मेनू बंद

प्रयोग म्हणजे काय | प्रयोगाचे प्रकार | Prayog in Marathi Grammar

Prayog in Marathi Grammar: मराठी व्याकरणामध्ये ‘प्रयोग‘ हा अतिशय महत्वाचा भाग आहे. त्यामुळे आपण या लेखात प्रयोग म्हणजे काय आणि प्रयोगाचे मुख्य किती प्रकार आहे हे सविस्तरपणे समजून घेऊया.

प्रयोग म्हणजे काय | प्रयोगाचे प्रकार | Prayog in Marathi Grammar

वाक्य म्हणजे पूर्ण विधान करणारा एक किंवा अनेक शब्दांचा समूह होय. वाक्यातील सर्वांत महत्त्वाचा शब्द म्हणजे क्रियापद होय. वाक्यरूपी कुटुंबाचा तो प्रमुख असतो. क्रियापदाने दर्शविलेली क्रिया करणारा वाक्यात जो कोणी असतो त्यास कर्ता असे म्हणतात. वाक्यात निर्देशिलेली क्रिया कर्त्याशीच न थांबता ती केव्हा केव्हा पुढे जाते व ती ज्याच्यावर घडते ते त्या वाक्यातील कर्म होय. कर्ता, कर्म, क्रियापद हे वाक्यातील महत्त्वाचे घटक असतात.

प्रयोग म्हणजे काय

वाक्यात कर्त्याला किंवा कर्माला प्राधान्य दिल्यामुळे क्रियापदाचे रूप त्याच्याप्रमाणे बदलत असते. कर्ता-कर्म-क्रियापद हे वाक्यातील महत्त्वाचे घटक. वाक्यातील कर्ता – कर्म – क्रियापद यांच्या परस्परसंबंधाला प्रयोग असे म्हणतात. ‘प्रयोग‘ हा शब्द संस्कृत ‘प्र युज‘ यावरून तयार झाला असून त्याचा अर्थ ‘जुळणी‘ किंवा ‘रचना‘ असा आहे. प्रत्येक वाक्यात जे क्रियापद असते त्याच्या रूपाची ठेवण, किंवा रचनाच अशी असते की ते क्रियापद केव्हा कर्त्याचे किंवा कर्माचे लिंग, वचन किंवा पुरुष याप्रमाणे बदलते, तर केव्हा ते क्रियापद मुळीच बदलत नाही.

कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी अशी जी, जुळणी, ठेवण किंवा रचना तिलाच व्याकरणात ‘प्रयोग‘ असे म्हणतात. कर्ता, कर्म व क्रियापद यांच्यामधील परस्पर संबंध व्यक्त करण्याच्या रचनेला किंवा पद्धतीला ‘ प्रयोग ‘ असे म्हणतात. कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी विशिष्ट प्रकारची जुळणी किंवा रचना निगडित म्हणजे प्रयोग होय.

वाक्यातील रचना मुख्यत : ज्यांच्या आधाराने होते ते वाक्याचे घटक कर्ता, कर्म आणि क्रियापद होत. स्थिती किंवा कृती यांचा बोध करून वाक्यार्थाला पूर्णपणा आणणारा, वाक्यातील सर्वप्रधान शब्द म्हणजे क्रियापद या क्रियापदाने सांगितली जाणारी स्थिती किंवा कृती जो अनुभवतो किंवा करतो तो कर्ता आणि त्याच्या कृतीचा परिणाम ज्याच्यावर होतो किंवा जे त्याच्या कृतीचा विषय बनते, ते कर्म. या घटकांपैकी ज्याला प्राधान्य दयावे लागते त्याच्या अनुरोधाने वाक्याची ठेवण बदलते. मुख्य घटकांच्या अनुरोधाने बदलणारी वाक्याची ही ठेवण म्हणजेच प्रयोग.

कर्ता आणि कर्म

‘कृष्णा आंबा खातो. ‘या वाक्यात ‘खा‘ हा धातू आहे. त्याला ‘णारा‘ हा प्रत्यय लावून ‘खाणारा कोण?‘ असा प्रश्न विचारला की ‘कृष्णा‘ हे उत्तर मिळते. ‘ कृष्णा ‘ हा या वाक्यातील कर्ता आहे.

