मेनू बंद

इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे – संपूर्ण माहिती मराठी

आपण या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे (१८६४-१९२६) यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Itihasacharya Vishwanath Kashinath Rajwade यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे - Itihasacharya Vishwanath Kashinath Rajwade

इतिहासाचार्य राजवाडे म्हणून प्रसिद्ध असलेले विश्वनाथ काशिनाथ राजवाडे हे महाराष्ट्रातील भारतातील इतिहासकार, विद्वान, लेखक, भाष्यकार आणि वक्ते होते. संपूर्ण भारतातील शेकडो गावांना आणि ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊन आणि हजारो ऐतिहासिक कागदपत्रे गोळा करून मराठा इतिहासाचे प्रचंड संशोधन करणारे ते खऱ्या अर्थाने पहिलेच मानले जातात.

जागतिक इतिहासाच्या विविध पैलूंवर ते भाष्यकारही होते. पुण्यातील इतिहास संशोधक मंडळाचे ते संस्थापक सदस्य होते. त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये दत्तो वामन पोतदार, वासुदेव सीताराम बेंद्रे आणि जी.एच. खरे यांसारखे इतिहासकार आहेत. इतिहासकार, राम शरण शर्मा म्हणतात: “संशोधनाच्या निस्सीम तळमळीने, व्ही.के. राजवाडे संस्कृत हस्तलिखिते आणि मराठा इतिहासाच्या स्त्रोतांचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्रात गावोगाव गेले; जे बावीस खंडात प्रकाशित झाले.”

इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे

इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे हे ‘ अहिताग्नी राजवाडे ‘ या नावानेही ते ओळखले जातात. राजवाडे यांचा जन्म १२ जुलै, १८६४ रोजी पुणे येथे झाला. ते तीन वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला; त्यामुळे त्यांचे बालपण अतिशय कष्टात गेले. लहानपणी त्यांचे संगोपन व शिक्षण त्यांच्या चुलत्यांनी केले. राजवाड्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पुण्यातच झाले.

सन १८८२ मध्ये ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. मॅट्रिक झाल्यावर राजवाडे यांनी उच्च शिक्षणासाठी मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजात प्रवेश घेतला; परंतु प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना आपले शिक्षण मध्येच सोडावे लागले. त्यानंतर ते पुण्याला परत आले. तेथे काही काळ त्यांनी खाजगी शिकवण्या केल्या. पुढे त्यांनी पुण्यातील डेक्कन कॉलेजात आपले नाव दाखल केले आणि अर्धवट राहिलेले शिक्षण पुन्हा सुरू ठेवले. १८९० मध्ये ते बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले.

बी. ए. ची पदवी संपादन केल्यावर राजवाडे यांनी पुणे येथील भावे स्कूल व न्यू इंग्लिश स्कूल या शाळांमध्ये काही दिवस शिक्षकाची नोकरी केली. तथापि, अल्पावधीतच त्यांनी नोकरीला रामराम ठोकला. सन १८९५ मध्ये त्यांनी ‘ भाषांतर ‘ हे मासिक सुरू केले; पण ज्या श्रीविठ्ठल छापखान्यात ते छापले जात होते तो छापखानाच अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडून राजवाड्यांची सर्व कागदपत्रे त्यात जाळून खाक झाली. उपरोक्त दुर्घटना घडण्यापूर्वी काही काळ अगोदर त्यांच्या पत्नीचेही निधन झाले होते. उर्वरित आयुष्य आता इतिहास संशोधन कार्यालाच वाहण्याचा राजवाड्यांनी निश्चय केला.

राजवाडे यांनी यानंतर ऐतिहासिक कागदपत्रे गोळा करण्याचे कार्य हाती घेतले. ज्यांच्याकडे ऐतिहासिक कागदपत्रे मिळू शकतील अशी अनेक घराणी त्या वेळी महाराष्ट्रात होती. तथापि , संबंधित लोकांकडून ती कागदपत्रे मिळविणे ही अतिशय जिकिरीची बाब होती. आपल्याकडील कागदपत्रे संशोधनासाठी उपलब्ध करून देण्याची त्यांपैकी अनेकांची तयारी नसे.

