मेनू बंद

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची संपूर्ण माहिती मराठी

आपण या आर्टिकल मध्ये भारतातील व विशेषतः महाराष्ट्रातील समाजसुधारक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला ‘Rashtrasant Tukdoji Maharaj‘ यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

राष्ट्रसंत तुकडोजी (Rashtrasant Tukdoji Maharaj) महाराज माहिती मराठी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कोण होते

तुकडोजी महाराज (१९०९ -१९६८) हे महाराष्ट्रातील एक आध्यात्मिक संत होते. महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी ३० एप्रिल, १९०९ रोजी एका गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. ते आडकोजी महाराजांचे शिष्य होते. तुकडोजी महाराज हे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात रस्त्यांच्या बांधकामासह सामाजिक सुधारणांमध्ये सहभागी होते. त्यांनी सुरू केलेले अनेक विकास कार्यक्रम त्यांच्या निधनानंतरही कार्यक्षमतेने सुरू आहेत.

प्रारंभीक जीवन

बालपणात संत तुकडोजी महाराजांनी आत्मसाक्षात्कारासाठी कठोर तपश्चर्या आणि आध्यात्मिक तपश्चर्या केली. 1937 आणि 1944 मध्ये अध्यात्मिक गुरू मेहेर बाबा यांच्यासाठी सादर केलेल्या हिंदी आणि मराठीमध्ये 3000 हून अधिक भजने रचणारे ते एक उत्तम वक्ते आणि संगीतकार होते. त्यांनी धर्म, समाज, राष्ट्र आणि शिक्षण यावर अनेक लेखही लिहिले आहेत.

त्यांनी विद्यमान धार्मिक पंथ आणि इतर विचारसरणींचा अभ्यास केला आणि भक्तांच्या धार्मिक आणि धर्मनिरपेक्ष समस्यांवर चर्चा केली. सामाजिक-अध्यात्मिकतेची पुन्हा व्याख्या करण्याचा आणि राष्ट्राचे पुनरुज्जीवन आणि जागृत करण्याचा त्यांचा निर्धार होता.

तुकडोजी महाराज यांना ‘ राष्ट्रसंत ‘ म्हणून संबोधले जाते. त्यांचे संपूर्ण नाव माणिक बंडोजी इंगळे असे होते. त्यांच्या घरची परिस्थिती अतिशय गरिबीची होती; त्यामुळे घरात शिक्षणाला अनुकूल वातावरण नव्हते. तशा छोट्या माणिकलाही शाळेची फारशी आवड नव्हती. याचा परिणाम म्हणजे तुकडोजींचे शिक्षण कसेबसे मराठी तिसऱ्या इयत्तेपर्यंत झाले; परंतु लहानपणापासूनच त्यांचा ईश्वरभक्तीकडे ओढा होता.

त्या वयातही ते भजने गाण्यात तल्लीन होऊन जात असत. घरच्या दारिद्र्याला कंटाळून तुकडोजींची आई आपल्या या छोट्या मुलासह माहेरी वरखेडला येऊन राहिली . त्या ठिकाणी आडकोजी महाराज या नावाचे एक नाथपंथीय साधू वास्तव्यास होते. बालवयातील माणिकचे मन आडकोजी महाराजांकडे आकृष्ट झाले आणि त्याने महाराजांना आपले गुरू मानले. आडकोजी महाराजांचीही आपल्या या छोट्या शिष्यावर मर्जी बसली व त्यांनी त्याचे नाव ‘ तुकड्या ‘ असे ठेवले. या नावाचेच पुढे तुकडोजी महाराज या नावात परिवर्तन झाले.

तुकडोजी आठ – नऊ वर्षांचे असताना आडकोजी महाराजांचे निधन झाले. या प्रसंगामुळे तुकडोजी एकदम उदास झाले. मनाच्या अशा अवस्थेतच तुकडोजींनी वयाच्या नवव्या वर्षी घर सोडण्याचा निर्णय घेतला आणि ईश्वरचिंतनासाठी त्यांनी एकान्तवास पत्करला. यापुढील आठ – नऊ वर्षे ते जंगलात, रानावनात भटकत राहिले.

त्यानंतर ते समाजात परत आले आणि भजने करीत सर्वत्र फिरू लागले. लोकांनाही त्यांची भजने आवडू लागली. याच सुमारास तुकडोजी महाराजांनी संपूर्ण भारतभर प्रवास केला. या प्रवासात देशातील सर्वसामान्य जनतेची दैन्यावस्था जवळून पाहावयास मिळाली.

कार्य

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनांमुळे अल्पावधीतच त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली. महात्मा गांधींनीही त्यांना सेवाग्राममध्ये बोलावून घेतले आणि त्यांची भजने ऐकली, तुकडोजींनी सेवाग्राममध्ये सुमारे दीड महिना वास्तव्य केले. या काळात अनेक राष्ट्रीय नेत्यांचा सहवास त्यांना लाभला. त्यातून तुकडोजींच्या मनातही राष्ट्रप्रेम जागे झाले आणि त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सामील होण्याचा निर्णय घेतला.

