मेनू बंद

नारायण गणेश गोरे

आपण या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक नारायण गणेश गोरे यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Narayan Ganesh Gore यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

 नारायण गणेश गोरे -  Narayan Ganesh Gore

नारायण गणेश गोरे – परिचय

ना. ग. गोरे यांचे संपूर्ण नाव नारायण गणेश गोरे असे होते; पण नानासाहेब या नावानेच ते विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म १५ जून, १९०७ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील हिंदळे या गावी झाला. त्यांचे शिक्षण पुणे येथे झाले. त्यांनी बी. ए. व एल्एल्. बी. या पदव्या संपादन केल्या होत्या . विद्यार्थिदशेपासूनच त्यांचा राजकीय व सामाजिक चळवळींशी संबंध आला होता.

नारायण गणेश गोरे यांचे सामाजिक व राजकीय कार्य

नानासाहेब गोरे सामाजिक सुधारणांचे कट्टर पुरस्कर्ते होते. समाजातील अनिष्ट रूढी व परंपरा यांच्या विरोधात ते नेहमीच उभे राहिले. भारतीय समाजातील अस्पृश्यता व जातिभेदाची प्रथा नष्ट व्हावी म्हणून त्यांनी प्रयत्न केले. आपल्या सार्वजनिक जीवनाच्या प्रारंभापासूनच त्यांनी अस्पृश्यता निवारणाच्या कार्यात भाग घेतला.

पुण्याच्या पर्वतीवरील मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी सत्याग्रह केला होता. स्वतः एका विधवा स्त्रीशी विवाह करून त्यांनी समाजसुधारणेच्या बाबतींत कृतिशील आदर्श घालून दिला. महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला त्यांनी सक्रिय पाठिंबा दिला. परिवर्तनवादी चळवळीच्या अनेक लढ्यात त्यांचा सहभाग होता. दलित चळवळ, स्त्री – मुक्ती आंदोलन यांसारख्या चळवळींशी त्यांचे नाते जडले होते.

नानासाहेब स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी नेते व पुरोगामी विचारवंत म्हणून प्रसिद्ध आहेत. विद्यार्थिदशेपासूनच त्यांचा राजकारणाशी संबंध आला होता. सन १९३० मध्ये महाराष्ट्र युथ लीगचे चिटणीस म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. स्वातंत्र्यचळवळीतील सहभागाबद्दल त्यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली होती.

समाजवादी विचारप्रणालीचा प्रभाव

ना. ग. गोरे यांच्यावर समाजवादी विचारप्रणालीचा प्रभाव होता. सन १९३४ मध्ये काँग्रेसमधील समाजवादी विचारांच्या युवक नेत्यांनी काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना केली. या पक्षाच्या स्थापनेत नानासाहेबांचा सहभाग होता. भारतातील सुरुवातीच्या समाजवादी नेत्यांपैकी ते एक होत. देशात समाजवादी विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर नानासाहेबांनी काँग्रेस समाजवादी पक्षाचा त्याग केला आणि ते नव्याने स्थापन झालेल्या समाजवादी पक्षात सहभागी झाले. पुढे ते प्रजा समाजवादी पक्षात गेले. या पक्षाचे सरचिटणीस व अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले होते. प्रजा समाजवादी पक्षाच्या प्रमुख राष्ट्रीय नेत्यांपैकी ते एक होते.

गोवा मुक्ती आंदोलनात सहभाग

नानासाहेबांनी सन १९५५ च्या गोवा मुक्ती आंदोलनात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती . या आंदोलनात भाग घेतल्याबद्दल गोव्यातील त्या वेळच्या पोर्तुगीज सरकारने त्यांना जन्मपेठेची शिक्षा ठोठावली होती. परंतु १९५७ मध्ये त्यांची सुटका करण्यात आली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील त्यांचा सहभागही महत्त्वाचा समजला जातो. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या प्रमुख नेत्यांपैकी ते एक होते. संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर लोकमत जागृत करण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न के होते.

इ. स. १९५७ च्या निवडणुकीच्या वेळी ते संयुक्त महाराष्ट्र समितीचे उमेदवार म्हणून पुण्यातून लोकसभेसाठ उभे राहिले व प्रचंड मतांनी निवडून आले. सीमालढ्यातही त्यांचा सहभाग होता. आज कर्नाटक राज्यात समाविष्ट असलेला बेळगाव, कारवार, निपाणी हा मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्राला जोडला जावा आणि या सीमाविभागातील जनतेला न्याय मिळावा म्हणून त्यांनी प्रयत्न केले होते. ना. ग. गोरे हे काही काळ पुण्याचे महापौर होते. राज्यसभेचे सदस्य म्हणूनही त्यांची निवड झाली होती. एक कुशल व अभ्यासू संसदपटू म्हणून ते ओळखले जात असत.

आणीबाणीस विरोध

सन १९७५ मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणीच्या परिस्थितीची घोषणा केल्यावर आणीबाणीच्या विरोधात जनमत संघटित करण्याच्या कार्यात पुढाकार घेतला होता. सन १९७७ मध्ये जनता पक्षाची स्थापना करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. सन १९७७ मध्ये केंद्रात जनता पक्षाचे सरकार अधिकारावर आल्यावर नानासाहेबांची ब्रिटनमधील भारताचे हायकमिशनर म्हणून नियुक्ती झाली होती. तथापि, जनता सरकारचे पतन झाल्यावर त्यांनी स्वतःहून आपल्या पदाचा राजीनामा देऊन आपली तत्त्वनिष्ठा सिद्ध केली.

एक पुरोगामी विचारवंत नानासाहेब गोरे यांनी ‘ जनवादी ‘, ‘ रचना ‘, ‘ जनता ‘ या नियतकालिकांच्या संपादकपदाची जबाबदारी सांभाळली होती. एक पुरोगामी विचारवंत म्हणूनही ते ओळखले जात होते. विविध नियतकालिकांतून त्यांचे वैचारिक लेख व इतर स्फुट लेखन प्रसिद्ध झाले आहे. नारायण गणेश गोरे यांचा मृत्यू १ मे, १९९३ रोजी पुणे येथे झाला. नानासाहेबांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला होता; परंतु काही कारणामुळे त्याची पूर्तता होऊ शकली नाही.

नानासाहेब हे सिद्धहस्त लेखकही होते. त्यांनी मराठीत अनेक ग्रंथ लिहिले. लहान मुलांसाठीही त्यांनी पुस्तके लिहिली, नानासाहेबांनी लिहिलेल्या ग्रंथांपैकी काही महत्त्वाचे ग्रंथ पुढीलप्रमाणे- समाजवादाचा ओनामा (पहिले पुस्तक), मुरारीचे साळगाव, सीतेचे पोहे, डाली, गुलबशी, शंख आणि शिंपले, कारागृहाच्या भिंती (तुरुंगात असताना लिहिलेली दैनंदिनी), आव्हान आणि आवाहन, अमेरिकन संघराज्याचा इतिहास, ऐरणीवरील प्रश्न, विश्वकुटुंबवाद इत्यादी. ‘ नारायणी ‘ हा त्यांचा आत्मचरित्रात्मक पत्रसंग्रहही प्रसिद्ध आहे.

हे सुद्धा वाचा –

Related Posts