आपण या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील पुरोगामी विचारसरणीचे राजकीय नेते यशवंतराव चव्हाण यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Yashwantrao Chavan यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

यशवंतराव चव्हाण यांचे शिक्षण
यशवंतरावांचे पूर्ण नाव यशवंतराव बळवंतराव चव्हाण होते. त्यांचा जन्म 12 मार्च 1914 रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्र गावात झाला. त्यांचे शिक्षण देवराष्ट्र, कऱ्हाड आणि कोल्हापूर येथे झाले. यशवंतरावांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. ते लहान असतानाच त्याचे वडील वारले; त्यामुळे त्यांच्या संगोपनाची जबाबदारी त्यांच्या आईवर पडली. साहजिकच त्यांना अतिशय कठीण परिस्थितीत सामना करावा लागला. मात्र, प्रतिकूलतेवर मात करत त्यांनी बी.ए. एलएलबीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या आईने त्यांना स्वावलंबन आणि देशभक्तीचे मौल्यवान धडे दिले. लहानपणापासूनच त्यांच्यावर भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा प्रभाव होता. यशवंतराव चव्हाण हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभागी होते.
यशवंतराव चव्हाण माहिती मराठी
यशवंतराव चव्हाण यांच्यावर विद्यार्थिदशेपासूनच राष्ट्रवादी विचारांचा प्रभाव होता. शिक्षण चालू असतानाच त्यांनी सन १९३० च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला होता. त्याबद्दल त्यांना तुरुंगवासाची शिक्षाही झाली होती. या तुरुंगवासातून बाहेर आल्यावर राष्ट्रीय चळवळीतही सहभाग त्यांनी चालूच ठेवला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ते काम करू लागले.
यशवंतराव चव्हाण यांचे सामाजिक कार्य
मानवेंद्रनाथ रॉय यांच्या विचारांचाही यशवंतरावांवर प्रभाव होता. तथापि, यामुळे त्यांची काँग्रेस पक्ष आणि महात्मा गांधी यांच्या नेतृत्वावरील निष्ठा कमी झाली नाही. इ. १९३० पासून त्यांनी काँग्रेसच्या प्रचारासाठी सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात जनजागृती मोहीम हाती घेतली होती. इ. १९३७ च्या प्रांतीय विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेस पक्षाच्या प्रचारात भाग घेतला होता.
२६ जानेवारी १९३२ रोजी सातारा येथे भारतीय ध्वज फडकवल्याबद्दल त्यांना १८ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. 1942 च्या AICC च्या ऐतिहासिक बॉम्बे अधिवेशनात ते एक प्रतिनिधी होते जिथे भारत छोडो नारा दिला गेला आणि या सहभागामुळे त्यांना अटक करण्यात आली. अखेर 1944 मध्ये यशवंतरावांची तुरुंगातून सुटका झाली.
सन १९४२ च्या ‘ चले जाव ‘ आंदोलनातही यशवंतराव चव्हाणांनी भाग घेतला होता. या चळवळीच्या काळात त्यांनी भूमिगत राहून कार्य केले होते. सातारा जिल्ह्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संघटित करून चळवळीची व्याप्ती वाढविण्याची त्यांची योजना होती; पण भूमिगत लढ्याच्या प्रारंभीच्या अवस्थेतच ते पकडले गेले आणि त्यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली.
पुढे १९४६ च्या निवडणुकीत प्रांतिक कायदेमंडळासाठी त्यांना काँग्रेसची उमेदवारी देण्यात आली. मुंबई प्रांताच्या विधानसभेवर ते निवडून आले. या वेळेपासूनच त्यांच्या संसदीय आघाडीवरील कारकिर्दीची सुरुवात झाली. इ. स. १९४६ मध्ये प्रथम संसदीय सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
Yashwantrao Chavan Information in Marathi
1952 च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत यशवंतराव मुंबई विधानसभेवर निवडून आले. त्याचवेळी त्यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. यशवंतराव चव्हाण यांनी 1952 ते 1956 या कालावधीत राज्य मंत्रिमंडळाचे सदस्य म्हणून काम केले. इ. 1956 मध्ये भाषेच्या तत्त्वावर देशातील घटक राज्यांची पुनर्रचना करण्यात आली; पण महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन्ही राज्ये एकत्र करून मुंबई हे द्विभाषिक राज्य निर्माण झाले. या द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री म्हणून यशवंतरावांची निवड झाली.
