मेनू बंद

उभयान्वयी अव्यय व त्याचे प्रकार | Ubhayanvayi Avyay in Marathi

Ubhayanvayi Avyay in Marathi: मराठी व्याकरणामध्ये ‘ उभयान्वयी अव्यय ‘ हा अतिशय महत्वाचा भाग आहे. त्यामुळे आपण या लेखात उभयान्वयी अव्यय म्हणजे काय आणि उभयान्वयी अव्यय चे प्रकार किती आहेत हे सविस्तरपणे समजून घेऊया.

उभयान्वयी अव्यय व त्याचे प्रकार | Ubhayanvayi Avyay in Marathi

‘ उभयान्वयी अव्यय ‘ हा अव्ययांचा तिसरा प्रकार होय. अव्ययांचा अभ्यास करताना आपण यापूर्वी क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय यांचा अभ्यास केला. आता आपण उभयान्वयी अव्ययांचा अभ्यास करू या. पुढील वाक्ये पाहा.

 1. रेणुने बाजारातून कांदे बटाटे आणले.
 2. प्राची कॉलेजला जायला निघाली आणि पावसाला सुरुवात झाली.
 3. शिक्षणात आकाश चे विशेष लक्ष नसे पण व्यायामाची त्याला चांगली आवड होती.
 4. पवन मस्ती करतो, म्हणून शेवटी मार खातो.

उभयान्वयी अव्यय म्हणजे काय

वरील वाक्यांपैकी पहिल्या वाक्यात ‘ व ‘ हा शब्द ‘ बटाटे ‘ नि ‘ कांदे ‘ या शब्दांना जोडण्याचे काम करतो. पुढील वाक्यांतील ‘ आणि , पण , म्हणून ‘ हे शब्द दोन वाक्यांना जोडण्याचे काम करतात. अशा तऱ्हेने दोन किंवा अधिक शब्द, अथवा दोन किंवा अधिक वाक्ये यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. ‘ उभय ‘ म्हणजे दोन तर ‘ अन्वय ‘ म्हणजे संबंध असा या शब्दाचा अर्थ आहे.

उभयान्वयी अव्ययांचे प्रमुख कार्य म्हणजे दोन शब्द किंवा वाक्ये यांना जोडणे हे आहे. ती अव्यये असतात. वाक्यात इतर कोणतेही कार्य ती करत नाहीत. काही शब्द दोन वाक्ये जोडण्याचे काम करतात. उदाहरणार्थ – जो – जी – जे – ज्या ही सर्वनामे जसा तसा, जितका तितका ही संबंधी विशेषणे दोन वाक्यांना जोडतात पण ती विकारी आहेत ; ती अव्यये नाहीत, जेथे तेथे, जेव्हा तेव्हा यांसारखी संबंधी क्रियाविशेषणे दोन वाक्ये जोडण्याचे कार्य करतात ; पण त्यांचे प्रमुख कार्य क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगण्याचे असते. म्हणून त्यांना उभयान्वयी अव्यये असे म्हणतात.

उभयान्वयी अव्ययांचे प्रकार उभयान्वयी अव्ययांचे दोन मुख्य प्रकार आहेत –

 1. प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय
 2. गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय

1. प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय

उभयान्वयी अव्ययांनी जोडणारी वाक्ये स्वतंत्र किंवा एकमेकांवर अवलंबून नसणारी म्हणजे ती सारख्या दर्जाची असतील तर अशा प्रकारच्या उभयान्वयी अव्ययांना प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात ; पण हीच अव्यये जेव्हा एक प्रधान वाक्य व दुसरे गौण वाक्य असेल तर अशी असमान दर्जाची वाक्ये जोडतात तेव्हा त्यांना गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांचे पोट प्रकार खालील प्रकारे आहेत –

(१) समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय

पुढील वाक्ये पाहा

 1. पावसाला सुरुवात झाली आणि विजा चमकू लागल्या.
 2. टॉमी जवळ आला माझ्यावर भुंकु लागला.
 3. मित्राला मी पैसे दिले; शिवाय त्याची मदतही केली.

वरील वाक्यांतील ‘ आणि, व, शिवाय ‘ यांसारखी उभयान्वयी अव्यये दोन प्रधान वाक्यांना जोडताना त्यांचा मिलाफ किंवा समुच्चय करतात. येथे समुच्चय म्हणजे बेरीज. ही अव्यये पहिल्या विधानात अधिक भर घालतात ; म्हणून अशा उभयान्वयी अव्ययांना समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.

(२) विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय

पुढील वाक्ये वाचा –

 1. देह जावो अथवा राहो । पांडुरंगी दृढ भावो ।।
 2. पाऊस पडो वा न पडो, तुला कॉलेजला यावचं लागेल.
 3. तुला ज्ञान हवे की धन हवे ?
 4. तुला यायचं किंवा नाही, ते तू ठरव.

वरील वाक्यांतील ‘ अथवा, वा, की, किंवा ‘ ही उभयान्वयी अव्यये दोन किंवा अनेक गोष्टींपैकी एका गोष्टीची अपेक्षा दाखवितात. म्हणजे ती ‘ हे किंवा ते ‘ ‘ कोणते तरी एक ‘ असा अर्थ सुचवितात. अशा उभयान्वयी अव्ययांना विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. येथे विकल्प म्हणजे दोहोंतील एकाची निवड. काही उदाहरण: अगर, अथवा, किंवा, की, वा.

