मेनू बंद

विष्णुशास्त्री पंडित – संपूर्ण माहिती

आपण या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक विष्णुशास्त्री पंडित (१८२७-१८७६) यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Vishnushastri Pandit यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

विष्णुशास्त्री पंडित - Vishnushastri Pandit

विष्णुशास्त्री पंडित कोण होते

विष्णुशास्त्री पंडित यांचा जन्म सन १८२७ मध्ये सातारा येथे झाला. त्यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील बावधन हे होय. त्यांनी लहानपणी आपले वडील परशुरामशास्त्री यांच्याकडून संस्कृत भाषेचे प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर वेदशास्त्रसंपन्न राघवेंद्राचार्य गजेंद्रगडकर व त्यांचे चिरंजीव नारायणाचार्य यांच्याजवळ राहून त्यांनी प्राचीन शास्त्रांचे अध्ययन केले.

प्रारंभीक जीवन

तथापि, इंग्रजी भाषेचे वाढते महत्त्व विचारात घेऊन १८४५ मध्ये इंग्रजी शिक्षणासाठी ते पुण्यास आले. दुर्दैवाने वडिलांच्या आकस्मिक निधनामुळे विष्णुशास्त्रींना आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागले, तरीही त्यांनी विद्याव्यासंग चालूच ठेवला. सन १८४८ मध्ये विष्णुशास्त्री पंडितांनी सरकारी नोकरीत प्रवेश केला; पण पुढे त्यांनी सरकारी नोकरीचा त्याग केला आणि ते वृत्तपत्र व्यवसायाकडे वळले.

सन १८६२ मध्ये मुंबई येथे ‘इंदुप्रकाश’ हे साप्ताहिक सुरू करण्यात न्या. रानडे, लोकहितवादी, यांच्याबरोबरच शास्त्रीजींचाही सहभाग होता इंदुप्रकाशच्या मराठी विभागाच्या उपसंपादक पदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती.

विष्णुशास्त्री पंडितांनी सरकारी नोकरीतून बाहेर पडल्यानंतर स्त्री – जातीच्या उद्धारासाठी प्राणपणाने झगडण्याचा निर्धार केला. या कामी त्यांना’ इंदुप्रकाश ‘ या पत्राच्या संपादकपदाचा खूप लाभ झाला. ‘इंदुप्रकाश’मधून ते आपली सुधारणावादी मते निर्भीडपणे मांडू लागले. भारतीय स्त्रियांच्या स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी त्यांनी गावोगावी व्याख्याने दिली, अनेक ग्रंथ लिहिले, शेकडो लेख प्रसिद्ध केले.

स्त्री शिक्षण, बालविवाह, जरठकुमारीविवाह, केशवपन, पुनर्विवाह, परदेशगमन, जातिभेद इत्यादी प्रश्नांचा त्यांनी आपल्या लेखांमधून ऊहापोह केला. या प्रश्नांवर सनातनी लोकांनी घेतलेल्या आक्षेपांचे त्यांनी सप्रमाण खंडन केले. प्राचीन काळी येथील समाजजीवनात स्त्रियांचे स्थान फार मोठे होते, हे त्यांनी अनेक पुराव्यांच्या आधारे दाखवून दिले. विष्णुशास्त्रींनी जुन्या धर्मग्रंथांचे सखोल अध्ययन केले होते; तेव्हा या धर्मग्रंथांच्या आधारेच त्यांनी आपल्या मतांचे समर्थन केले.