वाक्यातील क्रियापदाने दाखविलेली क्रिया कर्त्यापासून निघते व ती दुसऱ्या कोणावर किंवा कशावर तरी घडते. त्या क्रियेचा परिणाम ज्याच्यावर घडतो किंवा ज्याच्याकडे क्रियेचा रोख किंवा कल असतो ते त्या क्रियेचे कर्म असते. वरील वाक्यांपैकी ‘कृष्णा आंबा खातो‘ या वाक्यातील कर्म शोधताना ‘खाण्याची क्रिया कोणावर घडते?‘ या प्रश्नाचे उत्तर ‘आंब्यावर‘ असे येते. म्हणून ‘आंबा‘ हे या वाक्यातील ‘कर्म‘ होय.

सकर्मक आणि अकर्मक क्रियापद

प्रयोगा’चा अभ्यास करताना सकर्मक क्रियापद व अकर्मक क्रियापद या क्रियापद प्रकारांची थोडक्यात उजळणी आवश्यक ठरते. ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी लागते त्यास सकर्मक क्रियापद असे म्हणतात. ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी लागत नाही. त्यास अकर्मक क्रियापद असे म्हणतात. कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्मापाशी थांबते तेव्हा त्या क्रियापदाला सकर्मक क्रियापद असे म्हणतात. कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशीच थांबत असेल किंवा कर्त्याच्या ठिकाणी लय पावत असेल, तर ते क्रियापद अकर्मक असते.

प्रयोगाचे मुख्य किती प्रकार आहे

प्रयोगाचे मुख्य तीन प्रकार आहेत:

  1. कर्तरिप्रयोग
  2. कर्मणिप्रयोग
  3. भावेप्रयोग

१. कर्तरि प्रयोग

पुढील वाक्ये पाहा.

  1. तो गाणे गातो.
  2. ती गाणे गाते.
  3. ते गाणे गातात.
  4. तू गाणे गातोस.

यांतील पहिल्या वाक्यात ‘ तो ‘ हा कर्ता आहे , ‘ गाणे ‘ हे कर्म आहे आणि ‘ गातो ‘ हे क्रियापद आहे. या वाक्यातील क्रियापद हे ह्या तिन्ही कर्णणी बदलत आहे. ‘ तो गाणे गातो. ‘ या वरील वाक्यातील ‘ गातो ‘ हे क्रिया कर्त्याचे लिंग, वचन व पुरुष यांप्रमाणे बदलले आहे. म्हणजेच येथे क्रियापद हे कर्त्याच्या तंत्राप्रमाणे चालते. म्हणून हा कर्तरिप्नयोग आहे. कर्तरिप्रयोगात कर्ता हा आपली हकमत चालवितो.

कर्तरिप्रयोगात कर्ता हा धातुरूपेश (यापदाच्या रूपावर अधिकार चालविणारा) असतो. कर्तरिप्रयोगातील क्रियापद सकर्मक असले तर त्यास ‘ सकर्मक कर्तरिप्रयोग ‘ म्हणतात व क्रियापद हे अकर्मक असल्यास त्यास ‘ अकर्मक कर्तरि प्रयोग ‘ असे म्हणतात. उदा . ती गाणे गाते . (सकर्मक कर्तरि प्रयोग) ती घरी जाते. (अकर्मक कर्तरिप्रयोग).

२. कर्मणिप्रयोग

पुढील वाक्ये वाचा –

  1. मुलाने आंबा खाल्ला.
  2. मुलीने आंबा खाल्ला.
  3. मुलांनी आंबा खाल्ला.
  4. मुलाने चिंच खाल्ली.
  5. मुलाने आंबे खाल्ले.

वरील वाक्यात ‘मुलीने‘ किंवा ‘मुलांनी‘ असा कर्ता बदलला तरी क्रियापदाचे रूप ‘खाल्ला‘ असेच राहते. आता कर्माचे लिंग बदलून पाहा. ‘आंबा‘ ऐवजी ‘चिंच‘ हे स्त्रीलिंगी कर्म ठेवले तर क्रियापदाचे रूप ‘खाल्ली‘ असे होईल. (वाक्य ४ व ५) आता वचन बदलून पाहा. ‘आंबा‘ हे झाले तर, ‘मुलाने आंबे खाल्ले.‘ असे वाक्य होईल व त्या ‘खाल्ले‘ असे होईल. म्हणजे या वाक्यात कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलत असेल तर त्याला कर्मणिप्रयोग म्हणतात. कर्मणिप्रयोगात क्रियापद कर्माच्या तंत्राप्रमाणे चालते, म्हणजेच कर्म हा धातुरूपेश आहे. कर्मणिप्रयोगाचे आणखी खालीलप्रमाणे चार उपप्रकर आहेत.

