आपण या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक एस. एम. जोशी उर्फ श्रीधर महादेव जोशी (१९०४-१९८९) यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला SM Joshi & Shridhar Mahadev Joshi यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

महादेव जोशी, हे भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते, समाजवादी पक्षाचे सदस्य, संसद सदस्य आणि संयुक्त महाराष्ट्र समितीचे नेते होते. 12 नोव्हेंबर 1904 रोजी जुन्नर, पुणे येथे जन्मलेले श्रीधर महादेव जोशी हे भारतातील समाजवादी चळवळीतील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व मानले जातात. एक प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, त्यांनी प्रजा सोशलिस्ट पार्टी (PSP) आणि संयुक्त सोशलिस्ट पार्टी (SSP) चे अध्यक्ष म्हणून काम केले आणि जनता पक्षाचे संस्थापक सदस्य होते. ते ‘ एसेम ‘ या नावाने ते ओळखले जातात.
एस. एम. जोशी – परिचय
एस. एम. जोशी यांचे संपूर्ण नाव श्रीधर महादेव जोशी असे होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण जुन्नर येथेच झाले. एसेम यांच्या लहानपणीच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाल्याने प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत त्यांना आपले शिक्षण पूर्ण करावे लागले. उच्च शिक्षणासाठी पुण्याच्या फर्गसन कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. याच कॉलेजमधून ते बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले. सन १९३४ मध्ये त्यांनी एल्एल् बी. ची पदवी संपादन केली.
SM Joshi महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना देशात महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीला जोर चढू लागला होता; त्यामुळे ते विद्यार्थिदशेतच स्वातंत्र्यचळवळीकडे आकृष्ट झाले. पुण्यात विद्यार्थ्यांची संघटना स्थापन करण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. सन १९२७ मध्ये मुंबईत ‘ यूथ लीग परिषद ‘ भरविण्यातही त्यांचा पुढाकार होता.
राजकारणाप्रमाणेच सामाजिक प्रश्नांमध्येही त्यांनी सुरुवातीपासूनच स्वारस्य दाखविले होते. अस्पृश्यता निवारणाच्या कार्यात त्यांनी भाग घेतला होता. अस्पृश्यांना समाजातील इतर प्रगत घटकांच्या बरोबरीचे हक्क मिळाले पाहिजेत, असे त्यांचे मत होते. पुण्यातील पर्वती देवस्थानच्या मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा म्हणून त्यांनी १९२९ मध्ये सत्याग्रह केला होता. स्त्रियांच्या समान हक्कांचेही ते पुरस्कर्ते होते.
सन १९३० च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत एसेम यांनी मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतला होता. त्याबद्दल त्यांना तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागली होती . तुरुंगात असताना त्यांना राष्ट्रीय चळवळीतील काही प्रमुख नेत्यांच्या सहवासात राहण्याची संधी मिळाली. याच काळात त्यांनी मार्क्सवादी व समाजवादी तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. त्यातून त्यांचा कल समाजवादी विचारसरणीकडे झुकला.
सन १९३४ मध्ये काँग्रेसमधील समाजवादी विचारांच्या युवक कार्यकर्त्यांनी ‘ काँग्रेस समाजवादी पक्षा’ची स्थापना केली. या पक्षाच्या स्थापनेत एसेम यांचाही सहभाग होता. समाजवादावरील त्यांची निष्ठा अखेरपर्यंत अभंग राहिली. महाराष्ट्रात समाजवादी विचारसरणीचा प्रसार करण्यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले. म्हणूनच भारताच्या समाजवादी चळवळीचे एक प्रमुख आधारस्तंभ या दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले जाते.
भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत ते नेहमीच आघाडीवर राहिले. सन १९४२ च्या ‘ चले जाव ‘ चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. या चळवळीच्या काळात काही काळ भूमिगत राहून परकीय सत्तेविरुद्धचा प्रतिकार जारी ठेवण्याचे कार्य त्यांनी केले होते. पण पुढे १९४३ मध्ये ते पकडले जाऊन त्यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली. सन १९४६ मध्ये त्यांची तुरुंगवासातून मुक्तता झाली.
‘ राष्ट्रसेवा दल ‘ या संघटनेच्या स्थापनेत त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. राष्ट्रसेवा दलाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. या संघटनेच्या माध्यमातून अनेक विधायक व रचनात्मक कामांना त्यांनी चालना दिली होती. समाजप्रबोधनाच्या कार्याकडेही त्यांनी लक्ष पुरविले होते. ‘ साधना ‘ हे साप्ताहिक चालविण्यासाठी विश्वस् निधी उभारण्याच्या कामी त्यांनी पुढाकार घेतला होता.
स्वातंत्र्यानंतर समाजवादी पक्षात स्वातंत्र्यप्राप्तीनंतर एसेमनी काँग्रेसचा त्याग केला आणि नव्याने स्थापन झालेल्या समाजवादी पक्षात ते सामील झाले. समाजवादी पक्षात फूट पडल्यावर त्यांनी प्रजा समाजवादी पक्षात प्रवेश केला. पुढे समाजवादी विचारप्रणालीच्या सर्व पक्षांना एकाच प्रवाहात सामील करून घेण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला; कारण समाजवादी चळवळीतील फाटाफुटीमुळे ही चळवळ कमकुवत बनली असून त्याचा लाभ काँग्रेस व अन्य प्रतिक्रियावादी पक्षांना होत आहे, असे त्यांचे म्हणणे होते.
