Sarvanam in Marathi: मराठी व्याकरणामध्ये “सर्वनाम” हा अतिशय महत्वाचा भाग आहे. त्यामुळे आपण या लेखात सर्वनाम म्हणजे काय आणि सर्वनामाचे प्रकार किती आहेत हे सविस्तरपणे समजून घेऊया.

पुढील परिच्छेद वाचा:
राष्ट्रपतीचे विमान विमानतळावर उतरले. राष्ट्रपती विमानातून उत्साहाने खाली उतरले. राष्ट्रपतींनी सर्वांना हसून अभिवादन केले. जवळच लहान मुले उभी होती. राष्ट्रपती लहान मुलांकडे गेले. राष्ट्रपतींना एका मुलाने गुलाबाचे फूल दिले. राष्ट्रपतींना आनंद झाला.
वरील परिच्छेदात थोडा बदल करून तो पुन्हा लिहूया. आता वाचा.
राष्ट्रपतींनचे विमान विमानतळावर उतरले. ते विमानातून उत्साहाने खाली उतरले. त्यांनी सर्वांना हसून अभिवादन केले. जवळच लहान मुले होती. ते लहान मुलांकडे गेले. एका लहान मुलाने त्यांना गुलाबाचे फूल दिल. त्यांना आनंद झाला.
वरील दोन्ही परिच्छेदांचे वाचन केल्यावर लक्षात येईल की, प्रारंभी ‘ राष्ट्रपती ‘ या नामाचा उल्लेख केल्यावर पहिल्या परिच्छेदात त्याच नामाचा उल्लेख पुनःपुन्हा अयोग्य वाटतो. दुसऱ्या परिच्छेदात, प्रारंभी ‘ राष्ट्रपती ‘ या नामाचा उल्लेख केल्यानंतर, त्या नामाऐवजी ‘ ते ‘ , ‘ त्यांना ‘ असा उल्लेख योग्य वाटतो. नामाचा पुनःपुन्हा येणारा उल्लेख कानाला खटकतो. दुसऱ्या परिच्छेदात नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी ‘ ते ’ , ‘ त्यांना ‘ असा उल्लेख आला आहे. अशा नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात.
सर्वनाम म्हणजे काय
नामांचा पुनरुच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामांच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला ‘ सर्वनाम ‘ असे म्हणतात. सर्वनाम म्हणजे वाक्यात नामाच्या ऐवजी येणारा शब्द. नाम वाक्यात वारंवार आले तर ते कानाला बरे वाटत नाही. नामाचा हा पुनरुच्चार टाळण्यासाठी नामाच्याऐवजी ‘ मी, तू, तो, हा, जो, आपण, कोण, काय ‘ यांसारखे शब्द आपण वापरतो. या सर्वनामांना स्वतःचा अर्थ नसतो . ते ज्या नामांबद्दल येतात त्यांचाच अर्थ त्यांना प्राप्त होतो.
वाक्यात एखादे नाम येऊन गेल्याशिवाय सर्वनाम येत नाही. नामाचा तो प्रतिनिधी असून नामाचे सर्व प्रकारचे कार्य सर्वनाम करते. ‘ तो ‘ हा शब्द रामा, वाडा, कऴप, थवा, आळस अशा कोणत्याही प्रकारच्या नामाबद्दल वापरता येतो. अशा शब्दाचा उपयोग सर्व नामांसाठी होतो, म्हणून त्यास सर्वनाम असे म्हणतात.
सर्वनामाचे प्रकार
सर्वनामांचे प्रकार सर्वनामांचे पुढीलप्रमाणे एकंदर सहा प्रकार पडतात:
- पुरुषवाचक
- दर्शक सर्वनाम
- संबंधी सर्वनाम
- प्रश्नार्थक सर्वनाम
- सामान्य किंवा अनिश्चित
- आत्मवाचक
(१) पुरुषवाचक सर्वनाम
बोलणाऱ्याच्या किंवा लिहिणाऱ्याच्या दृष्टीने जगातील सर्व वस्तूंचे तीन वर्ग पडतात:
- बोलणाऱ्यांचा,
- ज्यांच्याशी आपण बोलतो किंवा लिहितो त्यांचा व
- ज्यांच्याविषयी आपण बोलतो किंवा लिहितो त्या व्यक्तींचा व वस्तूंचा.
व्याकरणात यांना ‘ पुरुष ‘ असे म्हणतात. या तीनही वर्गांतील नामांबद्दल येणाऱ्या सर्वनामांना पुरुषवाचक सर्वनामे असे म्हणतात.
- बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती प्रथमपुरुषवाचक सर्वनामे. उदाहरण. मी, आम्ही, आपण स्वतः
- ज्याच्याशी बोलायचे त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे आपण वापरतो ती द्वितीयपुरुषवाचक सर्वनामे. उदा. तू , तुम्ही, आपण स्वतः
- ज्यांच्याविषयी बोलायचे त्या व्यक्ती किंवा वस्तू यांचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती तृतीयपुरुषवाचक सर्वनामे.
(२) दर्शक सर्वनाम
जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्यासाठी जे सर्वनाम येते त्यास ‘ दर्शक सर्वनाम ‘ असे म्हणतात. उदा. हा, ही, हे, तो, ती, ते.
(३) संबंधी सर्वनाम
वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखविणाऱ्या सर्वनामांना संबंधी सर्वनामे ‘ असे म्हणतात. उदाहरण. जो – जी – जे, जे – ज्या.
(४) प्रश्नार्थक सर्वनाम
ज्या सर्वनामांचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो. त्यांना ‘ प्रश्नार्थक सर्वनामे ‘ म्हणतात. उदा. कोण, काय, कोणास, कोणाला, कोणी. इ.
(५) सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम
कोण , काय ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामांबद्दल आली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही , तेव्हा त्यांना ‘ अनिश्चित सर्वनामे ‘ असे म्हणतात. उदा. (१) कोणी कोणास हसू नये. (२) त्या पेटीत काय आहे ते सांगा. या सर्वनामांना कोणी ‘ सामान्य सर्वनामे ‘ असे म्हणतात.
(६) आत्मवाचक सर्वनाम
पुढील वाक्ये पाहा –
- मी स्वतः त्याला पाहिले.
- तू स्वतः मोटार हाकशील का?
- तो आपण होऊन माझ्याकडे आला.
- तुम्ही स्वतःला काय समजता?
आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा ‘स्वतः‘ असा होतो तेव्हा ते आत्मवाचक सर्वनाम असते. यालाच कोणी ‘स्वत: वाचक सर्वनाम‘ असेही म्हणतात.
हे सुद्धा वाचा –