मेनू बंद

संत नामदेव महाराज – संपूर्ण माहिती मराठी

आपण या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील थोर संत नामदेव महाराज यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Sant Namdev Maharaj यांच्या बद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

संत नामदेव महाराज संपूर्ण माहिती मराठी मध्ये - अभंग, कथा, फोटो

संत नामदेव महाराज कोण होते

संत नामदेव हे हिंदू धर्माच्या वारकरी परंपरेतील महाराष्ट्रातील प्रसिद्ध भक्तकवी आणि संत होते. पंढरपूरच्या भगवान विठ्ठलाचे भक्त म्हणून त्यांचे वास्तव्य होते. नामदेव यांच्यावर वैष्णव धर्माचा प्रभाव होता आणि ते त्यांच्या भक्तीगीतांसाठी (भजन-कीर्तन) भारतात सर्वत्र प्रसिद्ध झाले. ज्याप्रकारे ते महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत त्याचप्रकरे पंजाब मध्ये देखील सिख धर्मीयांमध्ये त्यांचे आदराचे स्थान आहे.

संत नामदेव महाराजांचे पूर्ण नाव नामदेव दामाशेट्टी रेळेकर होते. महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील आणखी एक महान संत म्हणून नामदेवांचा उल्लेख केला जातो. त्यांचा जन्म शके ११९२ (इ. स. १२७०) मध्ये पंढरपूर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दामाशेट्टी व आईचे नाव गोणाई असे होते. नामदेवांचे वडील मराठवाड्यातील नरसी बामणी या गावाचे रहिवासी; परंतु पुढे ते पंढरपुरास येऊन स्थायिक झाले.

अर्थात, नामदेवांचे जन्मस्थळ पंढरपूर की नरसी – बामणी, असाही एक वाद आहे; पण याबाबत त्यांच्या अनेक चरित्रकारांनी असे मत व्यक्त केले आहे की, नामदेवांच्या जन्माअगोदरच काही वर्षे त्यांचे आई – वडील पंढरपुरास येऊन स्थायिक झाले होते व तेथेच नामदेवांचा जन्म झाला.

नामदेवांना बालपणापासूनच पंढरीच्या विठ्ठलाच्या भक्तीची गोडी लागली आणि उत्तरोत्तर ती वाढतच गेली. शके १२१३ (इ. स. १२९१) मध्ये नामदेव व ज्ञानेश्वर यांची आळंदी येथे भेट झाली. ज्ञानेश्वरांच्या प्रभावामुळे नामदेवांच्या विशुद्ध भक्तीला अद्वैतबोधाचे अधिष्ठान लाभले. पुढे ज्ञानेश्वरांच्या सांगण्यावरून नामदेव औंढा नागनाथास गेले आणि तेथे त्यांनी विसोबा खेचरांकडून गुरूपदेश घेतला. त्यानंतर त्यांचे मन पूर्णपणे ईश्वरभक्तीकडे वळले व आपला सारा वेळ ते भजन – कीर्तनातच व्यतीत करू लागले.

भागवत धर्माच्या प्रसाराचे कार्य

नामदेवांनी ज्ञानेश्वर, सावता माळी, चोखामेळा इत्यादी संतांसमवेत तीर्थयात्रा केली. ज्ञानदेवांनी आळंदी येथे समाधी घेतली तेव्हा नामदेव तेथे उपस्थित होते. त्यानंतर नामदेवांनी पुन्हा एकदा तीर्थयात्रेसाठी प्रस्थान केले . या वेळी त्यांनी थेट उत्तर भारतापर्यंत मजल मारली. त्या ठिकाणी भागवत धर्माचा प्रसार करण्याचे बहुमोल कार्य त्यांनी केले. त्यांच्या या कार्याचे कौतुक करताना बहिणाबाई म्हणतात,

“ज्ञानदेवें रचिला पाया। उभारिलें देवालया।।
नामा तयाचा किंकर। तेणे केला विस्तार।।”

नामदेव महाराजांनी अनेक भाषा आत्मसात केल्या. पंजाबात त्यांचे सुमारे वीस वर्षे वास्तव्य होते. नामदेव हे दीर्घायुष ठरले. वयाच्या ८१ व्या वर्षी म्हणजे शके १२७२ मध्ये म्हणजे ३ जुलै, १३५० रोजी त्यांनी पंढरपूर येथे देह ठेवला.

संत नामदेव महाराज अभंग

विपुल अभंग रचना नामदेवांनी मराठीत विपुल अभंगरचना केली आहे. त्यांच्या अभंगांच्या पाच छापील गाथा आज उपलब्ध आहेत. त्यांतील अभंगांची संख्या सुमारे अडीच हजार इतकी भरते. परंतु त्यांतील सर्वच अभंग मूळ नामदेवांचे आहेत असे म्हणता येत नाही. त्यांच्या अभंगांचे आत्मचरित्रपर अभंग, ज्ञानेश्वरचरित्रपर अभंग आणि पारमार्थिक आत्मनिवेदनपर अभंग असे प्रकार पडतात.

