मेनू बंद

विजय तेंडुलकर – संपूर्ण माहिती मराठी


आपण या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील थोर साहित्यिक विजय तेंडुलकर (जन्म : कोल्हापूर, ६ जानेवारी १९२८; मृत्यू – पुणे, १९ मे २००८) यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Vijay Tendulkar यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

विजय तेंडुलकर (Vijay Tendulkar)

विजय तेंडुलकर

विजय तेंडुलकर हे प्रसिद्ध मराठी नाटककार, लेखक, पटकथालेखक, तथा राजकीय विश्लेषक होते. सखाराम बाईँडर हे प्रसिद्ध नाटक तेंडुलकर यांनी लिहिले. विजय तेंडुलकरांचा जन्म जानेवारी ६, १९२८ रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांचे वडील धोंडोपंत तेंडुलकर हे स्वतः लेखक, प्रकाशक आणि हौशी नट होते. या कौटुंबिक पार्श्वभूमीतून तेंडुलकरांवर वाङ्मयीन संस्कार होत गेले. दि.बा. मोकाशी, वि. वि. बोकील, अनंत काणेकर, शिवरामपंत वाशीकर यांनी लिहिलेल्या साहित्याच्या वाचनातूनही घडवणूक होत गेली.

तेंडुलकरांचे औपचारिक शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले. त्या काळात जोमाने चालू असलेल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीत ते सहभागी झाले. साहजिकच या कालखंडात विविध विचारसरणींशी त्यांचा जवळून परिचय झाला. त्यांचे वास्तव्य पुण्यात आणि मुंबईत असे. लेखिका आणि अभिनेत्री प्रिया तेंडुलकर या त्यांच्या कन्या होत.

हे सुद्धा वाचा – विंदा करंदीकर

नाटके

लेखनदृष्ट्या ‘गृहस्थ’ हे तेंडुलकरांचे पहिले नाटक. (याचेच “कावळ्यांची शाळा’ या नावाने १९६४ साली पुनर्लेखन) मात्र ‘श्रीमंत’ हे त्यांचे रंगभूमीवरील आलेले पहिले नाटक होते. सुरुवातीच्या नाटकांपासूनच माणसाच्या जीवनाचा, त्यांच्या विकारांचा, एकारलेपणाचा वेध घेण्याचा त्यांचा प्रयत्‍न दिसतो. विशिष्ट तत्त्वज्ञानाचा, विचारसरणीचा ठसा नाकारून तेंडुलकर मनस्वीपणे लिहीत गेले.

‘शांतता कोर्ट चालू आहे’ यासारख्या नाटकातून समाजाला प्रसंगी बंडखोर वाटणार्‍या विषयांनाही त्यांच्या लेखणीने हात घातला. ‘सखाराम बाईंडर’ मध्ये हाताळलेला स्फोटक विषय आणि ‘घाशीराम कोतवाल’ मध्ये हाताळलेला पारंपरिक तंत्राला धक्का देणारा नाट्यबंध त्यांच्या याच प्रयोगशील जाणिवांचा अविभाज्य भाग होता. त्यामुळेच नव्या-जुन्या कलावंतांना तेंडुलकरांनी लिहिलेल्या नाटकांचे आव्हान पेलण्याची ओढ सातत्याने राहिली.

‘माणूस नावाचे बेट’, ‘मधल्या भिंती’, ‘सरी गं सरी’, ‘एक हट्टी मुलगी’, ‘अशी पाखरे येती’, ‘गिधाडे’, ‘छिन्न’ आदी नाटके रूढ सामाजिक संकेतांना, तसेच नाट्यसंकेतांना हादरा देणारी आणि वादग्रस्त ठरली. मानवी वृत्तीतील कुरूपता, हिंस्रता यांचे भेदक, पण वास्तववादी उग्रकठोर चित्रण असल्याने या नाट्यकृती गाजल्या. त्यावर वाद झडले आणि न्यायालयीन संघर्ष झाला. आशय आणि तंत्रदृष्ट्या असणारी विलक्षण विविधता, हे त्यांचे वैशिष्ट्य ठरले.

हे सुद्धा वाचा – बाबासाहेब पुरंदरे

चित्रपट

तेंडुलकरांनी चित्रपट माध्यमही नाटकांच्याच ताकदीने हाताळले. सामना, सिंहासन, आक्रीत, उंबरठा, अर्धसत्य, आक्रोश, आघात, इत्यादी चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या. स्वयंसिद्धा या दूरचित्रवाणी मालिकेचे लेखनही त्यांनी केले.

मानवी मनाचे, त्यातही त्याच्या कुरूपतेचे चित्रण करून अशा व्यक्तिरेखांना समजून घेण्यात त्यांचे जीवन मांडताना घडते-बिघडते संबंध, त्यातील ताण, त्या अनुषंगाने व्यवस्थांचे बंदिस्तपण टिपण्यात त्यांची लेखणी रमते, काव्य-कारुण्य, व्यक्ती-समाज, वास्तव-फॅन्टसी यांची कलात्मक सरमिसळ त्यांच्या नाटकांत आढळते.

