जेव्हा मानवी व्यवहार वाढू लागतात, तेव्हा भाषाही वाढू लागते आणि भाषेतील शब्दांचा संग्रह, परिगणना व व्यवस्थापन यांची गरज निर्माण होते. या गरजेतून शब्दकोशाची निर्मिती होते. त्यातील शब्द एका निश्चित क्रमाने –सामान्यतः वर्णानुक्रमानुसार ग्रंथित केलेले असतात. शब्दकोश सुधारण्याची, तसेच नवा शब्दकोश तयार करण्याची गरज निर्माण होते. भाषेची प्रवाही प्रकृती आणि परस्परसंवादासाठी तिच्या स्थिरीकरणाची अपेक्षा, या द्वंद्वातून शब्दकोशाचा विकास होत राहतो. आपण येथे शब्दकोश म्हणजे काय हे सविस्तर पाहू.

शब्दकोश म्हणजे काय
एखाद्या भाषेतील वापरत असलेल्या तसेच वापरातून गेलेल्या अशा यच्चयावत शब्दांचा संग्रह, त्यांच्या अर्थासहित ज्यात केलेला असतो असा संदर्भग्रंथ. मुद्रित वाङ्मयातील शब्दांबरोबरच वाक्संप्रदाय, म्हणी यांचाही त्यांत अंतर्भाव होतो. शब्दांचा अर्थ समजावा आणि जिज्ञासूची शब्दशक्ती वाढावी, हा एक हेतू शब्दकोशरचनेमध्ये असतो. शब्दांच्या अर्थांचे संकेत निश्चित व स्थिर होण्याचे कार्य शब्दकोशामुळे साधते आणि त्यायोगे भाषिक व्यवहार सुलभतेने होऊ शकतात.
मूळ शब्द व त्याचा अर्थ हे शब्दकोशाचे मुख्य दोन घटक. शब्दकोशामध्ये सामान्यतः शब्द, त्याची व्युत्पत्ती, व्याकरण, त्याची प्रत्ययोपसर्गघटित रूपे, साधित शब्द, त्याचा अर्थ (असल्यास भिन्नभिन्न अर्थ), अर्थदर्शक उदाहरण, शब्दाच्या अर्थघटनेच्या ऐतिहासिक विकासाचे दिग्दर्शन एवढे घटक असतात. त्यात कधी चित्रेही असतात, तसेच त्याचा उच्चार देण्याकडेही आता प्रवृत्ती होऊ लागली आहे. शब्दकोशामध्ये शब्दाला प्रतिशब्द, तसेच इष्ट तेथे अर्थाचे अधिक विशदीकरण दिलेले असते. प्रत्येक शब्दकोशात हे सर्वच घटक असतील, असे नव्हे. कोशाच्या उद्दिष्टानुसार यांपैकी कमी-जास्त घटक त्याच्यात असतात.
शब्दकोशाची गरज स्थूलपणाने दोन प्रकारची असते. एक स्वभाषकांना आपल्या भाषेतील अर्थ तसेच त्याच्या विविध छटा समजण्यासाठी आणि परस्परसंवादासाठी. दुसरी गरज, परभाषकांना भाषा शिकण्यासाठी. यांनुसार शब्दकोशाचे मुख्यतः दोन वर्ग होतात. एक म्हणजे एकभाषिक शब्दकोश. यात भाषेतील शब्दांचे त्या भाषेतच अर्थ दिलेले असतात. उदा., मराठी –मराठी शब्दकोश. दुसरा वर्ग द्विभाषी कोशांचा. एका भाषेतील शब्दांचे दुसऱ्या भाषेत अर्थ दिलेले असतात. उदा., मराठी –इंग्रजी किंवा इंग्रजी –मराठी शब्दकोश, मराठी –सिंधी शब्दकोश. अनेकभाषी शब्दकोशही असतात. उदा., मराठी –हिंदी – इंग्रजी शब्दकोश.
हे पण वाचा – संत तुकाराम महाराज कोण होते
शब्दकोशाचे आणखी एक वर्गीकरण संभवते. ते म्हणजे सर्वसमावेशक किंवा बृहद-शब्दकोश आणि विशिष्ट शाखीय शब्दकोश. दुसऱ्या प्रकारामध्ये आणखी अनेक उपप्रकार संभवतात. विविध ज्ञानशाखीय शब्दकोश, व्यवसायानुसारी शब्दकोश, परिभाषिक शब्दकोश इत्यादी. स्थूलमानाने शब्दकोशाचे पुढील भेद दाखविता येतात :
(१) सर्वसमावेशक किंवा बृहद-शब्दकोश. यात तत्त्वतः आणि सामान्यतः भाषेतील वापरातील किंवा नष्टप्राय अशा यच्चयावत शब्दांचा संग्रह केलेला असतो. अशा शब्दकोशाला मर्यादा असते, ती व्यावहारिक स्वरूपाची.
(२) विशिष्ट भाषाभेदांचे शब्दकोश, उदा., ग्रामीण, प्रादेशिक, व्यावसायिक, मुलांचे स्त्रीविशिष्ट, बोली-उपभाषांचे, अशिष्ट शब्दांचे इ.
(३) मर्यादित उद्दिष्टाने तयार केलेले शब्दकोश : उदा., शालेय शब्दकोश किंवा सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने नित्योपयोगी असे सुटसुटीत, आटोपशीर शब्दकोश.
(४) समानार्थी, किंवा विरूद्धार्थी शब्द देणारे कोश.
(५) एकेका ग्रंथातील शब्दांचा अर्थासह केलेला संग्रह. उदा., ज्ञानेश्वरीचा शब्दकोश, बा. भ. बोरकरांच्या भावीण कादंबरीला जोडलेला गोमंतकी शब्दाचा कोश.
(६) व्युत्पत्तिकोश, यात शब्दाची व्युत्पत्ती स्पष्ट केलेली असते. शब्दाच्या अर्थाच्या इतिहासक्रमातील बदल, त्याचा विकासक्रम आणि वर्तमानकाळातील अर्थ इ. माहिती यात आढळते.
(७) परिभाषा कोश. वेगवेगळ्या ज्ञानशाखांतील संज्ञा, परिभाषा यांचा अर्थ अशा कोशात असतो. उदा., मानसशास्त्रीय परिभाषा कोश, साहित्यसमीक्षा परिभाषा कोश.
(८) उच्चारकोश : यात प्रत्येक शब्दाचा (नेहमी वापरल्या जाणाऱ्या विशेष नामाचाही) उच्चार दिलेला असतो उदा., डॅन्यल जोन्स यंचे इंग्लिश प्रोनान्सिंग डिक्शनरी.
संदर्भ: मराठी विश्वकोश
हे पण वाचा – संत एकनाथ महाराज कोण होते