तथापि, राजवाड्यांनी चिकाटी सोडली नाही. ऐतिहासिक कागदपत्रे मिळविण्यासाठी ते एखाद्या झपाटलेल्या माणसाप्रमाणे सर्वत्र भटकत राहिले. त्या कामी त्यांना अनंत अडचणी सोसाव्या लागल्या. अशा प्रकारे निरनिराळ्या ठिकाणांहून कागदपत्रे मिळविल्यावर राजवाडे यांनी त्यांच्या संशोधन कार्यास सुरुवात केली. सर्व कागदपत्रांचा नीट अभ्यास करून त्यांनी ‘ मराठ्यांच्या इतिहासाची साधने ‘ या नावाने त्यांचा पहिला खंड प्रसिद्ध केला. या खंडास त्यांनी एकशे वीस पानांची प्रदीर्घ व विद्वत्तापूर्ण प्रस्तावना जोडली होती . या खंडामुळे ‘ इतिहास संशोधक ‘ म्हणून राजवाड्यांची सर्वत्र कीर्ती झाली.

ज्ञानकोशकारांनी ‘ विद्यासेवक ‘ या मासिकात लिहिले की, “ खरोखर पाहता साहित्यशोधक , बारीक शोध आणि इतिहासविकासविषयक विचार या दृष्टीनी पाहता अर्वाचीन इतिहासाच्या क्षेत्रात राजवाडे यांच्या पहिल्या खंडाच्या योग्यतेचा दुसरा ग्रंथ गेल्या पन्नास वर्षांत हिंदुस्थानात झालाच नाही. ” रियासतकार सरदेसाई यांनी त्या ग्रंथाच्या प्रस्तावनेसंबंधी म्हटले होते की, “ ही प्रस्तावना मी सात वेळा वाचली तेव्हा कोठे मला त्यातील म्हणणे यथार्थपणे समजले. ” या ग्रंथामुळेच राजवाड्यांना ‘ इतिहासाचार्य ‘ हा किताब मिळाला.

Vishwanath Kashinath Rajwade Information in Marathi

यानंतर आणखी दप्तरे शोधण्याच्या कामाला Rajwade लागले. त्यासाठी पहिल्याप्रमाणे त्यांनी अनेक ठिकाणी भटकंती केली. काही ठिकाणी त्यांना कटू अनुभवही घ्यावे लागले. अशा प्रकारे अविश्रांत परिश्रम घेऊन राजवाड्यांनी १८९८ ते १९२१ या काळात मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनांचे एकूण बावीस खंड प्रसिद्ध केले. तरीदेखील त्यांच्याकडील अनेक कागदपत्रे आर्थिक अडचणीमुळे अप्रकाशितच राहिली. या बाबतीत त्या वेळचे संस्थानिक, जहागीरदार, इनामदार या मंडळींनी दाखविलेल्या उदासीनतेबद्दल राजवाड्यांनी संताप व्यक्त केला होता.

मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनांचे बावीस खंड याच्या जोडीने राजवाड्यांनी दहा स्वतंत्र संशोधनपूर्ण ग्रंथ प्रसिद्ध केले आहेत . त्यामध्ये महिकावतीची बखर, राधामाधव विलासचंपू, ज्ञानेश्वरी आणि तिचे व्याकरण इत्यादी ग्रंथांचा समावेश होतो. त्यांनी मराठी बखर वाङ्मयाचादेखील अभ्यास केला होता. पण मराठी बखरींना ऐतिहासिक महत्त्व फारसे नाही . मराठ्यांच्या इतिहासाच्या इतर साधनांच्या तुलनेत बखरी अगदीच निरुपयोगी आहेत, असे त्यांचे मत होते.

राजवाडे हे राष्ट्रीय वृत्तीचे होते. महाराष्ट्र व मराठी भाषा यांविषयी त्यांना अत्यंत अभिमान होता. हा अभिमान इतका उत्कट होता, की मराठी भाषेखेरीज अन्य भाषांमध्ये , विशेषतः इंग्रजीत लिखाण करावयाचे नाही , असा निश्चय त्यांनी केला होता. आपल्या राष्ट्राची कोणत्या ना कोणत्या मार्गाने सेवा करण्याची त्यांची इच्छा होती. ” हिंदुस्थानातून इंग्लिशांना घालवून देणे हेच सुशिक्षित हिंदवासीयांचे आद्य कर्तव्य होय, ” असे त्यांनी म्हटले होते.

राजवाडे महाराष्ट्राभिमानी व देशाभिमानी असले तरी त्यांची वृत्ती व बुद्धी संशोधकाची होती; म्हणूनच कठोर आत्मपरीक्षण करून आपल्यातील दोषांवर प्रकाश टाकण्यासही त्यांनी खळखळ केली नाही. “ भौतिक शास्त्रांच्या प्रगतीकडे महाराष्ट्रातील मुत्सद्द्यांनी बेसुमार दुर्लक्ष केल्यामुळेच मराठेशाही नष्ट झाली, ” असे त्यांचे स्पष्ट होते. आपल्या विद्यार्थ्यांनी रसायनशास्त्र व इतर भौतिकशास्त्रे यांत पारंगत व्हावे, विविध कला आपल्याशा कराव्यात, असे त्यांना तीव्रतेने वाटत असे.

