्वारस्य नष्ट होते व तिच्याकडे कोणी लक्ष देत नाही.
 • लग्नाला वीस तर वाजंत्रीला तीस – मुख्य कार्यापेक्षा गौण कार्यालाच खर्च अधिक.
 • लष्कराच्या भाकऱ्या भाजणे – बिनफायद्याचा आणि निरर्थक उद्योग करणे.
 • लकडी दाखविल्याशिवाय मकडी वळत नाही – धाकाशिवाय शिस्त नाही.
 • लग्नाला गेली आणि बारशाला आली – अतिशय उशिराने पोहोचणे.
 • लंकेत सोन्याच्या विटा – दुसरीकडे असलेल्या फायद्याच्या गोष्टीचा आपल्यालां उपयोग नसतो.
 • दुरून डोंगर साजरे – कोणतीही गोष्ट लांबून चांगली दिसते; परंतु जवळ गेल्यावर तिचे खरे स्वरूप कळते.

मराठी म्हणी व वाक्प्रचार – भाग 6

 • दुभत्या गाईच्या लाथा गोड – ज्याच्यापासून काही लाभ होतो, त्याचा त्रासदेखील मनुष्य सहन करतो.
 • दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते; पण आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही – दुसऱ्याचा लहानसा दोष आपल्याला दिसतो; पण स्वार्थामुळे स्वत:च्या मोठ्या दोषाकडे लक्ष जात नाही.
 • मूर्ख लोक भांडती, वकील घरे बांधती – मुर्खाचे भांडण अन् तिसऱ्याचा लाभ.
 • मेल्या म्हशीला मणभर दूध – मेल्यावर गुणगान करणे.
 • म्हातारीने कोंबडे लपविले म्हणून उजाडायचे राहत नाही – निसर्गनियमानुसार ज्या घटना घडायच्या त्या घडतातच.
 • म्हशीचे दूध काढताना आधी आचळाला दूध लावावे लागते – फायदा उचलण्यासाठी आधी थोडी खुशामत करावी लागते.
 • बाप तैसा बेटा – बापाच्या अंगचे गुण मुलात उतरणे.
 • बावळी मुद्रा देवळी निद्रा – दिसण्यास बावळट ; पण व्यवहारचतुर माणूस .
 • चिखलात दगड टाकला आणि अंगावर शिंतोडा घेतला – स्वत : च्याच हाताने स्वतःची बदनामी करून घेणे.
 • चुलीपुढे शिपाई अन् घराबाहेर भागूबाई – घरात तेवढा शूरपणाचा आव आणायचा ; पण बाहेर मात्र घाबरायचे.
 • चोर सोडून संन्याशालाच फाशी – खऱ्या अपराधी माणसाला सोडून निरपराधी माणसाला शिक्षा देणे.
 • चोराच्या उलट्या बोंबा – स्वतःच गुन्हा करून दुसऱ्याला दोष देणे.
 • चोरावर मोर – एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्याला वरचढ ठरणे.
 • चोरांच्या हातची लंगोटी – ज्याच्याकडून काही मिळण्याची आशा नसते त्याच्याकडून थोडेतरी मिळणे.
 • चोराची पावली चोराला ठाऊक – वाईट माणसांनाच वाईट माणसांच्या युक्त्या कळतात.
 • गळ्यातले तुटले ओटीत पडले – नुकसान होता होता टळणे.
 • गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता – मुर्खाला कितीही उपदेश केला तरी त्याचा उपयोग नसतो.
 • गाड्याबरोबर नळ्याची यात्रा – मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होणे.
 • गाढवाला गुळाची चव काय ? – ज्याला एखाद्या गोष्टीचा गंध नाही त्याला त्या गोष्टीचे महत्त्व कळू शकत नाही.
 • गावंढ्या गावात गाढवीण सवाशीण – जेथे चांगल्यांचा अभाव असतो तेथे टाकाऊ वस्तूस महत्त्व येते.
 • जित्या हुळहुळे आणि मेल्या कानवले – जितेपणी दुर्लक्ष करायचे व मेल्यावर कोडकौतुक करायचे.
 • जेवेन तर तुपाशी नाही तर उपाशी – अतिशय दुराग्रहाचे किंवा हटवादीपणाचे वागणे.
 • जे न देखे रवि ते देखे कवी – जे सूर्य पाहू शकत नाही ते कवी कल्पनेने पाहू शकतो.
 • जो गुळाने मरतो त्याला विष कशास ? – जेथे गोड बोलून काम होते तेथे जालीम उपायाची गरज नसते.
 • निंदकाचे घर असावे शेजारी – निंदा करणारा माणूस उपयोगी ठरतो; त्यामुळे आपले दोष कळतात.

पुढील यादी बघा:

Related Posts