Vikari and Avikari Shabd in Marathi Grammar: मराठी व्याकरणामध्ये ‘विकारी व अविकारी शब्द’ हा अतिशय महत्वाचा भाग आहे. त्यामुळे आपण या लेखात विकारी व अविकारी शब्द म्हणजे काय आणि ते आपण कश्या प्रकारे ओळखावे, हे पाहूया.

अर्थपूर्ण शब्द वाक्य तयार करतात. पण, वाक्यात वापरले जाणारे शब्द मूळ स्वरूपात जसेच्या तसे वापरले जात नाही. कधीकधी आपण त्यांचे रूप बदलून वाक्य बनवितो. सर्वच शब्दांमध्ये असा बदल होत नाही. काही शब्दांच्या रूपात बदल होतो, तर काही शब्द अजिबात बदलत नाहीत. शब्दांचे स्वरूप कधी बदलते? तर शब्दांचे लिंग किंवा वचन बदलते तेव्हा किंवा विभक्तीचे प्रत्यय लागतात, तेव्हा शब्दांच्या कोणत्या जातीत असा बदल होतो ते आपण पाहणार आहोत.
शब्दाची जात | पुल्लिंग | स्त्रिलिंग | अनेकवचन | विभक्ती |
नाम सर्वनाम विशेषण क्रियापद | मुलगा तो चांगला गातो | मुलगी ती चांगली गाते | मुलगे ते चांगले गातात | मुलांना त्यांना चांगल्याना गाण्याने |
नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद या चार शब्दांच्या जातीत लिंग, वचन व विभक्ती यांच्यामुळे बदल होतो. पण पुढील शब्द पाहा-
- आता, नंतर, येथे, इकडे (क्रियाविशेषणे)
- मागे, पुढे, करिता, साठी (शब्दयोगी)
- अथवा, आणि, परंतु, म्हणून (उभयान्वयी)
- अरेरे, वाह, शाब्बास, अबब (केवलप्रयोगी)
शब्दांच्या या चार जातीत लिंग, वचन किंवा विभक्तीमुळे बदल होत नाही. बदल होणे याला मराठी व्याकरणात विकार म्हणतात. व्याकरणीय नियमानुसार, शब्दांच्या आठ जातींपैकी नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद ही चार विकारी आहेत, म्हणजे बदलणारी आहेत. क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी व केवलप्रयोगी ही चार अविकारी आहेत. म्हणजे त्यांच्या रूपात बदल होत नाही. विकारी व अविकारी यांना अनुक्रमे सव्यय व अव्यय असेही म्हणतात.
विकारी व अविकारी शब्द म्हणजे काय
वाक्यातील नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद हे लिंग किंवा वचन मुळे जर बदलत असेल तर त्या शब्दांना विकारी शब्द म्हणतात. तसेच लिंग किंवा वचन यांचा वाक्यातील नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापदावर काहीही परिणाम पडत नसेल तर त्याला अविकारी शब्द म्हणतात.