मुंज (Munj) किंवा उपनयन (Upnayan) हिंदू धर्मातील सोळा संस्कारापैकी तेरावा संस्कार आहे. हा कुमाराचा एक प्रमुख संस्कार आहे. परंपरेनुसार, हा संस्कार ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या तीन वर्णांतील पुरुषांसाठीच सांगितला आहे. याला मौंजीबंधन व व्रतबंध अशीही नावे आहेत. या लेखात आपण मुंज म्हणजे काय हे सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत.

मुंज म्हणजे काय
ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य बालकांचे शिक्षणाचे वय वर्णक्रमाने ८, ११ वा १२ वर्षे झाले असता, त्यांना वेद व इतर विद्या यांच्या अध्ययनाचा अधिकार प्राप्त करून देण्याच्या संस्काराला मुंज म्हणतात. वेदाध्ययनाचा अधिकार नसलेल्या शूद्र बालकांचा मुंज संस्कार वैष्णवांच्या पांचरात्रगमात सांगितला आहे. तो वेदेतर विद्यांचा अधिकार प्राप्त होण्याकरिता आहे. वेदकाली वेदाध्ययनाची इच्छा असलेल्या कुमारिकांचाही उपनयन संस्कार होत असे, असे हरितधर्मसूत्रात म्हटले आहे.
मुंजची संस्कृतमध्ये व्याख्या अशी-
” गृह्योक्तकर्मणा येन समीपं नीयते गुरो:।
बालो वेदाय तत् योगात् बालस्योपनयं विदु:॥ “
याचा अर्थ – ज्या गृह्यसूत्रोक्त कर्माने बाळाला वेदाध्ययनासाठी गुरूजवळ नेले जाते त्याला “मुंज ” असे म्हणतात. ब्रह्मचर्य व्रत हे बालकांनी विद्या प्राप्त करताना म्हणजे शिक्षणाच्या वयात पाळावयाचा असतो. या व्रताचा उपदेश मुंज संस्काराच्या वेळी आचार्य करतो. उपनयन याचा, ‘जवळ नेणे’, असा व्युत्पत्यर्थ आहे. शिक्षणाकरिता किंवा वेदाध्ययनार्थ आचार्याजवळ नेणे असा त्याचा अर्थ होतो. मुंज संस्कार आचार्याने म्हणजे गुरूने करावयाचा असतो.
पिता वेदविद्यानिष्णात असल्यास तोही आचार्य होऊ शकतो. या संस्काराने ब्रह्मचर्य या आश्रमाचा कुमार स्वीकार करतो. वेदांच्या इतर विद्यांच्या अध्ययनाने ऋषींचे ऋण मनुष्य फेडतो. वेद किंवा इतर विद्या हे ऋषींकडून प्राप्त होणारे दिव्य धन होय व त्याच्या स्वीकारानेच ते ऋण फेडता येते. उपनयन संस्काराने कुमाराला द्विजत्व प्राप्त होते. द्विजत्व म्हणजे दुसरा जन्म होय. हा जन्म आचार्यापासून होतो. पहिला जन्म मातेपासून व दुसरा आचार्यापासून मानला जातो.

स्वरूप व विधी
आचार्य हे कुमाराला उजव्या बाजूस बसवून अग्नीची स्थापना करतात, त्यानंतर होम होतो, होमानंतर मुलास लंगोटी (कौपीन) नेसवितो, अजिन म्हणजे हरणाचे कातडे पांघरावयास देतो, यज्ञोपवीत म्हणजे जानवे घालतो. पुन्हा हवन होतो व अग्निसमक्ष कुमाराचा हात धरून त्याच्या तोंडून काही मंत्र म्हणवितो.
मुलगा गोत्रप्रवर व स्वतःचे नाव सांगून आचार्याचे चरणास स्पर्श करून आशीर्वाद घेतो. त्यानंतर आचार्य सावित्री मंत्राचा म्हणजे सविता देवाच्या प्रार्थनेच्या मंत्राचा व व्रतांचा उपदेश करतो. गायत्री छंदातील सावित्री मंत्राचा ‘तत्सवितुर्वरेण्यम्’ असा आरंभ आहे. क्षत्रिय व वैश्य कुमारांना या मंत्राऐवजी सविता देवाच्या प्रार्थनेचे दुसरे मंत्रही सांगितले आहेत. आचार्य मंत्रोपदेशाच्या त्यानंतर मुंजतृणाची तिपेडी मेखला कुमाराच्या कमरेत बांधतो.
क्षत्रिय व वैश्य कुमारांना याऐवजी अन्य प्रकारच्या काही मेखला सांगितल्या आहेत. त्यानंतर आचार्य कुमाराच्या हाती कायम धारण करावयाचा पळसाचा किंवा इतर दंड देतो. त्यानंतर काही होम करावयाचे असतात. ते संपल्याच्या नंतर उपनीत कुमाराने लगेच भिक्षा मागावयाची असते.
भिक्षा प्रथम मातेकडे मागावयाची, ती नसल्यास मातृसदृश व्यक्तीकडे मागावयाची असते. भिक्षा आचार्याच्या स्वाधीन करावयाची व त्याच्या अनुमतीने सेवन करावयाची असते. मुंज वर्णक्रमाने विहित कालावधीत म्हणजे १६, २२ वा २४ वर्षांपर्यंत न झालेला आर्य सावित्रीपतित म्हणजे व्रात्य म्हटला जातो. त्याची प्रायश्चित्ताने शुद्धी होते.
हे सुद्धा वाचा –