विष्णुशास्त्री पंडित यांचे सामाजिक कार्य – माहिती मराठी

विष्णुशास्त्री पंडितांनी स्त्रियांशी संबंधित असलेल्या विविध प्रश्नांविषयी आपले विचार मांडले आणि त्या सर्वच प्रश्नांसंबंधी सुधारणावादी भूमिका घेतली. तथापि, त्यांनी विधवाविवाहाच्या प्रश्नाला विशेष प्राधान्य दिले होते. २८ जानेवारी, १८६६ रोजी त्यांनी ‘पुनर्विवाहोत्तेजक मंडळी’ ची स्थापना केली. ते स्वतः या सभेचे चिटणीस होते. या सभेच्या वतीने दर आठवड्यास विधवाविवाहाच्या प्रश्नाची चर्चा करण्यासाठी बैठक भरत असे. या बैठकीस उपस्थित राहून वादविवाद करण्यास सनातनी पंडितांनाही मुभा होती.

ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या ‘विधवाविवाह’ या ग्रंथाचा विष्णुशास्त्रींनी मराठीत अनुवाद केला होता. ईश्वरचंद्र विद्यासागर व विष्णुशास्त्री पंडित हे दोघेही विधवाविवाहाचे पुरस्कर्ते होते. तथापि, या समस्येकडे पाहण्याचा त् दृष्टिकोन भिन्न होता. सरकारने विधवाविवाहाला मान्यता देणारा कायदा १८५६ मध्ये संमत केला.

परंतु, विधवाविवाहाला उत्तेजन मिळण्याच्या दृष्टीने हा कायदा पुरेसा नाही; किंबहुना, सामाजिक सुधारणांना कायद्याचा व सरकारचा आधार पुरेसा पडत नाही, अशा सुधारणांना समाजाने अंत: प्रेरणेने आशीर्वाद द्यावा लागतो, असे विष्णुशास्त्र्यांचे मत होते. म्हणून विधवाविवाहाच्या प्रश्नावर त्यांनी अनेक शास्त्री – पंडितांशी वेळोवेळी वादविवाद केले आणि आपल्या मतांना प्राचीन धर्मग्रंथांचे प्रमाण मिळवून देण्यावर भर दिला. साहजिकच, त्यांना आदराने ‘महाराष्ट्राचे विद्यासागर’ असे संबोधले जाते.

Vishnushastri Pandit Information in Marathi

Vishnushastri Pandit बोलघेवडे सुधारक नव्हते, तर ते कर्ते सुधारक होते. ज्या सुधारणांचा त्यांनी हिरीरीने पुरस्कार केला, त्यांचे व्यक्तिगत जीवनात प्रत्यक्ष आचरण करण्याचा प्रसंग जेव्हा त्यांच्यावर आला तेव्हा त्यांनी थातूरमातूर सबबी पुढे करून माघार घेतली नाही. सन १८७४ च्या सुमारास विष्णुशास्त्रींची प्रथम पत्नी मृत्यू पावली. त्या वेळी त्यांनी वामनराव आगाशे यांची विधवा कन्या कुसाबाई हिच्याशी पुनर्विवाह केला. अशा प्रकारे त्यांनी आपल्या विचारांवरील निष्ठा प्रत्यक्ष कृतीने सिद्ध केली.

विधवा विवाह मंडळाची स्थापना केली

विष्णुशास्त्री पंडित विधवाविवाहाचा केवळ पुरस्कार करूनच स्वस्थ राहिले नाहीत, तर असे विवाह घडवून आणण्यात त्यांनी प्रत्यक्ष पुढाकारही घेतला. त्यासाठी विष्णुशास्त्रींनी १४ डिसेंबर, १८६५ रोजी मुंबईत ‘विधवा विवाह मंडळा’ची स्थापना केली. त्यांच्या प्रोत्साहनाने पुणे येथील नारायण जगन्नाथ भिडे यांनी पुनर्विवाह केला. त्यानंतर १५ जून, १८६९ रोजी त्यांनी मुंबईत प्रभाकर भट – परांजपे यांची कन्या वेणूबाई हिचा पांडुरंग विनायक करमरकर यांच्याशी पुनर्विवाह घडवून आणला.