पुढील वाक्ये वाचा:

  1. तिने गाणे म्हटले. (तृतीयान्त कर्ता व प्रथमान्त कर्म)
  2. मला हा डोंगर चढवतो. (चतुर्थ्यन्त कर्ता)
  3. रामाच्याने काम करवते. (कर्ता सविकरणी तृतीयान्त)
  4. मांजराकडून उंदीर मारला गेला. (कर्ता शब्दयोगी अव्ययान्त)

वरील चारही वाक्यांत प्रयोग कर्मणी असला तरी त्याचेही विविध प्रकार आहेत.

(१) प्रधानकर्तृक कर्मणी प्रयोग – या प्रयोगात क्रियापद हे लिंगवचनानुसार बदलत असले तरी बहुतेक कर्ताच प्रधान असतो . त्यास प्रधानकर्तृक कर्मणी प्रयोग . असे म्हणतात . वरील वाक्ये क्र . १ व २ ही याची उदाहरणे आहेत .

(२) शक्य कर्मणी प्रयोग – वाक्य क्र . ३ मध्ये शक्यता सुचविलेली आहे . यातील क्रियापद ‘ शक्य क्रियापद ‘ आहे . त्यास शक्य कर्मणी प्रयोग असे म्हणतात .

(३) पुरुषकर्मणी – प्राचीन मराठी काव्यात सकर्मक धातूला ‘ ज ‘ हा प्रत्यय लावून ‘ करिजे , बोलिजे , कीजे , देईजे , ‘ अशी कर्मणिप्रयोगाची उदाहरणे पाहावयास मिळतात. या प्रकाराच्या प्रयोगास प्राचीन किंवा ‘ पुरुषकर्मणी ‘ असे म्हणतात.

(४) समापन कर्मणी – ‘ त्याची गोष्ट लिहून झाली ‘ या प्रकारच्या वाक्यात कर्ता ‘ त्याची ‘ हा षष्ठी विभक्तीत आहे . ‘ लिहून झाली ‘ या संयुक्त क्रियापदाने क्रियापदाच्या समाप्तीचा अर्थ सूचित केलेला असतो . अशा प्रकारच्या प्रयोगाला ‘ समापन कर्मणी ‘ असे म्हणतात .

(५) कर्मकर्तरी – कर्मणिप्रयोगातील कर्त्याला ‘ कडून ‘ हा शब्दयोगी अव्यय लावून इंग्रजी भाषेतील पद्धतीप्रमाणे रचना करण्याचा जो नवीन प्रकार आहे त्यास ‘ नवीन कर्मणी ‘ किंवा ‘ कर्मकर्तरी ‘ असे म्हणतात .

(६) कर्मकर्तरी प्रयोग

पुढील वाक्ये पाहा

  1. राम रावणास मारतो.
  2. रावण रामाकडून मारला जातो.

पहिल्या वाक्यात ‘राम‘ या शब्दास प्राधान्य आहे व त्याचा प्रयोग ‘कर्तरी’ आहे तर दुसऱ्या वाक्यात ‘रावण‘ या शब्दाला म्हणजे मूळच्या वाक्यातील कर्माला प्राधान्य दिल्यामुळे जो प्रयोग बनला आहे त्यास कर्मकर्तरी प्रयोग असे म्हणतात. अशी वाक्यरचना इंग्रजीत करीत असल्याने इंग्रजीत पॅसिव्ह व्हॉइस ला मराठीत ‘कर्मकर्तरी‘ असे म्हणतात.

३. भावे प्रयोग

जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीपुरुषी, नपुंसकलिंगी, एकवचनी, असून स्वतंत्र असते, तेव्हा अशा प्रकारच्या वाक्यरचनेस ‘भावे प्रयोग‘ असे म्हणतात. भावे प्रयोगात क्रियापदाचा जो भाव किंवा आशय त्याकडे प्राधान्य असते व त्या मानाने कर्ता किंवा कर्म ही दोन्ही गौण असतात.

भावकर्तरी प्रयोग

सर्वच वाक्यांतील क्रियापदे तृतीयपुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी आहेत; म्हणजे ती भावेप्रयोगी आहेत . पण त्यांना कर्ते नसल्यामुळे हा अकर्तृक भावेप्रयोग होय. अशा वाक्यात क्रियेचा भाव किंवा अर्थ हाच वाक्यातील कर्ता असल्यामुळे यास ‘भावकर्तरी प्रयोग‘ असे म्हणतात.