त्यांनी द्वैभाषिक राज्याची धुरा यशस्वीरीत्या वाहिली. हा कालखंड यशवंतरावांच्या दृष्टीने अत्यंत कसोटीचा होता; कारण, संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर मराठी लोकांच्या भावना अतिशय तीव्र बनल्या होत्या. त्यांना द्वैभाषिक राज्याची निर्मिती व त्याचे अस्तित्व मुळीच मान्य मव्हते त्यामुळे महाराष्ट्रीय जनतेने यशवंतरावांना जोरदार विरोध केला; पण अशाही परिस्थितीत त्यांनी जनतेचा विश्वास संपादन करण्याचा कसोशीने प्रयत्न केला. त्याच वेळी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी काँग्रेसश्रेष्ठींचे मन वळविण्यातही त्यांनी पुढाकार घेतला होता.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री
१ मे, १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान यशवंतराव चव्हाण यांनी मिळविला. या पदावर काम करताना एक उत्कृष्ट प्रशासक असा नावलौकिक त्यांनी मिळविला. महाराष्ट्रातील कृषि औद्योगिक क्षेत्राच्या विकासाचा पाया घालण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी त्यांनी बजावली. महाराष्ट्राच्या राजकारणाला पुरोगामी वळण लावण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. याशिवाय महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी त्यांनी चांगल्या पद्धतीने केली होती.
सन १९६२ च्या चिनी आक्रमणानंतर यशवंतरावांची केंद्रीय मंत्रिमंडळात संरक्षण खात्याचे मंत्री म्हणून नियुक्ती झाली . ही जबाबदारी त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. सुमारे पंधरा वर्षे त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य म्हणून काम केले. या काळात त्यांनी संरक्षण, गृह, अर्थ या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली. सन १९७७ मध्ये केंद्रात जनता पक्ष अधिकारावर आल्यावर यशवंतरावांची संसदेतील विरोधी पक्षाचे नेते म्हणून निवड झाली.
सन १९७९ मध्ये केंद्रात चौधरी चरण सिंग यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ अधिकारावर आले. या मंत्रिमंडळात यशवंतराव चव्हाणांनी उपपंतप्रधानपद भूषविले होते. भारताच्या आठव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांची नियुक्ती झाली होती. १९७८ मध्ये काँग्रेसचे विभाजन झाल्यावर श्रीमती इंदिरा गांधी यांच्या विरोधात असलेल्या गटाचे नेतृत्व यशवंतरावांनी केले होते; परंतु इंदिरा गांधी केंद्रात परत सत्तेवर आल्यावर ते लवकरच काँग्रेसच्या मुख्य प्रवाहात पुन्हा सामील झाले.
यशवंतरावांना राजकारणाप्रमाणेच समाजकारण, साहित्य, कला इत्यादी क्षेत्रांतही रस होता. साहित्यिक व कलाकार यांना उत्तेजन देण्याचे धोरण त्यांनी नेहमीच अवलंबिले होते. त्याच उद्देशाने त्यांनी ‘ महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळा’ची निर्मिती केली होती. सन १९७५ मध्ये कऱ्हाड येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती.
यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र
‘सह्याद्रीचे वारे’ आणि ‘युगांतर’ या नावाने त्यांच्या भाषणांचे दोन संग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या ‘ ऋणानुबंध ’ या पुस्तकात त्यांच्या स्वभावाचे अनेक धागे उलगडत जातात आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू पाहायला मिळतात. त्यांचे ‘कृष्णकाठ’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले आहे. २६ नोव्हेंबर १९८४ रोजी यशवंतराव चव्हाण यांचे निधन झाले.
हे सुद्धा वाचा –