नवनाट्य, वास्तववाद यांच्याशी त्यांच्या लेखनाचे आंतरिक नाते दिसते. तरीही त्यांच्यावर कोणताही शिक्का मारता येत नाही इतकी प्रयोगशीलता दिसते.

“देशातील वाढता हिंसाचार” या विषयाच्या अभ्यासासाठी त्यांना १९७३-७४ मध्ये नेहरू शिष्यवृत्ती मिळाली होती. तसेच १९७९ ते ८१ दरम्यान त्यांनी “टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस” या संस्थेत अभ्यागत प्राध्यापक म्हणूनही काम केले. नवनाट्याविषयी आस्था बाळगणार्‍या संस्था आणि त्यातील कार्यकर्त्यांबद्दल त्यांना जिव्हाळा होता. तेंडुलकरांच्या ‘झाला अनंत हनुमंत’ या नाटकावर चित्रपट बनला आहे. मिना शमीम फिल्म्स प्रस्तुत ‘झाला अनंत हनुमंत’ची निर्मिती मुन्नावर शमीम भगत यांनी केली असून, दिग्दर्शनही त्यांचेच आहे.

पुरस्कार

कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या जनस्थान पुरस्काराचे तेंडुलकर पहिले मानकरी होते. १९७० मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, त्याच वर्षी कमलादेवी चट्टोपाध्याय पुरस्कार, इ.स. १९७७ मध्ये मंथनसाठी सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, १९८१ मध्ये आक्रोश चित्रपटासाठी फिल्म फेअरचा सर्वोत्कृष्ट कथा व पटकथा पुरस्कार; तर १९८३ मध्ये अर्धसत्यसाठी पुन्हा सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी फिल्म फेअर पुरस्कार त्यांना मिळाला.

पद्मभूषण, महाराष्ट्र गौरव, सरस्वती सन्मान, मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान, विष्णुदास भावे गौरवपदक, कथा चूडामणी पुरस्कार, पु.ल. देशपांडे बहुरूपी सन्मान, तन्वीर सन्मान आदी इतर पुरस्कारही त्यांना मिळाले. इ.स. १९९८ मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमीची अभ्यासवृत्ती मिळाली होती.

हे सुद्धा वाचा – डॉ. मंदाकिनी आमटे

साहित्य

  1. कथा – काचपात्रे, गाणे, तेंडुलकरांच्या निवडक कथा, द्वंद्व, फुलपाखरू, मेषपात्रे.
  2. चित्रपट पटकथा – अर्धसत्य, आक्रीत, आक्रोश, उंबरठा, कमला, गहराई, घाशीराम कोतवाल, चिमणराव, निशांत, प्रार्थना, २२ जून १८९७, मंथन, ये है चक्कड बक्कड बूम्बे बू, शांतता कोर्ट चालू आहे, सामना, सिंहासन .
  1. टॉक शो – प्रिया तेंडुलकर टॉक शो.
  2. दूरचित्रवाणी मालिका – स्वयंसिद्धा.
  3. नाटके – अजगर आणि गंधर्व, अशी पाखरे येती, एक हट्टी मुलगी, कन्यादान, कमला, कावळ्यांची शाळा, कुत्रे, गृहस्थ, गिधाडे, घरटे अमुचे छान, घाशीराम कोतवाल, चिमणीचं घर होतं मेणाचं, चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी, छिन्न, झाला अनंत हनुमंत, त्याची पाचवी, दंबद्वीपचा मुकाबला,देवाची माणसे, नियतीच्या बैलाला, पाहिजे जातीचे, फुटपायरीचा सम्राट, भल्याकाका, भाऊ मुरारराव, भेकड, बेबी, मधल्या भिंती, माणूस नावाचे बेट, मादी (हिंदी), मित्राची गोष्ट, मी जिंकलो मी हरलो, विठ्ठला, शांतता! कोर्ट चालू आहे, श्रीमंत, सखाराम बाईंडर, सफर, सरी गं सरी.
  1. नाट्यविषयक लेखन – नाटक आणि मी.
  2. बालनाट्ये – इथे बाळे मिळतात, चांभारचौकशीचे नाटक, चिमणा बांधतो बंगला, पाटलाच्या पोरीचे लगीन, बाबा हरवले आहेत, बॉबीची गोष्ट, मुलांसाठी तीन नाटिका, राजाराणीला घाम हवा..
  1. ललित – कोवळी उन्हे, रातराणी, फुगे साबणाचे, रामप्रहर, हे सर्व कोठून येते?
  2. एकांकिका – अजगर आणि गंधर्व, थीफ : पोलिस, रात्र आणि इतर एकांकिका; समग्र एकांकिका (भाग १ ते ३)

Related Posts