४. मिश्र किंवा संकर प्रयोग मराठीत मुख्य प्रयोग तीन आहेत. (१) कर्तरी, (२) कर्मणी व (३) भावे. पण बोलताना आपण असा काही वाक्यप्रयोग करतो, की तो म्हटला तरी कर्तरी असतो व म्हटला तर कर्मणी किंवा भावे असतो. म्हणजे एकाच वाक्यात दोन प्रयोगांचे मिश्रण झालेले आढळते. मिश्रण यालाच ‘ संकर ‘ असेही म्हणतात. अशा मिश्र प्रयोगांना ‘संकर प्रयोग‘ असेही म्हणतात.

(१) कर्तु – कर्म संकर

पुढील वाक्य पाहा-

  1. तू मला फूल दिले. (कर्मणिप्रयोग)
  2. तू मला पुस्तक दिलेस. (कर्तरी व कर्मणी)

वरील वाक्यात ‘दिले‘ हे क्रियापद ‘ फूल ‘ या कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलते. जसे – फूल दिली, ग्रंथ दिला. म्हणजे पहिल्या वाक्यात कर्मणिप्रयोग आहे. आता दुसरे वाक्य पाहा. ‘ फूल ‘ या कर्माचे वचन बदलताच (फुले) ‘दिलीस‘ रूप होते. म्हणजे हा कर्मणिप्रयोग झाला. आता या वाक्यातील ‘ तू ‘ या कर्त्याचे वचन बदलून पाहा. ‘ तुम्ही मला फूल दिलेत ‘ असे वाक्य होईल. म्हणजे ‘क्रियापद‘ ‘दिलेस‘ हे कर्त्याप्रमाणेही बदलते. हा कर्तरिप्रयोगही होतो. ‘ तू मला फूल दिलेस ‘ या वाक्यात कर्तरी व कर्मणी या दोन्ही प्रयोगांच्या छटा आढळतात. म्हणून याला ‘कर्तृ – कर्मसंकर प्रयोग‘ असे म्हणतात.

(२) कर्म – भाव संकर प्रयोग

पुढील वाक्य पाहा –

  1. आईने मुलाला शाळेत घातला. (कर्मणि)
  2. आईने मुलाला शाळेत घातले. (कर्तरी व भाव)

वरील पहिल्या वाक्यात कर्ता तृतीयान्त आहे. म्हणून हा कर्तस्प्रियोग नव्हे , आता ‘ मुलाला ‘ या कर्माचे लिंग व वचन बदलून पाहा. ‘मुलीला शाळेत घातली‘ ‘मुलांना शाळेत घातले‘ अशी रूपे होतील. म्हणजे कर्माप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलते. म्हणून हा कर्मणिप्रयोग आहे. दुसऱ्या वाक्यात ‘घातले‘ क्रियापद कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलते म्हणून हाही कर्मणिप्रयोग आहे. शिवाय कर्ता तृतीयान्त आहे, कर्म द्वितीयान्त आहे व क्रियापद तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी आहे. म्हणजे भावे प्रयोगाची त्यात छटा आहे. ‘आईने मुलाला शाळेत घातले‘ या वाक्यात कर्मणी व भावे या दोन्ही प्रयोगांच्या छटा आहेत. म्हणून त्याला ‘कर्म -भाव-संकर प्रयोग‘ असे म्हणतात.

(३) कर्तृ – भाव संकर प्रयोग

पुढील वाक्य पाहा-

  1. तू घरी जायचे होते. (भावे प्रयोग)
  2. तू घरी जायचे होतेस. (कर्तरी व भावे)

पहिल्या वाक्यातील प्रयोग भावे आहे. कारण कर्त्याचे लिंग – वचन- पुरुष बदलून पाहा. ‘त्याने जायचे होते, तिने जायचे होते, त्यांनी जायचे होते.’ या वाक्यांवरून क्रियापदांचे रूप न बदलता ते तृतीय पुरुषी, नपुंसकलिंगी, एकवचनी राहते. पण ‘तू घरी जायचे होतेस‘ या वाक्यात भावे प्रयोगाची छटा असून कर्त्याच्या वचनाप्रमाणे ते ‘तुम्ही घरी जायचे होतेत’ असे बदलताना आढळते. म्हणजे या वाक्यातील क्रियापद अंशतः कर्तरी आहे. येथे कर्तरी व भावे या दोन प्रयोगांच्या छटा एकत्र आढळतात. म्हणून यास ‘कर्तृ – भाव संकर प्रयोग‘ म्हणतात.

हे सुद्धा वाचा –

Related Posts