महाराष्ट्रीय संतांच्या राजकीय व सामाजिक भूमिकेवरही त्यांनी टीका केली होती. वारकरी पंथावर त्यांनी जोराचा हल्ला चढविला होता. ” तेराव्या शतकापासून सतराव्या शतकापर्यंत महाराष्ट्रात होऊन गेलेल्या संतांनी येथील लोकांना जो भक्तिमार्ग सांगितला त्यामुळे आपल्या समाजात निवृत्तिपर प्रवृत्ती वाढीस लागली.

परकीयांनी आक्रमक धोरण स्वीकारून आपल्या धर्मावर व धर्मबांधवांवर हल्ले केले तरी संतांनी मात्र सहिष्णुता हीच श्रेष्ठ मानली. अशा प्रकारे भक्तिमार्गाने समाजाला पंगू बनविले. या मार्गाची शिकवण देणाऱ्या संतांनी राष्ट्र दुबळे केले. संत म्हटला म्हणजे पंगुपणाचा केवळ मूर्तिमंत पुतळाच होय. इहलोक संतांचा नव्हेच ! ” अशा शब्दांत त्यांनी महाराष्ट्रीय संतांची संभावना केली होती.

समर्थ रामदासांना मात्र राजवाड्यांनी इतर संतांहून वेगळे काढले आहे. देशातील सर्व मराठा स्वराज्याच्या ठायी मेळवावा हा उच्चतम राष्ट्रीयीकरणाचा सल्ला रामदासांनी शिवाजींस दिला. मराठा तेवढा मेळवावा आणिआपला महाराष्ट्रधर्म राखावा व वाढवावा, या उपदेशाची देणगी रामदासांनी शिवाजीला व तत्कालीन मराठ्यांना दिली; महाराष्ट्रात रामदासांनी राष्ट्रीयत्व व राष्ट्रभावना म्हणून जी म्हणतात ती उत्पन्न केली. ही राष्ट्रभावना जर नसती तर शिवाजीच्या मृत्यूनंतर त्याने स्थापलेले राज्य थोड्याच दिवसांत लयास गेले असते. ” या शब्दांत त्यांनी समर्थ रामदासांचा गुणगौरव केला होता.

ऐतिहासिक कागदपत्रांच्या संकलनाबरोबर राजवाडे यांनी काही ताम्रपट व शिलालेखही मिळविले होते. आपण केलेल्या इतिहास – संशोधनाच्या कार्याला संघटित स्वरूप देण्याच्या उद्देशाने त्यांनी सन १९१० मध्ये पुण्यास ‘ भारत इतिहास संशोधक मंडळ ‘ स्थापन केले आणि ते नावारूपाला आणले.

इतिहासाच्या जोडीने राजवाड्यांनी भाषाशास्त्र, समाजशास्त्र इत्यादी क्षेत्रांतही मौलिक संशोधन केले होते. ‘ संस्कृत भाषेचा उलगडा’, ‘ विचार व विकारप्रदर्शनाच्या साधनांची इतिहासपूर्व व इतिहासोत्तर उत्क्रांती’, ‘ वृद्धीचा निबंध ‘ इत्यादी निबंधांतून त्यांच्या भाषाशास्त्राच्या ज्ञानाची प्रचीती येते. ज्ञानेश्वरीची जुनी प्रत त्यांना सापडल्यावर त्या ज्ञानेश्वरीस शंभर पानांची प्रस्तावना त्यांनी जोडली.

महानुभावी पंथाच्या गुप्त भाषेचा उलगडाही त्यांनी केला. समाजशास्त्राच्या अध्ययनातही त्यांना गोडी होती. प्राचीन विवाह पद्धती, समाजात हिंदवेतरांचा प्रवेश, चित्पावनांचा इतिहास, चातुर्वर्ण्य यांसारखे त्यांचे लेख समाजशास्त्रविषयक विवेचनाने परिपूर्ण आहेत. त्यांनी लिहिलेला ‘ भारतीय विवाह संस्थेचा इतिहास ‘ हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांचा ३१ डिसेंबर, १९२६ रोजी मृत्यू झाला.

हे सुद्धा वाचा –

Related Posts