मेनू बंद

वेठबिगार म्हणजे काय

वेठबिगारी ही कर्जाच्या बंधनापोटी तसेच कर्जाची परतफेड करण्याच्या ऋणकोच्या अक्षमतेतून निर्माण झालेली समाजातील अनिष्ट प्रथा असून ती शोषणप्रवृत्तीची निदर्शक आहे. कर्जाच्या परतफेडीसाठी ऋणकोने सावकाराच्या घरी जन्मभर राबूनही कर्ज फिटत नसे. त्याच्या वारसालासुध्दा सावकाराघरी कर्जफेडीसाठी राबावे लागे. जर तुम्हाला वेठबिगार म्हणजे काय बद्दल पुरेशी माहिती नसेल तर आम्ही हयाबद्दल विस्ताराने माहिती देत आहोत.

वेठबिगार म्हणजे काय

वेठबिगार म्हणजे काय

निराधार, दुर्बल, परावलंबी व असंघटित व्यक्तींच्या अज्ञानाचा व दुबळेपणाचा गैरफायदा उठवून, त्यांना अंकित करुन, त्यांच्या इच्छेविरुध्द सक्तीने व योग्य मोबदला न देता किंवा विनामोबदला पडेल त्या कामाकरिता राबवून घेणे याला वेठबिगार असे म्हणतात. वेतन अथवा मजुरी न देता वा अल्पवेतनावर शासकीय अधिकारी, जमीनमालक व पूर्वीचे सरंजामदार, वतनदार हे रयतेकडून जुलूम जबरदस्तीने कामे करवून घेत, ही वेठबिगारीच होय. अशा पध्दतीने राबणाऱ्या मजुराला ‘वेठी’ अथवा ‘बिगारी’ असे म्हणतात.

पूर्वीच्या काळी जमीनदार आपल्या मालकी हक्काच्या बळावर कुळांकडून त्यांना पैसे न देता, वेठीला धरुन कामे करण्यास भाग पाडीत असत. एवढेच नव्हे, तर त्यांच्या चीजवस्तूंवरही आपला अधिकार असल्याचे मानत असत. भारतात खेडोपाडयांतील गावगाडयात जमीनदार, वतनदार हे अलुतेदार- बलुतेदारांकडून वेठबिगारीप्रमाणे अनेक कामे करवून घेत असत.

उदा., शेतावर राबणे, ओझी वाहून नेणे, परगावी निरोप पोहोचविणे इत्यादी. बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश इ. राज्यांत जमीनदार रयतेकडून अद्यापही वेठबिगारीची कामे करवून घेत असल्याचे दिसून येते. दक्षिणेकडील राज्यांत वतनदार मंडळी गावातील गरिबांना वेठबिगारी करावयास भाग पाडीत. समाजातील प्रतिष्ठित, धनिक वर्गाने दलित समाजाला वेठबिगारी म्हणून राबवून घेतल्याचीही उदाहारणे आढळतात.

जमीनदारांच्या शेतावर राबणाऱ्या आदिवासींमध्ये वेठबिगारीचे प्रमाण जास्त आढळते. उदा., केरळमधील पणियन, गुजरातमधील दुबळा, तसेच महाराष्ट्रातील वारली, कातकरी, कोकणा इत्यादी. निरनिराळ्या भागांत वेगवेगळ्या नावांनी ही पध्दती रुढ असल्याचेही दिसून येते. उदा., विंध्य प्रदेशातील ‘माहिपारी’, ओरिसामधील कोरापुट जिल्ह्यातील ‘गोठी’, राजस्थानात ‘सगरी’, बिहारमध्ये ‘कामियाती’ इत्यादी. या वेठबिगारीमध्ये जमीनदार आदिवासींकडून आपल्या जमिनीची मशागत करवून घेतात.

ते स्वतःसाठी सर्व बाबतीत सोयीची जमीन ठेवतात आणि उर्वरित जमीन आदिवासींना भाडेतत्त्वावर देतात. अशा छळाचे स्वरूप मोठ्या रकमेची वसुली करणे आणि त्यांना विनामूल्य किंवा वाजवी दरात काम करण्यास भाग पाडणे आहे. सक्तीच्या मजुरीच्या विरोधात बंड करणाऱ्या आदिवासींना अमानुष वागणूक दिल्याचीही उदाहरणे आहेत. सावकारांकडून घेतलेले कर्ज रोखीने फेडणे शक्य नसल्याने आदिवासींना पिढ्यानपिढ्या वेठबिगारीने काम करावे लागले.

आदिवासींप्रमाणेच स्त्रियांना व अल्पवयीन मुलांना कमी मजुरीवर राबवून घेणे, हाही वेठबोगारीचाच एक प्रकार मानावा लागेल. तुरुंगातील कैद्यांकडून नियमितपणे उत्पादनाच्या व फायद्याच्या हेतूने, सक्तीने करवून घेतलेल्या कामासही वेठबिगार असे संबोधतात. त्यात न्यायालयाकडून शिक्षा झालेले कैदी, तसेच युध्दकैदी, राजकीय कैदी हेही समाविष्ट होतात.

वेठबिगारी हा गुलामगिरीचा आणि दास्यत्वाचा एक प्रकार आहे. तथापि, सर्वसाधारणपणे, एकापेक्षा जास्त व्यक्ती, किंवा अगदी लोकांचा समूह, सक्तीच्या मजुरीमध्ये गुंतलेला असतो. गुलामगिरीत एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या संपूर्ण मालमत्तेचा मालक असतो, तर वेठबिगारी त त्या व्यक्तीच्या श्रमाचे मालक जबरदस्तीने शोषण करतात.

हे सुद्धा वाचा –

Related Posts