या पुनर्विवाहामुळे सनातनी लोकांमध्ये मोठीच खळबळ माजली. त्यांनी अशा विवाहांना विरोध करण्यासाठी जोरदार मोहीम उघडली. साहजिकच, विष्णुशास्त्री पंडितांवर सनातन्यांचा रोष ओढवला. त्यांना काही काळ बहिष्काराचा जाचही सहन करावा लागला. तथापि, अशा संकटांनी त्यांनी आपल्या कार्यात खंड पडू दिला नाही.

बालविवाहाची प्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न

आपल्या समाजातील बालविवाहाची प्रथा बंद करण्यासाठीदेखील विष्णुशास्त्रींनी प्रयत्न केले. बालविवाहाचे अनिष्ट परिणाम प्रामुख्याने स्त्रीच्या जीवनावरच होत असत. बालपणीच वैधव्य आलेल्या मुलीचे तर उभे आयुष्यच मातीमोल होत असे. म्हणून विष्णुशास्त्रींनी बालविवाहाच्या प्रथेविरुद्ध लोकांमध्ये जागृती घडवून आणण्यावर विशेष भर दिला. या कामी त्यांनी तडजोडवादी भूमिका स्वीकारून सनातनी मंडळींचेही सहकार्य मिळविले.

सनातनी व सुधारक अशा दोन्ही पक्षांना मान्य होईल असे एक संमतीपत्र त्यांनी तयार करून ते प्रसिद्धीस दिले. या संमतीपत्रात कन्येचा विवाह बारा वर्षांपासून सोळा वर्षांपर्यंत करावा आणि पुरुषाने सतरा वर्षांपुढे पंचेचाळीस वर्षांपर्यंतच आपले लग्न करावे, असे म्हटले होते.

स्त्रियांच्या न्याय्य हक्कांसाठी प्रयत्न

विष्णुशास्त्री पंडितांनी स्त्रियांच्या सुधारणेच्या प्रश्नाला प्राधान्य दिले होते आणि त्यासाठीच आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी वाहून घेतले होते. स्त्रियांच्या न्याय्य हक्कांसाठी समाजातील सनातनी लोकांशी संघर्ष करण्याचीही तयारी त्यांनी ठेवली. अर्थात, त्यासाठी त्यांना बराच त्रासही सोसावा लागला; पण हाती घेतलेले कार्य त्यांनी अर्धवट सोडले नाही.

स्त्री – सुधारणेच्या प्रश्नांबरोबर इतर प्रकारच्या समाजसुधारणांचाही त्यांनी पुरस्कार केलाहोता. भार समाजाची सर्वांगीण प्रगती व्हावी ही त्यांची तळमळ होती. सामाजिक प्रश्नांबाबतची त्यांची दृष्टी अत्यंत व्यापक होती. त्यासंबंधीची आपली मते त्यांनी ‘ इंदुप्रकाशा’त लिहिलेल्या लेखांतून वेळोवेळी अतिशय परखडपणे मांडली होती.

भारतीय समाजातील जातिभेद, विषमता व अन्याय या दोषांवर त्यांनी जोरदार टीका केली होती. सर्व प्रकारच्या सामाजिक सुधारणांना त्यांचा पाठिंबा होता. तथापि, समाजसुधारणेच्या कार्याची प्रचंड व्याप्ती पाहून विष्णुशास्त्रींनी स्त्री – सुधारणेच्या प्रश्नावरच आपले लक्ष केंद्रित केले.

विष्णुशास्त्री पंडित यांची पुस्तके

  1. आर्य लोकांच्या प्राचीन व अर्वाचीन रीती
  2. हिंदुस्थानचा इतिहास
  3. नाना फडणवीस यांची संक्षिप्त बखर
  4. ब्राह्मणकन्याविवाहविचार
  5. पुरुषसूक्त व्याख्या, विधवाविवाह
  6. तुकारामबाबांच्या अभंगांची गाथा
  7. इंग्रजी आणि मराठी कोश
  8. संस्कृत आणि महाराष्ट्र धातुकोश

हे सुद्धा वाचा –

Related Posts