मेनू बंद

सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र (Micro Economics) म्हणजे काय?

सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र किंवा Micro Economics मध्ये अर्थव्यवस्थेकडे जणू सूक्ष्मदर्शकातून पाहिले जाते. अर्थव्यवस्थेच्या शरीरातील व्यक्ती किंवा कुटुंब हे उपभोक्ते आणि एकूण आर्थिक प्रणालीमध्ये त्यांच्याकडून बजावल्या जाणाऱ्या भूमिकांचा अभ्यास केला जातो, अशी व्याख्या प्रख्यात अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ प्रा. ए. पी. लर्नर यांनी केली आहे. या आर्टिकल मध्ये आपण, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र म्हणजे काय आणि सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या व वैशिष्ट्ये विस्ताराने जाणून घेणार आहोत.

सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र (Micro Economics) म्हणजे काय?

आर्थिक विश्लेषण करतांना ज्या पद्धतींचा वापर केला जातो त्यांनाच अर्थशास्त्रीय अध्ययनाच्या पद्धती म्हणतात. इटालियन अर्थशास्त्रज्ञ कोसा म्हणतात की, ‘अध्ययनाची उद्दिष्ट्ये भिन्नभिन्न असतील तर त्यासाठी वेगवेगळ्या अध्ययन पद्धतींचा अवलंब करावा लागतो.’ अर्थशास्त्रीय अध्ययनाच्या प्रमुख तीन पद्धती खालीलप्रमाणे आहेत.

  1. सूक्ष्म व स्थूलपद्धती (Micro and macro methods)
  2. निगमन व आगमन पद्धती (Methods of Incorporation and Arrival)
  3. स्थितीशील व गतिशील पद्धती (Static and dynamic methods)

(१) सूक्ष्म व स्थूल पद्धती सूक्ष्म व स्थूल (समग्र) पद्धतीच्या आधारे अर्थशास्त्राचे दोन शास्त्रांमध्ये वर्गीकरण करता येते. (अ) सूक्ष्म अर्थशास्त्र (ब) समग्रलक्षी अर्थशास्त्र. यापैकी आपण प्रस्तुत प्रकरणात फक्त सूक्ष्म अर्थशास्त्राविषयी माहिती मिळविणार आहोत.

सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र म्हणजे काय

सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र (Micro Economics) म्हणजे अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मपणे अध्ययन करणारे शास्त्र होय. सूक्ष्म अर्थशास्त्र व समग्रलक्षी अर्थशास्त्र या संज्ञांचा वापर प्रथम ओस्लो विद्यापीठाचे प्रा. रॅग्नर फ्रिश्च (Prof. Ragnar Frisch) यांनी 1933 मध्ये केला. सूक्ष्म अर्थशास्त्र ही संज्ञा इंग्रजीतील Micro economics या शब्दासाठी वापरली आहे. Micro या शब्दाची व्युत्पत्ती Mikros हया ग्रीक शब्दापासून झालेली असून त्याचा अर्थ सूक्ष्म किंवा लहान (small) असा आहे.

सूक्ष्म अर्थशास्त्रालाच सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र, अंशलक्षी अर्थशास्त्र, व्यष्टी अर्थशास्त्र, लहान अर्थशास्त्र, व्यक्तिगत अर्थशास्त्र, सौक्ष्मिक अर्थशास्त्र, एकलक्षी अर्थशास्त्र, विशिष्ट अर्थशास्त्र इत्यादी नावाने ओळखले जाते. अॅडम स्मिथ (Adam Smith) या सनातनवादी अर्थशास्त्रज्ञाला सूक्ष्म अर्थशास्त्राचा जनक असे मानले जाते.

सुक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची संकल्पना डॉ. मार्शल यांनी लोकप्रिय केली. दुसऱ्या शब्दात, सुक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा जोरदार पुरस्कार डॉ. मार्शल यांनी केला. अंशलक्षी अर्थशास्त्रात व्यक्तिगत पातळीवर अध्ययन केले जाते आणि सिमांत विश्लेषणावर भर दिला जातो. यामध्ये एक ग्राहक, एक उत्पादक, व्यक्तिगत व्यवसाय किंवा उद्योग, वस्तूची किंमत इत्यादी संकल्पना विचारात घेतल्या जातात.

सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या (Definition of Micro Economics)

सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या अनेक अर्थतज्ज्ञांनी केलेली आहे त्यातील काही महत्त्वाच्या व्याख्या पुढीलप्रमाणे-

1. प्रा. के. इ. बोल्डिंग (K.E. Boulding)– “सूक्ष्म अर्थशास्त्र हे विशिष्ट पेढ्या (firms), विशिष्ट परिवार, विशिष्ट किंमत, विशिष्ट मजूरी, विशिष्ट उत्पन्न, वैयक्तिक उदयोग यांचा अभ्यास करते.”(“Micro Economics is study of particular firms, particular households, individual prices, wages, incomes, individual industries and particular commodities.”)

2. मॉरिस डॉब (Mourice Dobb)– “सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मपणे अध्ययन करणारे शास्त्र होय.” (“Micro Economics is a microscopic study of the economy.”)

3. प्रा. ओ. पी. लर्नर (A.P.Lerner)– “सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये जणू काही सूक्ष्मदर्शकातूनच पाहिले जाते, अर्थव्यवस्थेतील कुटुंब अथवा व्यक्ती यांचा ग्राहक म्हणून तर व्यक्ती व उदयोगसंस्था यांचा उत्पादक या भूमिकेतून होणाऱ्या कार्याचा अभ्यास केला जातो, अशा कार्याचा अभ्यास हा एकूण आर्थिक प्रणालीच्या संदर्भात केला जातो.”‘ (“Micro economics.consists of looking at the economy through a microscope as it were, to see how the millions of cells in the body economic the individual or households as consumers and the individuals or firms as producers play their part in the working of the whole economic organism.”)

सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये (Characteristics / Features of Micro Economics)

अंशलक्षी अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे सांगता येतील :

1. विशिष्ट आर्थिक घटकांचा अभ्यास (A Study of Specific Economic Factors): अंशलक्षी अर्थशास्त्रात विशिष्ट आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. उदा. विशिष्ट वस्तूंची मागणी, विशिष्ट वस्तूंचा पुरवठा, विशिष्ट उपभोक्ता व विक्रेता, त्यांची आर्थिक वागणूक, विशिष्ट उत्पादन संस्था व त्यांचा समतोल इत्यादी घटकांचा समावेश विशिष्ट आर्थिक घटकात केला जातो.

2. आंशिक समतोल (Partial Equilibrium): अंशलक्षी अर्थशास्त्रात आंशिक समतोलाचा अभ्यास केला जातो. विशिष्ट वस्तूची मागणी आणि त्या वस्तूचा पुरवता यांच्या परस्पर संबंधातून त्या वस्तूची समतोल किंमत कशी ठरते याचा अभ्यास आंशिक समतोलात समाविष्ट होतो. त्यातूनच देशातील सामान्य किमत स्तराची माहिती प्राप्त होते.

3. उत्पन्नाच्या विभाजनावर भर (Emphasis on income sharing): उत्पादन प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या वेगवेगळ्या उत्पादन घटकांचा मोबदला कसा ठरतो याचे अध्ययन अंशलक्षी अर्थशास्त्रात केले जाते. उदा. भूमी, श्रम, भांडवल व संयोजक या घटकांमध्ये उत्पन्नाचे विभाजन कसे होते. याचे स्पष्टीकरण सूक्ष्म अर्थशास्त्र करते. विशिष्ट उद्योगात किती रोजगार उपलब्ध आहे याबाबतचेही अध्ययन केले जाते. थोडक्यात, विभाजनाच्या सिद्धांताचा सूक्ष्म अर्थशास्त्रात समावेश होतो.

4. उत्पादन साधनांच्या विभाजनाला महत्त्व (Importance of division of means of production): उपलब्ध उत्पादन साधनांचे विविध वस्तूंच्या उत्पादनासाठी विभाजन कसे होते याचे विश्लेषण अंशलक्षी अर्थशास्त्र करते. उत्पादन साधनांच्या वाटपामुळे कोणत्या वस्तूंचे उत्पादन करावे आणि किती उत्पादन करावे हे प्रश्न सुटण्यास मदत होते. याचाच अर्थ अंशलक्षी अर्थशास्त्र उत्पादन साधनांच्या कार्यक्षम वाटपावर अधिक भर देते. जेव्हा उत्पादन साधनांच्या वाटपामुळे उत्पादन महत्तम होते तेव्हा उत्पादन साधनांचे कार्यक्षम वाटप होते.

5. गृहीतांवर आधारित सिद्धांत (Hypothesis-Based Theory): अंशलक्षी अर्थशास्त्रातील सिद्धांत गृहितांवर आधारित असतात. उदा. मागणीचा सिद्धांत, पुरवठ्याचा सिद्धांत, घटत्या सिमांत उपयोगितेचा सिद्धांत इत्यादी. या सिद्धांतांच्या व्याख्येची (विधानाची) सुरुवातच “इतर परिस्थिती कायम असेल तर ” या विधानाने होते. इतर घटक स्थिर आहेत असे मानण्याचा हेतू सिद्धांत जास्तीत जास्त सोपा व सुटसुटीत करणे हा असतो.

6. प्रश्नांचे भिन्न स्वरूप (Different formats of questions): सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात विशिष्ट वस्तूंच्या किंमतीतील बदलाचा उपभोक्त्याच्या खरेदीशक्तीवर परिणाम होतो काय? विशिष्ट परिस्थितीत उत्पादनसंस्थेचा समतोल कसा होतो? त्यावेळेस उत्पादनसंस्था किती उत्पादन करते? व उत्पादन कोणत्या किंमतीला विकते? विशिष्ट वस्तू व सेवांचे उत्पादन करण्यासाठी उत्पादनसंस्था उत्पादन घटकांचा समन्वय कसा साध्य करते ? इत्यादी प्रश्नांचा अभ्यास केला जातो.

7. समतोलाचे भिन्न स्वरूप (Different Forms of Equilibrium): अंशलक्षी अर्थशास्त्र मागणी आणि पुरवठा यांच्यात कोणत्या घटकांमुळे समतोल होतो याचा अभ्यास करते. या अर्थशास्त्रानुसार बाजार मागणी आणि बाजार पुरवठा यांच्यात किमतीतील बदलामुळे समतोल घडून येतो. परंतु स्थूल अर्थशास्त्र एकूण उत्पन्नातील बदलामुळे एकूण मागणी व एकूण पुरवठा यांच्यात समतोल होतो असे मानते.

अंशलक्षी अर्थशास्त्र मागणी पुरवठा, उपयोगिता इत्यादी घटकांचे वस्तूरूप मूल्य विचारात घेते. त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्रात समतोलाचा अभ्यास वस्तूरूप स्वरुपात केला जातो. परंतु समग्रलक्षी अर्मशास्त्रात वस्तू व सेवा यांच्या मूल्याची बेरीज करण्यासाठी पैशाचा वापर करावा लागतो. त्यामुळे पैशाच्या स्वरुपातील किमतींना महत्त्व प्राप्त होते.

हे सुद्धा वाचा-

Related Posts