यानंतर तुकडोजी महाराजांनी भजन व कीर्तन यांद्वारे सर्वसामान्य लोकांत राष्ट्रीय वृत्ती जागविण्याचे आणि त्यांची मने राष्ट्रकार्याकडे वळविण्याचे कार्य हाती घेतले . त्यांच्या प्रचारकार्याने सामान्य लोकांत प्रचंड जागृती घडून आली. हजारो लोक राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेण्यासाठी पुढे आले.

तुकडोजी महाराजांच्या ‘ झाड झडुले शस्त्र बनेंगे, भक्त बनेगी सेना। ‘, ‘ पत्थर सबही बाँब बनेंगे। ‘ यांसारख्या भजनांनी जनतेची मने पेटून उठली. त्यांच्या झंझावाती प्रचाराची इंग्रज सरकारने इतकी धास्ती घेतली की, त्याने तुकडोजींच्या भजनांवरही बंदी घातली. अखेरीस सरकारने त्यांना अटक करून तुरुंगात डांबले. सन १९४२ च्या ‘ चले जाव ‘ चळवळीच्या काळात तुकडोजी महाराजांच्या प्रचारकार्यामुळे विदर्भातील अनेक गावांत चळवळीचे लोण पोहोचले आणि त्या गावांनी स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात महान कामगिरी बजावली.

राष्ट्रसंत तुकडोजी यांनी समाजसुधारणेच्या क्षेत्रातही फार मोठे कार्य केले होते. ‘ गोरगरिबांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा ‘ असे त्यांनी मानले आणि तो संदेश आपल्या हजारो अनुयायांना दिला. दीनदुबळ्यांची सेवा केल्याने, त्यांचे अश्रू पुसल्याने परमेश्वराचे दर्शन तुम्हाला होऊ शकेल, असा त्यांनी लोकांना उपदेश केला. सन १९३५ मध्ये त्यांनी मोझरी येथे ‘ गुरुकुंज ‘ आश्रमाची स्थापना केली. त्यांचा हा आश्रम जनसेवेचे एक केंद्रच बनले. त्या ठिकाणी त्यांनी लोककल्याणाचे अनेक उपक्रम राबविले.

समाजातील सर्व लोकांनी आपापसांतील भेदाभेद दूर करून बंधुभावाने एकत्र यावे आणि एकात्म समाजाची उभारणी करावी यासाठीही तुकडोजी महाराजांनी प्रयत्न केले होते. आपल्या समाजातील जातीयता नष्ट व्हावी, अस्पृश्यतेच्या प्रथेचे उच्चाटन व्हावे, समाजात शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी लोकजागृतीची मोहीम त्यांनी उघडली होती.

ग्रामसुधारणा

अस्पृश्यांना सर्वांच्या बरोबरीची वागणूक मिळाली पाहिजे; त्यांच्यावरील अन्यायाचे परिमार्जन झाले पाहिजे, असे त्यांनी लोकांना सांगितले. भारतीय समाजातील अनिष्ट रूढी व प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी अतिशय कष्ट घेतले. व्यसनमुक्ती, पशुहत्याबंदी, यात्राशुद्धी, कुटुंबनियोजन, हुंडाबंदी इत्यादी कार्यांनाही त्यांनी चालना दिली. यावरून त्यांच्या समाजसुधारणेच्या कार्याची व्याप्ती किती प्रचंड होती हे स्पष्ट होते.

राष्ट्रसंत तुकडोजी यांनी ग्रामसुधारणा मोहीमही हाती घेतली होती. हिंदुस्थान हा खेड्यापाड्यांनी बनलेला देश आहे . तेव्हा खेड्यांची सुधारणा झाली तरच देशाची प्रगती होईल हे ओळखून त्यांनी ग्रामसुधारणेवर भर दिला. त्यासाठी ग्रामसफाई, गावाचे आरोग्य आणि गावातील लोकांत बंधुभावाची वृद्धी या गोष्टी साध्य करण्यासंबंधी त्यांनी लोकांना उपदेश केला.

मृत्यू

गावाचा विकास कसा साधावा हे लोकांना समजावून देण्यासाठी त्यांनी ‘ ग्रामगीता ग्रंथ लिहिला. ‘ गाव हेच देऊळ आहे आणि त्या देवळातील देव म्हणजे गावातील लोक ! ‘ असे सांगून त्यांनी जनसेवेचे तत्त्व लोकांच्या मनात रुजविण्याचा प्रयत्न केला. आपल्या भजनांद्वारे त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेशही लोकांपर्यंत पोहोचविला. त्यांच्या या कार्याची स्मृती म्हणून २१ व्या शतकाच्या आरंभापासूनच महाराष्ट्र सरकार ‘ तुकडोजी महाराज ग्रामसुधार अभियान ‘ राज्यात राबवीत आहे. अशा या राष्ट्रसंताचा मृत्यू ११ ऑक्टोबर, १९६८ रोजी झाला.

तुकडोजी महाराजांनी लिहिलेली पुस्तके

  1. ग्रामगीता
  2. अनुभव सागर भजनावली
  3. जीवन जागृती भजनावली
  4. राष्ट्र भजनावली
  5. आदेशरचना

हे सुद्धा वाचा –

Related Posts