Visheshan in Marathi Grammar: मराठी व्याकरणामध्ये “विशेषण” हा अतिशय महत्वाचा भाग आहे. त्यामुळे आपण या लेखात विशेषण म्हणजे काय आणि विशेषणाचे प्रकार किती आहेत हे सविस्तरपणे समजून घेऊया.

विशेषणे पुढील शब्दसमूह पाहा:
खोडसर मुले, पांढरा कुत्रा, हिरवे रान,
सहा टोप्या, त्याची पिशवी, खूप लोक.
वरील शब्दसमूहांत ‘खोडसर, पांढरा, हिरवे, सहा, त्याची, खूप‘ हे त्यांच्यापुढे येणाऱ्या नामांविषयी विशेष माहिती सांगतात. ही विशेष माहिती सांगणारे शब्द त्या नामांची विशेषणे आहेत.
विशेषण म्हणजे काय
नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दास “विशेषण” असे म्हणतात. विशेषणाचे वैशिष्ट्य हे की, ते नामाबद्दल अधिक माहिती सांगते व नामाच व्याप्ती मर्यादित करते व ते साधारणपणे नामापूर्वी येते. उदा. ‘टोपी‘ हे नाम आहे. आपल्याला ‘टोप्यां‘ विषयी बोलावयाचे आहे. त्या टोप्यांची संख्या ‘सहा‘ असे सांगून आपण संख्या सांगितली व ‘सहा‘ टोप्यांविषयी आपल्याला काही सांगावयाचे आहे, हे सुचविले. ‘काळ्या सहा टोप्या‘ असे म्हटले तर टोप्यांविषयी माहिती सांगून आपण ती मर्यादित केली.
“लोकरीच्या काळ्या सहा टोप्या आम्ही बाजारातून आणल्या.” या वाक्यात ज्या टोप्यांविषयी आपल्याला बोलावयाचे आहे ते अधिक मर्यादित केले; म्हणजे अधिक निश्चित केले असे म्हटले तरी चालेल.
विशेष्य म्हणजे काय
ज्या नामांबद्दल विशेषण अधिक माहिती सांगते त्या नामाला विशेष्य असे म्हणतात. वरील शब्दसमूहातील विशेषण – विशेष्य संबंध पुढीलप्रमाणे तक्त्यात मांडता येतील.
विशेषण | विशेष्य | विशेषण | विशेष्य |
चांगला काळा हिरवे | मुले कुत्रा रान | सहा त्याची खूप | टोप्या पिशवी लोक |
विशेषणांचे प्रकार विशेषणांचे मुख्य प्रकार तीन आहेत :
- (१) गुणविशेषण
- (२) संख्याविशेषण
- (३) सार्वनामिक विशेषण
त्या शिवायही विशेषणांचे पुढील तीन प्रकार आहेत :
- (१) नामसाधित विशेषण
- (२) धातुसाधित विशेषण
- (३) अव्ययसाधित विशेषण
१. गुणविशेष
ज्या विशेषणाच्या योगाने नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष दाखविला जातो त्यास गुणविशेष असे म्हणतात. जसे: ‘मोठी मुले, आंबट बोरे, शुभ्र ससा, शूर सरदार, रेखीव चित्र, निळासावळा झरा’.
२. संख्याविशेषण
ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या दाखविली जाते त्यास संख्याविशेषण असे म्हणतात. संख्याविशेषणाचे पुढील पोटप्रकार आहेत :
- गणनावाचक संख्याविशेषण
- क्रमवाचक संख्याविशेषण
- आवृत्तिवाचक संख्याविशेषण
- पृथकत्ववाचक संख्याविशेषण
- अनिश्चित संख्याविशेषण
(१) गणनावाचक संख्याविशेषण
पुढील शब्द पाहा:
दहा मुली, चौदा भाषा, साठ रुपये, सहस्रं किरणे, अर्धा तास, दोघे मुलगे.
वरील शब्दांतील दहा, चौदा, साठ, सहस्र, अर्धा, दोघे या विशेषणांचा उपयोग. केवळ गणती किंवा गणना करण्याकडे होतो. त्यांस गणनावाचक संख्याविशेषणे म्हणतात. गणनावाचक विशेषणे दोन प्रकारांनी लिहितात.
(१) अक्षरांनी व (२) अंकांनी
गणनावाचक संख्याविशेषणाचे तीन उपप्रकार मानतात. (अ) पूर्णांक वाचक- (एक, दोन… शंभर) १, २, १००.
(ब ) अपूर्णांक वाचक – (पाव, अर्धा, पाऊण, तीन पंचमांश) – 1/4, 1/2, 3/4, 3/5.
(क) साकल्या वाचक (तितक्या वस्तूंपैकी सर्व) – दोन्ही भाऊ, पाची पांडव, चारही बहिणी.
(२) क्रमवाचक संख्याविशेषण
पुढील शब्द पाहा
पहिला वर्ग, चौथा बंगला, आठवी इयत्ता, साठावे वर्ष
वरील शब्दांतील ‘ पहिला, चौथा, आठवी, साठावे ‘ ही विशेषणे वस्तूंचा क्रम दाखवितात. अशा विशेषणांना ‘ क्रमवाचक संख्या विशेषणे ‘ असे म्हणतात. प्रथमा , द्वितीया ते सप्तमी ही संस्कृतातील क्रमवाचक संख्याविशेषणे मराठीतही वापरतात.
(३) आवृत्तिवाचक संख्याविशेषण
पुढील शब्द पाहा
चौपट मुले, दसपट रुपये, दुहेरी रंग, द्विगुणित आनंद.
वरील शब्दांतील ‘ चौपट, दसपट, दुहेरी, द्विगुणित ‘ ही विशेषणे संख्येची किती वेळा आवृत्ती झाली हे दाखवितात. त्यांना ‘ आवृत्तिवाचक संख्याविशेषणे ‘ असे म्हणतात.
(४) पृथकत्ववाचक संख्याविशेषण
पुढील शब्द पाहा
एकेक मुलगा, दहा दहांचा गट.
यांतील ‘एकेक, दहादहा‘ ही विशेषणे वेगवेगळा (किंवा पृथक) असा बोध करून देतात. अशा विशेषणांना ‘पृथकत्ववाचक संख्याविशेषणे‘ असे म्हणतात.
(५) अनिश्चित संख्याविशेषण
सर्व रस्ते, थोडी मुले, काही पक्षी, इतर लोक, इत्यादी देश.
वरील शब्दांतील ‘ सर्व , थोडी , काही , इतर , इत्यादी ‘ ही संख्याविशेषणे निश्चित अशी संख्या दाखवीत नाहीत . म्हणून त्यांना ‘ अनिश्चित संख्याविशेषणे ‘ असे म्हणतात.
3. सार्वनामिक विशेषण
पुढील शब्द पाहा
हा मनुष्य, तो पक्षी, माझे पुस्तक
तिच्या साड्या, असल्या झोपड्या, कोणते गाव
वरील शब्दांतील ” हा, तो, मी, ती, असा, कोण ही मूळची सर्वनामे आहेत. सर्वनाम हे नामाऐवजी येत असते. पण वरील शब्दांत सर्वनामांच्यापुढे नामे आली आहेत. ती आता सर्वनामे राहिली नसून ती त्यांच्यापुढे आलेल्या नामांबद्दल विशेष माहिती सांगतात. म्हणजे ती विशेषणांचे कार्य करतात. सर्वनामांपासून बनलेल्या अशा विशेषणांना सार्वनामिक विशेषणे किंवा सर्वनामसाधित विशेषणे असे म्हणतात.
हे सुद्धा वाचा –