एसेम जोशींच्या प्रयत्नांतून ‘ संयुक्त समाजवादी पक्ष ‘ या नव्या पक्षाची स्थापना झाली. या पक्षाच्या अध्यक्षपदी त्यांचीच निवड करण्यात आली. पण हे ऐक्य फार काळ टिकू शकले नाही. पक्षातील काही नेत्यांनी व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेपोटी पुन्हा आपली वेगळी चूल मांडली.
SM Joshi Infprmation in Marathi
SM Joshi देशाच्या कामगार चळवळीतही आघाडीवर राहिले. स्वातंत्र्योत्तर काळात कामगारवर्गाच्या प्रश्नात त्यांनी विशेष लक्ष घातले. अनेक कामगार संघटनांच्या उभारणीस त्यांचा हातभार लागला होता. त्यांपैकी काही संघटनांचे अध्यक्ष किंवा मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम केले होते. अर्थात, कामगार चळवळीचे नेतृत्व करीत असतानाही त्यांनी घातपाती किंवा विध्वंसक मार्गाचा अवलंब करण्यास कधी प्रोत्साहन दिले नाही.
साधनशुचितेवर त्यांचा पूर्ण विश्वास होता. म्हणून कामगारांचे प्रश्न सनदशीर मार्गानेच सोडविण्याच्या धोरणाचा पुरस्कार त्यांनी केला होता. याशिवाय देशातील अनेक जनआंदोलनांचे नेतृत्वही त्यांनी केले होते. त्याबद्दल त्यांना अनेक वेळा तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. एस. एम. जोशी यांनी १९५५ च्या गोवा मुक्ती आंदोलनात भाग घेतला होता.
तथापि, त्यांचे नाव संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी झालेल्या चळवळीशी कायमचे निगडित झाले आहे. या चळवळीचे नेतृत्व त्यांनी होते. संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर जनआंदोलन करण्यासाठी स्थापन झालेल्या सर्वपक्षीय संयुक्त महाराष्ट्र समितीचे सरचिटणीस म्हणूनही त्यांची निवड झाली होती.
सन १९५७ च्या निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र समितीने मिळविलेल्या नेत्रदीपक यशात त्यांचा प्रमुख वाटा होता. द्विभाषिक मुंबई राज्याच्या विधानसभेत संयुक्त महाराष्ट्र समितीच्या विधिमंडळ गटाचे नेते व विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केले होते. एसेम यांची सन १९५७ मध्ये मुंबई राज्याच्या विधानसभेवर व १९६७ मध्ये लोकसभेवर निवड झाली होती. पुणे महानगरपालिकेचे सदस्य म्हणूनही ते निवडले गेले होते.
एक लेखक म्हणूनही SM Joshi प्रसिद्ध आहेत. ‘ ऊर्मी ‘ हा कथासंग्रह, तसेच ‘ आस्पेक्ट्स ऑफ सोशलिस्ट पॉलिसी ‘ हा वैचारिक ग्रंथ अशी काही पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. याशिवाय वर्तमानपत्रांतून त्यांनी बरेच स्फुट लेखनही केले आहे. ‘ लोकमित्र ‘ नावाचे दैनिक त्यांनी काही काळ चालविले होते. त्यांचे ‘ मी एसेम ‘ हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.
एक साधे, प्रामाणिक व तळमळीचे कार्यकर्ते म्हणून एसेम राजकीय क्षेत्रात परिचित आहेत. त्यांचे चारित्र्य निष्कलंक होते आणि राजकारणात राहूनही त्यांनी तत्त्वांशी कधी तडजोड केली नव्हती. अन्यायाविरुद्धच्या लढ्यात ते सतत अग्रभागी राहिले होते. त्यांनी सामाजिक समतेचा पुरस्कार केला होता. अनेक सामाजिक चळवळींतही त्यांचा सहभाग होता. सामाजिक समतेची लढाई जिंकल्याखेरीज देशात लोकशाही पद्धती यशस्वी होऊ शकणार नाही, असे त्यांचे मत होते; त्यामुळे समाजपरिवर्तनाच्या प्रत्येक लढ्याला त्यांनी पाठिंबा दर्शविला होता.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या काळात मुंबईतील भाषिक दंगलीत तसेच पुण्यातील धार्मिक दंगलीत स्वतःचा जीव धोक्यात घालून शांतता प्रस्थापित करण्याचे कार्य त्यांनी केले होते. महाराष्ट्र – कर्नाटक सीमावादात मराठी भाषिक जनतेला न्याय मिळवून देण्याबाबतही ते अखेरपर्यंत आग्रही व प्रयत्नशील राहिले होते.
सन १९७५ मध्ये त्या वेळच्या भारताच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी देशातील जनतेवर आणीबाणी लादल्यावर लोकशाहीच्या व नागरी स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी एसेम एखाद्या युवकाच्या तडफेने पुढे सरसावले. त्या काळात देशातील तरुणांना निर्भय बनून दडपशाहीचा प्रतिकार करण्याचा संदेश त्यांनी दिला होता.
सन १९७७ मध्ये जनता पक्षाची स्थापना करण्यातही त्यांचा पुढाकार होता. तथापि, जनता पक्ष केंद्रात सत्तेवर आल्यावर कोणत्याही अधिकारपदाची अभिलाषा न बाळगता पक्षाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून राहणेच त्यांनी पसंत केले होते. जनता पक्षाचे ऐक्य टिकून राहावे म्हणून त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. एस. एम. जोशी यांचा मृत्यू १ एप्रिल, १९८९ रोजी पुणे येथे झाला.
हे सुद्धा वाचा –