(३) न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय

पुढील वाक्ये पहा –

 1. शेतकऱ्यांनी शेते नांगरली ; पण पाऊस पडलाच नाही.
 2. तिला मी फोन केला ; परंतु तिने उचलला नाही.
 3. मरावे परी कीर्तिरूपे उरावे।
 4. तिला थोडे बरे नाही बाकी सर्व ठीक.

वरील वाक्यांतील ‘ पण, परंतु, परी, बाकी ‘ ही अव्यये पहिल्या वाक्यातील काही उणीव, कमीपणा, दोष असल्याचे दाखवितात. अशा अव्ययांना न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यये म्हणतात. न्यूनत्व म्हणजे कमीपणा. ही अव्यये दोन वाक्य विरोध दाखवितात म्हणून त्यांना विरोधदर्शक असेही म्हणतात . ‘ किंवा, पण, परंतु, बाकी, तरी ‘ ही अव्यये न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय आहेत.

(४) परिणामबोधक उभयान्वयी अव्यय

पुढील वाक्ये पहा –

 1. प्राचीने उत्तम भाषण केले; म्हणून तीला बक्षीस मिळाले.
 2. गाडी वाटेत पंचर झाली; सबब मला उशीर झाला.
 3. त्याने माझा अपमान केला; याकरिता मला त्याचा राग आला.

वरील वाक्यांतील ‘ म्हणून, सबब, याकरिता ‘ ही अव्यये पहिल्या वाक्यात घडले त्याचा परिणाम पुढील वाक्यात सुचवितात. म्हणून अशांना परिणामबोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात. ‘ अतएव , तस्मात , तेव्हा म्हणून , यास्तव , सबब ‘ ही या प्रकारची अव्यये आहेत .

2. गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय

एक प्रधान वाक्य व दुसरे गौण वाक्य असेल तर अशी असमान दर्जाची वाक्ये जोडतात तेव्हा त्यांना गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. आता, आपण गौणत्वदर्शक उभयान्वयी अव्ययांचे प्रकार पाहू या.

( १ ) स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय

पुढील वाक्ये पहा –

 1. एक रुपया म्हणजे शंभर पैसे.
 2. तो म्हणाला, की मी हरलो.
 3. दशरथ म्हणून एक राजा होऊन गेला.
 4. विनंती अर्ज ऐसा जे

वरील वाक्यांतील ‘ म्हणजे, की, म्हणून, जे ‘ या उभयान्वयी अव्ययांनी दोन शब्दांचा किंवा वाक्यांचा संबंध जोडलेला आहे. तसेच, या अव्ययांनी मागील शब्दाचे किंवा वाक्याचे स्वरूप उलगडून सांगितलेले असते. ज्या उभयान्वयी अव्ययामुळ प्रधान वाक्याचे स्वरूप किंवा खुलासा गौण वाक्याने कळतो त्यांस स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.

(२) कारणबोधक उभयान्वयी अव्यय

पुढील वाक्ये पहा –

 1. निखिलला बढती मिळाली, कारण त्याने चोख कामगिरी बजावली.
 2. आम्हांला हेच कापड आवडते, का की ते आपल्या देशात तयार झाले आहे.

वरील वाक्यांतील ‘ कारण , का की ‘ ही उभयान्वयी अव्यये एक प्रधानवाक्य व एक गौणवाक्य यांना जोडतात . यांतील दुसरे गौणवाक्य हे पहिल्या प्रधान वाक्याचे कारण आहे . ‘ कारण का, की, कारण की, की´ अशा प्रकारच्या कारण दाखविणाऱ्या अव्ययांना कारणबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.

(३) उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय

पुढील वाक्ये पाहा –

 1. मोठा अधिकारी व्हावा म्हणून त्याने खूप अभ्यास केला.
 2. विजेतेपद मिळावे यास्तव त्यांनी खूप प्रयत्न केले.

‘ म्हणून, सबब, यास्तव कारण, की ‘ यांसारख्या अव्ययांनी जेव्हा गौण वाक्य हे प्रधान वाक्याचा उद्देश किंवा हेतू आहे असे दर्शविले जाते तेव्हा त्यांस उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.

(४) संकेतबोधक उभयान्वयी अव्यय

पुढील वाक्ये पाहा –

 1. जर तिच्या लग्नाची पत्रिका मिळाली तर तिच्या लग्नाला जाईल.
 2. जरी त्याला समजावून सांगितले, तरी त्याने ऐकले नाही.
 3. तू लवकर घरी आलास, म्हणजे आपण बागेत जाऊ.

‘ जर – तर, जरी – तरी, म्हणजे, की, तर ‘ या उभयान्वयी अव्ययांमुळे पहिल्या वाक्यातील अटीवर दुसऱ्या वाक्यातील गोष्ट अवलंबून असते. ‘ जर ‘ ने अट दाखविली जाते आणि ‘ तर ‘ ने त्याचा परिणाम दर्शविला जातो. ‘ जरी’ने अट दाखविली जाते आणि ‘ तरी’ने अनपेक्षित किंवा विरुद्ध असे कार्य दर्शविले जाते. अशा वेळी सामान्यतः पहिले वाक्य गौण व दुसरे प्रधान असते. ही अव्यये संकेत किंवा अट दाखवितात. अशा अव्ययांना संकेतबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.

हे सुद्धा वाचा

Related Posts