मराठीप्रमाणेच नामदेवांनी हिंदी भाषेतदेखील अभंगरचना केली आहे. त्यांची सुमारे १२५ इतकी हिंद उपलब्ध आहेत. यांपैकी ६१ पदे शिखांच्या ‘ग्रंथसाहिब‘ या पवित्र ग्रंथात अंतर्भूत करण्यात आली असून ती ‘नामदेवजी की मुखबानी’ या नावाने ओळखली जातात.

भागवत धर्माचा विस्तार नामदेव हे भागवत धर्माचे प्रसारक होते. ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माचा पाया घातला तर नामदेवांनी त्याचा विस्तार केला. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर उत्तर भारतात अगदी पंजाबपर्यंत त्यांनी भागवत धर्माचा संदेश पोहोचविला. त्यांना पंजाबात व उत्तरेकडील इतरही प्रांतांत अनेक शिष्य मिळाले होते. अशा प्रकारे त्यांनी उत्तर भारतातदेखील आपली शिष्यपरंपरा निर्माण केली होती. पंजाबात नामदेवांची अनेक मंदिरे आहेत; तसेच त्यांच्या नावाने स्थापन झालेल्या संस्थाही आहेत.

” तू साधी पण भावोत्कट अभिव्यक्ती, हे नामदेवांच्या अभंगरचनांचे प्रमुख वैशिष्ट्य सांगितले जाते.

“माझी माऊली, मी गे तुझा तान्हा।
पाजी प्रेम पान्हा पांडुरंगे।।”

यांसारख्या पंक्तीमधून प्रतीत होणारी त्यांची विशुद्ध आणि उत्कट भक्ती केवळ अपूर्व होय . उत्कट ईश्व क्तीचा विलोभनीय आविष्कार आपणास त्यांच्या अभंगांत जागोजागी पाहावयास मिळतो.

भक्तिमार्गाचे प्रतिपादन

संत नामदेव परमार्थातील समतावादी असून त्यांचा भक्तिमार्ग जाणते व नेणते अशा सर्वांकरिता आहे. इतर साधने व्यर्थ असून उत्कट भक्ती हेच परमार्थप्राप्तीचे एकमेव साधन होय, अशी त्यांची श्रद्धा आहे. आयुष्याच्या राशीस काळाचे माप लागलेले असून हा देह क्षणाक्षणाला काळाच्या हाती जात आहे, हे ओळखून देह असतानाच हरिभक्ती करा आणि अंतीचा लाभ आधीच साधून घ्या, हे त्यांच्या पारमार्थिक शिकवणुकीचे सार आहे.

संत नामदेव महाराज यांचे कार्य

नामदेवांच्या काव्यासंबंधी शं. गो. तुळपुळे यांनी असे म्हटले आहे की, “ नामदेवांची काव्यविषयक आत्मविस्मृती काही अपूर्व आहे. काव्यदृष्टी किंवा काव्यध्येय असे त्यांना नाहीच एकमेकांस हिताच्या गोष्टी सांगून सावध करावे, विश्वाचे शोक – मोह निरसावे , हरिनामाचा महिमा गावा , भक्ती वाढवावी आणि हरिदासांना आकल्प आयुष्य व संतमंडळींस सुख चिंतावे यापरता अन्य हेतू मनात ठेवून नामदेवांनी ग्रंथरचना केलेली नाही.

“नामदेवांच्या जीवितकार्याविषयी हे. वि. इनामदार म्हणतात, “नामदेव हे थोर भक्त होते; तसेच ते कुशल संघटकही होते. वारकरी संप्रदायाच्या संघटनेचे कार्य त्यांनी ज्ञानेश्वरांच्या हयातीत तर केलेच; पण ज्ञानेश्वरांनी समाधी घेतल्यानंतरही पन्नास वर्षे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर नामदेवांनी विठ्ठलभक्तीचा ध्वज फडकविला.”

‘नामदेवांची गाथा’ हे ज्ञानेश्वरचरित्राचे एक महत्त्वाचे साधन असून ‘ज्ञानेश्वरांचे समकालीन चरित्रकार’ म्हणून नामदेवांचा गौरव केला जातो. नामदेवांचे स्वतःचे चरित्रही या गाथेमधून उलगडत गेले आहे, त्यामुळे आदि, समाधी आणि तीर्थावळी अशा तीन प्रकरणांतून त्यांनी ज्ञानेश्वरांचे चरित्र सांगितले असून त्यांतील अभंगांची संख्या सुमारे साडेतीनशे इतकी आहे. हे अभंग म्हणजे चरित्रवाड्मयाचा उत्कृष्ट नमुना समजला जातो.

नामदेवांच्या साहित्यकृतींवर वैष्णव तत्त्वज्ञानाचा आणि विठोबावरील विश्वासाचा प्रभाव होता. ज्ञानेश्वरांचे एक पवित्र कार्य, ज्ञानेश्वर आणि तुकारामा सोबतच, नामदेवांचे लेखन साहित्य हिंदू धर्मातील वारकरी संप्रदायाच्या श्रद्धांचा आधार बनते. अशा प्रकारे 12व्या शतकाच्या मध्यापासून ते उत्तरार्धात कर्नाटकात प्रथम उदयास आलेल्या आणि नंतर महाराष्ट्रात पंढरपूरपर्यंत पसरलेल्या एकेश्वरवादी वारकरी श्रद्धेचा प्रसार करण्यासाठी त्यांची भूमिका होती.

ही सुद्धा वाचा –

Related Posts